उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नागपूरमध्ये महिला सक्षमीकरणावरील 'स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषद 2026'चे उद्घाटन


महिला आणि त्यांच्या नेतृत्वाविषयीचा आदर भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेला : उपराष्ट्रपती

महिला सक्षमीकरण ही सरकार, विद्यापीठे आणि समाजाची सामायिक जबाबदारी : उपराष्ट्रपती

Posted On: 25 NOV 2026 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 'स्वयंसिद्धा केंद्रा'द्वारे आयोजित 'स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषद 2026 चे उद्घाटन केले. महिला सक्षमीकरणावर आधारित या परिषदेची संकल्पना 'विजय– शिक्षणाद्वारे सक्षमीकरणाचा प्रवास' अशी होती.

उपस्थितांना संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपल्या कार्यकाळात सुरू केलेल्या 'स्वयंसिद्धा' कार्यक्रमाचा उल्लेख केला. तसेच, सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचा होत असलेला विस्तार आणि त्याच्या उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांचा असलेला सहभाग, याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, विद्यापीठांनी केवळ शैक्षणिक पात्रता प्रदान करण्यापलीकडे जाऊन, कौशल्ये, आर्थिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन, याद्वारे महिलांच्या सक्षमीकरणात सक्रियपणे योगदान द्यायला हवे.

उच्च शिक्षणात महिलांचा वाढता सहभाग अधोरेखित करताना, उपराष्ट्रपतींनी निरीक्षण नोंदवले की, देशभरातील दीक्षांत समारंभांमध्ये सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुरुष विद्यार्थ्यांच्या तुलनेत महिला विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणाचा उल्लेख करताना, त्यांनी नमूद केले की, गेल्या दशकात उच्च शिक्षणातील महिलांच्या एकूण नोंदणीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रगती महिलांसाठी विस्तारत असलेल्या संधी आणि देशाच्या 'महिलांचा विकास' याकडून 'महिलांच्या नेतृत्वाखालील विकास' या दिशेने होत असलेल्या संक्रमणाचे प्रतिबिंब आहे.

आगामी संविधान दिनाचा उल्लेख करताना, उपराष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटना तयार करण्यामध्ये संविधान सभेतील 15 महिला सदस्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. लोकशाही संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने 'नारी शक्ती वंदन अधिनियम' याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

महिला सशक्तीकरण ही सरकार, विद्यापीठे, उद्योग, नागरी समाज आणि कुटुंबांची सामायिक जबाबदारी असल्याचे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. प्रस्तावित महाराष्ट्र–विजय’ चौकट, उच्च शिक्षणातील महिलांसाठी संस्थात्मक स्तरावर सातत्यपूर्ण कृतीला आधार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘स्वयंसिद्धा’ (Swayamsiddha) हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर आणल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. ‘विजया’ (VIJAYA) परिषदेतून महत्त्वपूर्ण चर्चा घडून येतील, नाविन्यपूर्ण उपाय सुचवले जातील आणि त्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येण्याजोग्या अशा शिफारसी पुढे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्या महिलांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल, त्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वक्षमता यातूनच ‘स्वयंसिद्धा’चे खरे यश दिसून येईल, असे ते म्हणाले.

या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी ‘स्वयंसिद्धा’च्या बोधचिन्हाचे अनावरण केले आणि ‘हंड्रेड व्हॉइसेस ऑफ यंग वुमन’ (तरुण महिलांचे 100 अनुभव) आणि ‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन हायर एज्युकेशन’ (उच्च शिक्षणातील सर्वोत्तम पद्धती) या दोन पुस्तिकांचे प्रकाशन केले. या उपक्रमातील योगदानाबद्दल त्यांनी ‘स्वयंसिद्धा’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच, उपस्थितांसोबत ‘नो टू ड्रग्स’ (अंमली पदार्थांना नकार) ही शपथ घेतली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल  जिष्णु देव वर्मा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे (आयएएस – भारतीय प्रशासकीय सेवा), विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे प्रतिनिधी, तसेच शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2341344) अभ्यागत कक्ष : 9