गोवा, 25 नोव्हेंबर 2026
महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित 'बाप्या' हा एक मराठी विनोदी-नाट्यपट आहे. हा चित्रपट वैयक्तिक निवडी आणि बदलत्या सामाजिक धारणांच्या एका जिव्हाळ्याच्या कथेच्या माध्यमातून लिंगभाव ओळख, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक स्वीकार या विषयांचा वेध घेतो. 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'इंडियन पॅनोरमा'च्या 'मुख्य चित्रपट प्रवाह' विभागात हा चित्रपट प्रदर्शित झाला. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत 'बाप्या'चे दिग्दर्शक आणि निर्माते समीर तिवारी तसेच अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या चित्रपटाचा उद्देश समाजाला उपदेश करणे किंवा धडे देणे हा नसल्याचे आपल्या प्रस्ताविकात समीर तिवारी यांनी सांगितले. हा चित्रपट केवळ स्वीकार, सामंजस्य आणि नातेसंबंधांबद्दलची एक कथा सांगत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "एखाद्या व्यक्तीला स्वतःला जे व्हायचे आहे, तसे होण्याची इच्छा असते आणि आजूबाजूच्या लोकांनी ही त्या व्यक्तीचा जसा आहे तसा स्वीकार करावा, एवढीच ही एक साधी कथा आहे," असे ते म्हणाले.
_20261125145008_74c6fa.jpeg)
मराठी भाषेत चित्रपट बनवण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देताना तिवारी म्हणाले की, त्यांना एखाद्या अभिनेत्याभोवती केंद्रित असलेल्या चित्रपटाऐवजी, एका अस्सल पटकथेवर आधारित एक प्रामाणिक चित्रपट बनवायचा होता.
या प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवणे कठीण होते, कारण संभाव्य गुंतवणूकदारांना पटकथा आवडली असूनही, ते चित्रपटाचा विषय जोखमीचा मानत होते, असे चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल बोलताना तिवारी यांनी सांगितले. ‘बाप्या’ या प्रमुख व्यक्तिरेखेसाठी कलाकाराची निवड करणे हे देखील मोठे आव्हान होते, असे ते म्हणाले. स्वतःच्या लिंगभाव ओळखीपेक्षा वेगळी ओळख असलेली व्यक्तिरेखा साकारण्यास अनेक अभिनेत्रींनी संकोच व्यक्त केला, मात्र अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी कोणतीही भीती न बाळगता ही भूमिका स्वीकारली आणि एक आव्हानात्मक सर्जनशील संधी म्हणून तिच्याकडे पाहिले असे तिवारी यांनी सांगितले.
समाज हळूहळू पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील पारंपरिक भेद पुसून टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे लिंगभावाविषयी समाजाच्या बदलत्या दृष्टिकोनावर भाष्य करताना तिवारी म्हणाले. व्यक्तीच्या कपड्यांची निवड, वर्तन किंवा ओळख यावरून तिचे मूल्यमापन किंवा भेदभाव होता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले. "प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. समाज जितक्या वेगाने प्रगती करेल, तितक्या लिंगभावातील भेदरेषा अस्पष्ट होत जातील," असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजाने पारंपरिक आणि बुरसटलेल्या कल्पनांच्या पलीकडे जाण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय वागवण्याचे महत्त्व अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. निसर्गातील विविधतेचे उदाहरण देत ते म्हणाले की, झाडे आणि वनस्पतींचे वेगवेगळे आकार आणि स्वरूप आपण कोणताही भेदभाव न करता स्वीकारतो. हाच दृष्टिकोन मानवी नातेसंबंधांमध्ये हे असायला हवा.
समाजाला आकार देण्यात कला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, असे निरीक्षण नोंदवत कुलकर्णी म्हणाले की, चित्रपट आणि इतर कला प्रकार केवळ समकालीन वास्तवाचे आरसे म्हणून नव्हे, तर सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. 'बाप्या' हा चित्रपट सांस्कृतिक मुळे न सोडता बदलत्या काळाच्या प्रकाशात परंपरांचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. " आपण आपली परंपरा विसरत नाही आहोत; आपण तिचा नव्या पद्धतीने अर्थ लावून तिला पुढे नेत आहोत, आणि आपली मुळे मजबूत करत असतानाच आम्ही भविष्याचाही विचार करत आहोत. याच प्रक्रियेतून ही अथांग प्रेमाची भावरा उत्पन्न होत आहे," असे त्यांनी नमूद केले.
स्वीकार आणि प्रेम हा चित्रपटाचा मूळ आत्मा असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. भाषा, पेहराव आणि ओळख यांमधील भिन्नता स्वीकारणे हे भारताच्या 'विविधतेतील एकता' या वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. स्वीकार आणि पूर्वग्रहांशिवाय वर्तमानाकडे पाहण्याची क्षमता भारतीय विचारांमध्ये खोलवर रुजलेली आहे, असे कुलकर्णी यांनी भारताच्या तात्विक परंपरांचा संदर्भ देत सांगितले. "मला असे वाटते की मी स्वतः तो प्रवास माझ्या आत अनुभवला आहे आणि त्यामुळेच आम्ही तो पडद्यावर उतरवू शकलो," असेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक आणि बौद्धिक देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून इफ्फी’चे महत्त्व अधोरेखित करताना कुलकर्णी म्हणाले की, हा महोत्सव भारत आणि परदेशातील चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो, ज्यामुळे विविध सिनेमॅटिक दृष्टिकोन जाणून घेण्याची आणि अर्थपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण होते.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन सुप्रिया घायतडक यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे