57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

“केवळ चित्रपटकर्तेच नव्हे, तर प्रत्येक माणूस कथा जगत असतो” : इफ्फी मधल्या तज्‍ज्ञवर्गात बोगदान मुरेशानू

Posted On: 24 NOV 2026 7:42PMby PIB MumbaiRelease ID: 2341003Views: 5

गोवा, 24 नोव्‍हेंबर 2026

 

प्रत्येक कथेत वास्तवाचा एक अंश असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आठवणीत काल्पनिक कथेची शक्यता दडलेली असते. प्रत्यक्ष जगलेले अनुभव आणि चित्रपटांच्या माध्यमातून साकारलेली कल्पनाशक्ती यांच्यातल्या या गुंतागुंतीच्या नात्याचा वेध घेत, रोमानियाचे नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते बोगदान मुरेशानू यांनी आज गोव्यातल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘वास्तव आणि कल्पित यांच्यातली नाजूक सीमारेषा’ या विषयावर विशेष तज्ञवर्ग घेतला.

चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट क्षेत्रातल्या व्यावसायिकांच्या उत्साही उपस्थितीत झालेल्या या सत्रात मुरेशानू यांनी गोष्ट सांगणे हे मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग का आहे आणि कथा आपल्याला जग समजून घ्यायला कशी मदत करतात, याविषयी विचार मांडले.

गोष्ट सांगणे ही केवळ कलावंतांची मक्तेदारी नसल्याचे अधोरेखित करताना ते म्हणाले की, मित्रांमध्ये रोजच्या आयुष्यात सांगितल्या जाणाऱ्या छोट्या प्रसंगांपासून ते चित्रपटांच्या माध्यमातून सादर होणाऱ्या कथांपर्यंत, प्रत्येक कथेमुळे आपल्याला वास्तवाच्या वेगवेगळ्या शक्यता तपासता येतात आणि आपल्या मनाला नवी ऊर्जा मिळते.

चित्रपटनिर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रक्रिया असते, मात्र अखेर तिचे रूपांतर सामूहिक अनुभवात होते, असे त्यांनी सांगितले. “तुमच्या मनातला एकपात्री संवाद जेव्हा द्विपात्री संवाद बनतो, तेव्हा तो चित्रपट केवळ तुमचा राहत नाही,” असे ते म्हणाले. चित्रपट निर्मात्याची वैयक्तिक कल्पनादृष्टी प्रेक्षकांच्या आकलनातून आणि अर्थ लावण्याच्या प्रक्रियेतून नवे आयाम कसे मिळवते, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चित्रपट निर्मितीच्या तंत्राविषयी बोलताना मुरेशानू यांनी चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “कादंबरीमध्ये कथानकाला वेगवेगळ्या उपकथांकडे वळण्याची मुभा असते. मात्र, दोन तासांच्या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष कथेकडे केंद्रित राहणे आवश्यक असते. त्यातले संदर्भ, कथानकाचा आधार आणि विषय हे एका ठोस मध्यवर्ती दृष्टिकोनाशी सुसंगत असले पाहिजेत.”

चित्रपटातून कथा सांगताना न बोललेल्या गोष्टींचेही मोठे सामर्थ्य असते, असे त्यांनी नमूद केले. आपल्या एका चित्रपटातल्या प्रसंगाची आठवण सांगताना, एका पात्राने फटाका पेटवतानाचा प्रसंग प्रत्यक्ष दाखवण्याऐवजी तो प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतला होता, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे काही गोष्टी न दाखवण्याचा संयम प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या कथेत सहभागी होण्याची संधी देतो, असे ते म्हणाले.

ऐतिहासिक दृश्यफिती म्हणजे इतिहासाचे संपूर्णपणे वस्तुनिष्ठ चित्रण असते, या समजुतीला मुरेशानू यांनी छेद दिला. प्रत्येक कॅमेरा केवळ एका विशिष्ट दृष्टिकोनातूनच दृश्य टिपत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. द ख्रिसमस गिफ्ट आणि द न्यू इयर दॅट नेव्हर केम या आपल्या चित्रपटांचा दाखला देत त्यांनी ऐतिहासिक दृश्यफिती आणि काल्पनिक कथानक एकमेकांना कशा प्रकारे पूरक ठरू शकतात, हे सांगितले. यासंदर्भात एक रंजक अनुभव सांगताना ते म्हणाले, “वास्तव समजून घेण्यासाठी काल्पनिक कथा जेव्हा एका सोप्या प्रतिमानाचे काम करते, तेव्हा ती वास्तवाशी एकरूप होते. या दोन्ही गोष्टी एकमेकांना समृद्ध करतात.”

चित्रपटातील दृश्यभाषा कथनशैलीला कशा प्रकारे आकार देते, याविषयीही मुरेशानू यांनी भाष्य केले. रोमानियातील साम्यवादी राजवटीच्या काळावर आधारित चित्रपटांमध्ये त्यांनी 4:3 या आस्पेक्ट रेशोचा वापर केला आहे. ऐतिहासिक दृश्यफितींशी सुसंगतता राखण्यासोबतच प्रेक्षकांना कथेशी अधिक जवळीक साधता यावी आणि बंदिस्त वातावरणातील भावना अनुभवता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याउलट, द मॅजिशियन या आपल्या ॲनिमेटेड लघुपटात त्यांनी विस्तृत वाइडस्क्रीन स्वरूपाचा वापर केला. त्यामुळे चित्रपटातील बंदरालाही कथानकात एक सक्रिय भूमिका मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या चित्रपटसृष्टीविषयी भाष्य करताना चित्रपटाचे खरे सामर्थ्य केवळ त्याच्या वेगवान कथनात किंवा भव्य दृश्यांमध्ये नसून, मानवी चेहऱ्यावरील हावभाव आणि नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावभावनांमध्येही असते, असे मुरेशानू यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील चरित्रपट, पौराणिक कथा तसेच वास्तवातील व्यक्तींचे चित्रण करताना पाळावयाच्या नैतिक जबाबदाऱ्या अशा विविध विषयांवर चर्चा झाली. एका महान व्यक्तिमत्त्वावरील चरित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नुकतीच आलेली ऑफर यासंदर्भात बोलताना, एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेण्याऐवजी तिच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर लक्ष केंद्रित केल्यास तिच्या जीवनातील अधिक सखोल पैलू उलगडू शकतात, असे मुरेशानू यांनी नमूद केले.

परंपरेने चालत आलेल्या दृष्टिकोनांच्या पलीकडे जाऊन व्यापक जगाचा अनुभव घेण्याचे आणि त्यानंतर धैर्याने व स्पष्ट दृष्टिकोनातून आपल्या मुळांकडे परतण्याचे समारोप करतांना त्यांनी कथाकारांना आवाहन केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2341003
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026