गोवा, 23 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा मधील दोन वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये एक समान धागा दिसून आला. तो म्हणजे, प्रेक्षकांना कथा समजण्याआधी ती अनुभवता यावी, यासाठी दोन्ही चित्रपटांमध्ये मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. चित्रपट निर्माते टियागो गुएडेस आणि सुझॅन अँड्र्यूज कोरिया यांनी आज महोत्सवादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनुक्रमे ‘अक्वी’ (Aquí) आणि ‘द हंट्रेस’ (ला काझादोरा) या आपल्या चित्रपटांविषयी माहिती दिली.
टियागो गुएडेस दिग्दर्शित ‘अक्वी’ हा डिस्टोपियन (भयावह काल्पनिक वास्तवावर आधारित) नाट्यपट आहे. जे. एम. कोएत्झी यांच्या ‘जीझस’ या तीन भागांच्या कादंबरीच्या मालिकेवर (त्रिपदी- ट्रायॉलॉजी) हा चित्रपट आधारित असून, इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात त्याचे प्रदर्शन होत आहे. मेक्सिकन-अमेरिकन चित्रपट निर्मात्या सुझॅन अँड्र्यूज कोरिया यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ‘द हंट्रेस’ (ला काझादोरा) हा स्पॅनिश भाषेतील थरारपट असून, मेक्सिकोतील सियुदाद जुआरेझ शहरात महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या सत्य घटनांवर हा चित्रपट आधारित आहे.

अक्वी: निवडीवर उभारलेले कुटुंब
18 मे 2026 रोजी कान्स चित्रपट महोत्सवात प्रथम प्रदर्शित झालेला ‘अक्वी’ हा 2026 मधील चित्रपट आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान आयोजित इफ्फी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात त्याचे प्रदर्शन होत आहे. कोएत्झी यांच्या ‘जीझस’ या तीन भागांच्या कादंबरीमालिकेवर आधारित या चित्रपटात एका अनोख्या समाजाचे चित्रण केले आहे. या समाजातील लोकांना आपल्या भूतकाळाच्या कोणत्याही आठवणी नसतात. त्यांच्या स्मृती पुसून टाकल्या जातात आणि सर्वांना ठरावीक नियमांनुसारच जीवन जगणे बंधनकारक असते.
या चित्रपटाची कथा सिमोनभोवती फिरते. नव्या जगाच्या प्रवासात त्याला डेव्हिड नावाचा एक लहान मुलगा भेटतो आणि तो त्याला आपल्यासोबत घेऊन येतो. या मुलाला आईची गरज आहे, असे सिमोनला वाटते. त्यामुळे तो इनेसला भेटतो आणि मुलाचे संगोपन करण्यासाठी तिची मदत घेतो. इनेसही त्यासाठी तयार होते. अशा प्रकारे हे तिघे मिळून हळूहळू एका वेगळ्या प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती करतात. मात्र, समाजाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच वागण्यास डेव्हिड तयार नसल्याने त्याला समाजात सहज स्थान मिळत नाही. तो आपल्या कल्पक विचारांनी आणि स्वतंत्र वृत्तीने समाजाच्या ठरावीक चौकटींना छेद देतो. मुलाचे संगोपन करणे ही अनेक प्रश्न आणि आव्हाने असलेली प्रक्रिया आहे. या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत, याची जाणीव सिमोन आणि इनेसला होते.

दिग्दर्शक टियागो गुएडेस म्हणाले की, माणूस असणे म्हणजे नेमके काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. तसेच, प्रत्येकाने विचार आणि चिंतन करावे असे काही तात्त्विक प्रश्नही हा चित्रपट उपस्थित करतो. कोएत्झी यांच्या पुस्तकांचे चित्रपटात रूपांतर करताना त्यांनी कथानकापेक्षा त्या कथेतून निर्माण होणाऱ्या भावनांवर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पुस्तकातील मूळ आशयाची तीव्रता चित्रपटाच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
कुटुंब हे नेहमीच रक्ताच्या नात्यांनी बनत नाही, तर धर्म किंवा देवतांचा आधार न घेता, एका गहन मानवी अनुभवांच्या आधारे घेतलेल्या निर्णयांनी बनते हा विचार देखील गुएडेस समोर आणतात. स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेत 'येथे' (Here) असा अर्थ असलेले शीर्षकही हेच प्रतिबिंबित करते. पात्रे जसजसे आपले निर्णय घेतात , तसतसा कॅमेरा हळूवारपणे वाइड शॉट्सकडून क्लोज अप शॉट्सकडे सरकतो, त्यामुळे प्रेक्षक त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. गेडेस यांनी चित्रपटात काही ठिकाणी मौन आणि संदिग्धता देखील ठेवली आहे , जेणेकरून प्रेक्षक कथेचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावू शकतील. 'अक्वी' हा चित्रपट जानेवारी महिन्यात पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
द हंट्रेस: अ क्राय फॉर जस्टीस
'द हंट्रेस' (ला काझाडोरा) हा सुझॅन अँड्र्यूज कोरिया द्वारा लिखित आणि दिग्दर्शित 2026 सालचा स्पॅनिश भाषेतील एक नाट्यमय थरारपट आहे. यात एड्रियाना पाझ हिने सिउदाद जुआरेझमधील एका कारखान्यात काम करणाऱ्या आणि लैंगिक अत्याचारातून वाचलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे, जी स्वतःच न्याय मिळवण्याचा मार्ग निवडते. हा चित्रपट महिलांविरोधातील हिंसाचाराच्या वास्तविक घटनांवर आणि 2013 मधील 'डायना, हंटर ऑफ द बस ड्रायव्हर्स' या प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणात एका अज्ञात व्यक्तीने बस चालकांना गोळ्या घालून ठार मारले होते.त्यावेळी अशा गुन्ह्यांसाठी दोषींना शिक्षा देण्याची तरतूद नव्हती.

मेक्सिको आणि टेक्सासच्या सीमावर्ती भागात चित्रित झालेला हा चित्रपट, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या आणि लैंगिक हिंसाचार व शोषणाला सामोरे गेलेल्या महिलांचे अनुभव कथन करतो. ही कथा 24 तासांच्या कालावधीत घडते. ज्यात नायिकेचे अनुभव आणि तिचा न्यायासाठीचा संघर्ष यावर लक्ष केंद्रित केले आहे.
कोरिया यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश प्रेक्षकांना मुख्य पात्राच्या असहायतेचा आणि हतबलतेचा एक 'संवेदनशील अनुभव' देणे हा होता, जेणेकरून मदतीसाठी केलेल्या आर्त हाकांना प्रतिसाद न मिळाल्यावर तिने न्याय आणि सूड घेण्याचा निर्णय स्वतःच्या हातांत का घेतला, हे प्रेक्षकांना समजून घेता येईल. हा चित्रपट न्यायाच्या दिशेने बदल घडवून आणण्याचे आणि महिलांविरुद्ध आजही घडणाऱ्या गुन्ह्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो
कोरिया यांनी सांगितले की, इतर प्रकल्पांवर काम करत असतानाच, हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्यांना दहा वर्षे लागली. या प्रवासातून त्यांना शिकायला मिळाले की, चित्रपट निर्मितीमध्ये चिकाटी आणि समर्पणासोबतच 'कथेशी जोडून राहण्याची' दृष्टी असणे आवश्यक असते; तसेच सहाय्यक चित्रपट तंत्रज्ञ , कलाकार आणि प्रेक्षक यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधण्याचे मार्ग शोधणेही महत्त्वाचे असते. गुएडेस प्रमाणेच, त्यांचाही उद्देश केवळ कथेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रेक्षकांपर्यंत 'भावना' पोहोचवणे हा होता. सुरुवातीला त्यांना भीती वाटली होती की, प्रत्यक्ष जीवनातील संदर्भांशिवाय ही कथा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना कदाचित भावणार नाही; परंतु मुख्य पात्राची भीती आणि तिच्या भावना जेव्हा विविध संस्कृतींमधील आणि सीमापारच्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात, तेव्हा त्यांना एकाच वेळी दुःखही झाले आणि नम्रतेची जाणीवही झाली.
या सत्राचे सूत्रसंचालन श्रीयांका चॅटर्जी यांनी केले.
सीमारहित कथा
यातील एक गोष्ट आठवणी नसलेल्या काल्पनिक विश्वावर आधारित आहे आणि दुसरी एका वास्तविक सीमावर्ती शहरात , तरीही 'अक्वी' (Aquí) आणि 'द हंट्रेस' (The Huntress) एका समान बिंदूवर येऊन मिळतात: हे चित्रपट बुद्धीच्या आधी थेट हृदयाला साद घालतात. दोन्ही दिग्दर्शकांनी कथानकापेक्षा भावनांना अधिक महत्त्व दिले आहे आणि याच भावनांच्या माध्यमातून मानवी संबंध, कुटुंबाचा अर्थ, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि न्यायाचा शोध यांसारख्या कठीण प्रश्नांना वाचा फोडली आहे. विशिष्ट सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारलेल्या कथा कशा प्रकारे भाषा आणि सीमांच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांना भिडतात हे या चित्रपटांतून दिसून येते. यातून यंदाची इफ्फीची 'सीमारहित कथा' (Stories Without Borders) ही संकल्पना प्रतिबिंबित होते.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/सुषमा काणे/दर्शना राणे