राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नेपाळच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 23 NOV 2026 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

नेपाळचे पंतप्रधान सन्माननीय बालेंद्र शाह यांनी आज (23 नोव्हेंबर 2026) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.

राष्ट्रपती भवनात नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी मार्च 2026 च्या निवडणुकीत मिळालेल्या भक्कम जनादेशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो, अशा शुभेच्छा दिल्या.

भोटेकोशी पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपतींनी शोकभावना व्यक्त केली. या कठीण प्रसंगी भारत नेपाळच्या पाठीशी नेहमीप्रमाणेच खंबीरपणे उभा राहिला असून, भारताने तातडीने मानवतावादी मदत आणि तांत्रिक सहाय्य पुरवले आहे, असे त्या म्हणाल्या. पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमध्ये एक जवळचा भागीदार म्हणून भारत यापुढेही असेच सहकार्य करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हवामान बदल हे दोन्ही देशांपुढील एक सामायिक आव्हान असल्याचे अधोरेखित करून, पूर्वसूचना प्रणाली आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

भारत-नेपाळमधील अनोखे आणि बहुआयामी संबंध हे आपल्या सामायिक सांस्कृतिक वारशावर आणि दोन्ही देशांतील जनतेमधील अतूट, जिव्हाळ्याच्या बंधांवर आधारित असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले.

या दौऱ्यादरम्यान जाहीर करण्यात आलेले 'संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवज' हे दोन्ही देशांतील जनतेच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे त्या म्हणाल्या. व्यापार आणि गुंतवणूक, पायाभूत सुविधा, विकास भागीदारी, दळणवळण संपर्कव्यवस्था , सांस्कृतिक व जनतेमधील परस्पर संवाद, तसेच स्टार्ट-अप्स, डिजिटल सेवा, अंतराळ आणि नवोपक्रम यांसारख्या नवीन व उदयोन्मुख क्षेत्रांतील आपल्या भविष्यातील सहकार्याला यातून स्पष्ट दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2340646) अभ्यागत कक्ष : 6