गोवा, 22 नोव्हेंबर 2026
गोव्यात सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये आज ब्रिक्स चित्रपट महोत्सव गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. सिनेमाची भाषा जरी वेगवेगळी असली, तरी त्यातील भावना सीमा ओलांडून प्रवास करत असतात. परस्परांशी सामायिक होणारी ही भाषाच या गोलमेज परिषदेच्या केंद्रस्थानी होती. या परिषदेत ब्रिक्स सदस्य देशांनी परस्परांमधील अधिकाधिक सहकार्याच्या संधींच्या शक्यतांवर विचारविनिमय केला. या परिषदेतील चर्चा प्रामुख्याने सह निर्मिती, चित्रपट वितरण, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि सांस्कृतिक भागीदारी या विषयांवर भर देणारी होती
या गोलमेज परिषदेत रशिया, नायजेरिया, इंडोनेशिया आणि इराणमधील प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच माहिती आणि प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेचे अधिकारीही या परिषदेत उपस्थित होते.
_20261122192013_91d0a5.jpeg)
या परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांनी भारताची भूमिका मांडली. परस्पर सामायिक हिताचे विषय आणि दीर्घकालीन भागीदारीच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. सिनेमा लोकांना परस्परांशी जोडतो आणि विविध समाजांची ओळख करून देतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपटांच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या विविध शैली आणि विषय प्रेक्षकांना नव्या दृष्टिकोनाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरतात असे ते म्हणाले.
मुंबईत आयोजित केलेल्या ब्रिक्स वेव्हज बाजारचाही उल्लेखही त्यांनी केला. या उपक्रमात आंतरराष्ट्रीय सह निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, अॅनिमेशन, गेमिंग आणि महिला नेतृत्व अशा विविधांनी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. एकत्र काम करण्याबाबतचा कल वाढत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. सहभागी देशांमधून निर्मितीसाठीचे भागीदार शोधण्याच्या संधी यानिमित्ताने उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सह निर्मितीसाठी आखलेल्या अधिक सक्षम उपक्रमांची तसेच डिजिटल दूरचित्रवाणी आणि ओटीटी व्यासपीठांच्या माध्यमातून आशयाची अधिकाधिक देवाणघेवाण होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दीर्घकालीन भागीदारीच्या अनुषंगाने या घडामोडींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी सहभागींना केले.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव शंभू एल. हक्की यांनीही आपले विचार मांडले. इथल्या सहभागाने सांस्कृतिक संवादाच्या माध्यमातून ब्रिक्स अंतर्गत भागीदारीचा अनुभव घेण्याची संधी या परिषदेने उपलब्ध करून दिली आहे, असे ते म्हणाले. सिनेमा हा केवळ एखाद्या राष्ट्राचे प्रतिबिंब नसून ते परस्परांना समजून घेण्याचे एक माध्यमही आहे, असे ते म्हणाले. आपल्या संवादात त्यांनी सीमाविरहित कथा या यंदाच्या महोत्सवाच्या संकल्पनेचा संदर्भही मांडला. ब्रिक्स देशांतील चित्रपटातून भागीदार देशांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीची झलक दिसते, यामुळे संस्थात्मक सहकार्यापलीकडे जात परस्परांना समजून घेण्याच्या बाबतीतही भर पडते असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांनी मुंबईत झालेल्या ब्रिक्स वेव्हज बाजारचे महत्त्व आपल्या निवेदनातून अधोरेखित केले. ब्रिक्स देशांमधील चित्रपटकर्मी आणि चित्रपट उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणण्याचा पाया या उपक्रमामुळे रचला गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने तसेच सामूहिक कथात्मक मांडणीसाठीच्या संधी निर्माण करण्याच्या प्रक्रियेत चित्रपटांची सह निर्मितीमध्ये उपयुक्त ठरू शकते ही बाबही त्यांनी नमूद केली.

गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदकर यांनी गोव्याचे वर्णन चित्रपट आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र असे केले. चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करत असले, तरी त्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना वैश्विक असतात, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे इतर देशांच्या संस्कृती आणि अनुभव समजून घेण्यासाठी चित्रपट हे प्रेक्षकांसाठी एक प्रभावी माध्यम ठरतात, असे त्यांनी सांगितले.
सहभागी देशांच्या प्रतिनिधींनीही सहकार्याच्या विविध शक्यतांवर प्रकाश टाकला. भारतातील नायजेरियाच्या संघीय प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त महामहिम सैदु दाहिरू मुहम्मद यांनी नायजेरियातील सशक्त चित्रपटसृष्टीविषयी माहिती दिली आणि महोत्सवात नायजेरियन चित्रपटांचा समावेश केल्याबद्दल स्वागत केले. सहनिर्मिती आणि वितरण ही सहकार्याची आशादायी क्षेत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईतील रशियन फेडरेशनच्या वाणिज्य दूतावासाचे प्रभारी महावाणिज्यदूत अलेक्झांडर फुर्सोव्ह यांनी चित्रपटांच्या सीमापार जाण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला. भारत आणि रशिया यांच्यातील चित्रपट महोत्सवांमधील देवाणघेवाण ही सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील इंडोनेशिया प्रजासत्ताकाच्या दूतावासाच्या प्रथम सचिव एर्नी वाह्युनी यांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील दीर्घकालीन सांस्कृतिक संबंधांविषयी सांगितले. रामायण आणि महाभारताशी संबंधित दोन्ही देशांतील समान परंपरांमधून हे संबंध प्रतिबिंबित होतात, असे त्यांनी नमूद केले. सहनिर्मितीच्या संधींचा शोध घेण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांसाठी परिचय दौरा आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. तसेच ओटीटी व्यासपीठांच्या माध्यमातून चित्रपटांचे वितरण वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. चलचित्र निर्मीती आणि संगणकीय खेळ ही सहकार्याची संभाव्य क्षेत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील उपक्रमांमध्ये सांस्कृतिक प्रतिनिधी, निर्माते आणि चलचित्र निर्मिती क्षेत्रातील व्यावसायिकांना सहभागी करून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाचे उपप्रमुख डॉ. मोस्तफा गोहरिफर यांनी विविध समाजांना समजून घेण्यासंबंधीच्या चर्चांसाठी गोव्याची सांस्कृतिक विविधता हे योग्य ठिकाण असल्याचे सांगितले. चित्रपटांमधून देश आणि तेथील लोकांविषयी एक वेगळी अंतर्दृष्टी मिळते, असे त्यांनी नमूद केले. या संमेलनातून चित्रपटसृष्टी आणि विविध समुदायांमध्ये व्यापक सहकार्य निर्माण होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
समारोपाच्या भाषणात जी. कृष्णकुमार यांनी देश आणि संस्कृतींना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून चित्रपटांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. सामूहिक प्रयत्नांतून चित्रपटांच्या माध्यमातून सहकार्याच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
ब्रिक्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होत असलेल्या ब्रिक्स देशांतील चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या लघुचित्रफितीच्या प्रदर्शनाने या गोलमेज चर्चेचा समारोप झाला. या चित्रफितीतून संबंधित देशांतील चित्रपट परंपरांच्या विविधतेचा उत्सव साजरा करण्यात आला.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/नितीन गायकवाड/दर्शना राणे