गोवा, 22 नोव्हेंबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तिसऱ्या दिवशी भारतीय पौराणिक कथेचा चिरंतन वारसा जागतिक चित्रपट मंचावर अधोरेखित झाला. नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित भव्य चित्रपट ‘रामायण : राइज ऑफ अ लेजेंड’ (भाग 1) याचे प्रदर्शन ‘फिल्म्स फ्रॉम ब्रिक्स’ या विभागातील उद्घाटनाचा अधिकृत चित्रपट म्हणून करण्यात आले.
भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक चिरंतन महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणावर आधारित हा चित्रपट पिढ्यान्पिढ्या आणि विविध संस्कृतींमधून प्रवास करत आलेली कथा आंतरराष्ट्रीय चित्रपट मंचावर घेऊन आला आहे. या विभागाच्या उद्घाटनासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आल्याने भौगोलिक आणि भाषिक सीमा ओलांडून लोकांना जोडण्याचे चित्रपट माध्यमाचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या चित्रपटांच्या विशेष सादरीकरणाची दमदार सुरुवात झाली.
_20261122200134_8e531a.jpeg)
उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी सहभागी देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. नायजेरियाच्या फेडरल रिपब्लिकच्या उच्चायुक्तालयाचे राजदूत सईदू दाहिरू मोहम्मद यांचा सन्मान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात यांच्या हस्ते करण्यात आला.
इंडोनेशिया प्रजासत्ताकाच्या दूतावासाच्या प्रभारी राजनैतिक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एर्नी वाह्युनी आणि मुंबईतील रशियन फेडरेशनच्या वाणिज्य दूतावासाचे कार्यवाहक वाणिज्यदूत अलेक्झांडर फुर्सोव यांचा सन्मान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव शंभू लिंगप्पा हक्की यांच्या हस्ते करण्यात आला.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे उपराजदूत डॉ. मोस्तफा गोहरिफर आणि भारतातील आयपीआयएसचे प्रतिनिधी डॉ. ओमिद बाबेलियन यांचा सन्मान राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

इंडोनेशिया प्रजासत्ताकाच्या दूतावासातील कोषागार विभागाच्या प्रतिनिधी मेइलिझा करुनिया हरहाप यांचाही जी. कृष्णकुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
‘फिल्म्स फ्रॉम ब्रिक्स’ विभागाचा उद्घाटन चित्रपट ठरलेल्या ‘रामायण : राइज ऑफ अ लेजेंड’ (भाग 1) या चित्रपटाच्या योगदानाबद्दल महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘ब्रिक्समधील चित्रपट’ (Films from BRICS) हा चित्रपट महोत्सव मनोरंजनापलीकडे जाऊन चित्रपटांचे महत्त्व अधोरेखित करतो. चित्रपट हे विविध समाजांचे जीवन, मूल्ये, परंपरा आणि आकांक्षा जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून देशांना आपला दृष्टिकोन मांडता येतो, तसेच प्रेक्षकांना आपल्या देशाच्या सीमांपलीकडील संस्कृती समजून घेण्याची संधी मिळते. या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स व्यासपीठामुळे लोकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करणे, सर्जनशील सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि जागतिक दक्षिणेकडील देशांच्या चित्रपटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे शक्य होते.

या सर्व चित्रपटांमुळे ‘ब्रिक्समधील चित्रपट’ हा विभाग सांस्कृतिक विविधतेचा आणि समान मानवी अनुभवांचा उत्सव ठरतो. जगाच्या विविध भागांतील कथा एकाच पडद्यावर सादर करून इफ्फी परस्पर आदर वाढवणे, सांस्कृतिक संबंध दृढ करणे आणि विविध राष्ट्रांमध्ये अधिक सखोल समज निर्माण करणे यामध्ये चित्रपटांची भूमिका अधोरेखित करतो. हा चित्रपट विभाग ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात ‘संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे’ या संकल्पनेचे प्रतिबिंब असून, भाषा, इतिहास आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी कथाकथनाच्या माध्यमातून लोकांना एकमेकांच्या जवळ आणता येते, हे अधोरेखित करतो.
सीमाविरहित कथा: ‘ब्रिक्समधील चित्रपट’ विभागातून सांस्कृतिक विविधतेचा उत्सव
11 सदस्य देश आणि 10 भागीदार राष्ट्रांमधील चित्रपटांचा समावेश असलेला, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57 व्या आवृत्तीतील ‘ब्रिक्समधील चित्रपट’ हा विभाग विविध शैली, भाषा आणि जीवनानुभवांवर आधारित समकालीन चित्रपटांचा अनोखा संगम घडवून आणतो.
भव्य पौराणिक कथानक आणि ऐतिहासिक घटनांचे अॅनिमेशनच्या माध्यमातून केलेले पुनर्कथन मांडणाऱ्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण : राइज ऑफ अ लिजेंड (भाग 1)’ तसेच ब्रेंडा लिगिया आणि एडू फेलिस्टोक यांच्या ‘अमादेओ अँड द हायपोथेटिकल न्यू वर्ल्ड’ या चित्रपटांपासून ते मानवी जीवनातील भावभावना उलगडणाऱ्या नाट्यपूर्ण आणि विविध चित्रपटशैलींचा संगम साधणाऱ्या कलाकृतींपर्यंत या विभागात विविध विषयांचा समावेश आहे.
या विभागात गुयेन होआंग डिएप यांचा ‘1982’, सोमपोट चिडगासोर्नपोंगसे यांचा ‘9 टेम्पल्स टू हेवन’, आंद्रेई येगोरोव्ह यांचा ‘अँड द स्नो वॉज फॉलिंग’, नायला अल खाजा यांचा ‘बाब’, अरिफ झुलकर्नेन यांचा ‘बागा : टुमारो बिलॉन्ग्स टू नो वन’, लुईस अर्नेस्टो डोनास यांचा ‘बाराकोआ’, अनास्तासिया कुझिना यांचा ‘बो बो’, रशीद मलिकोव्ह यांचा ‘कॉटन’ आणि कॅट्रिन वेबर यांचा ‘ड्रीमिंग ऑफ सेरेनाडा’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमधून कौटुंबिक आठवणी, सामाजिक दबाव, संघर्षातून उभे राहण्याची जिद्द आणि पर्यावरणाशी असलेले नाते अशा विविध विषयांचा वेध घेण्यात आला आहे.
यंदाच्या ‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेअंतर्गत एकत्र आलेला हा चित्रपट समूह, ब्रिक्स समूहातील देशांमधील चित्रपट त्यांच्या स्वतंत्र सांस्कृतिक ओळखीचे दर्शन घडवतानाच सार्वत्रिक मानवी भावभावनांनाही कसा स्पर्श करतात, हे अधोरेखित करतो.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे