57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

इंडिया सिने हब या व्यासपीठामुळे चित्रीकरणाच्या परवानग्या सुलभतेने मिळू लागल्या, निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून भारताबद्दलची पंसंतीही वाढली


इंडिया सिने हबच्या माध्यमातून चित्रीकरणाशी संबंधित विविध परवानग्या एकाच डिजिटल व्यासपीठावरून उपलब्ध झाल्या : 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमधील निमंत्रितांच्या परिसंवादातील सहभागींचे प्रतिपादन

Posted On: 22 NOV 2026 4:44PMby PIB MumbaiRelease ID: 2340046Views: 4

गोवा, 22 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये " चित्रीकरण झाले सुलभ : जागतिक चित्रीकरण आणि निर्मितीचे केंद्र म्हणून भारताचा उदय "  या विषयावर निमंत्रितांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत निमंत्रितांनी जागतिक चित्रीकरण आणि चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून भारताची वाढती क्षमता अधोरेखित केली. यानिमित्ताने सहभागी झालेल्या धोरणकर्ते आणि चित्रपट उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या धुरंधरांनी  आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती क्षेत्रात देशाचे स्थान अधिक बळकट करण्याच्या संधींबाबत चर्चा केली.

या परिसंवादात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव पृथुल कुमार, स्क्रीन ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रॅने ब्रंडसन आणि ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अनुपम खेर सहभागी झाले होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झालेले आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे चालवल्या जात असलेल्या इंडिया सिने हब  या एकखिडकी डिजिटल व्यासपीठामुळे भारतात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया कशा रितीने सुलभ झाली आहे, याबद्दलचा आढावा या चर्चेतून घेण्यात आला. चित्रपट समीक्षक आणि पत्रकार राजीव मसंद यांनी या परिसंवादाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

इंडिया सिने हब पोर्टलशी राज्य सरकारे जोडली जात असून ही उपाययोजना चित्रीकरणाच्या परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे पृथुल कुमार यांनी सांगितले. या व्यासपीठामुळे आता चित्रपटकर्मी एकाच सामायिक अर्जाचा वापर करून महानगरपालिका, वाहतूक विभाग, भारतीय रेल्वे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांसारख्या विविध प्राधिकरणांकडून एकाच डिजिटल माध्यमाद्वारे परवानग्या मिळवू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.

या व्यासपीठासोबत सुमारे 32 सेवा जोडलेल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. या व्यापसीठावरील एका डॅशबोर्डाद्वारे अर्जदार आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतात, यासोबतच आवश्यक तिथे सुरक्षितपणे पेमेंट लिंकद्वारे शुल्क भरण्याची सुविधाही पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. डिजिटल स्काय या व्यासपीठावर उपलब्ध असलेल्या ड्रोनशी संबंधित परवानग्यांच्या प्रक्रियांचे एकात्मिकरण करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतात चित्रीकरण करणे अधिकाधिक सुलभ होत असल्याची बाब कुमार यांनी ठळकपणे अधोरेखित केली. आंतरराष्ट्रीय चित्रपट चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी 28 दिवसांचा विहित कालावधी निश्चित केलेला आहे, मात्र त्याचवेळी 2015 पासून सरासरी केवळ 18 दिवसांमध्येच या परवानग्या दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेशातील अभिमत मंजुरी विषयक तरतुदीचाही दाखला त्यांनी दिला. या तरतुदीनुसार, 15 दिवसांच्या आत अर्जावर कोणताही निर्णय कळवला न गेल्यास, त्या अर्जाला मंजुरी मिळाल्याचे मानले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रीकरण आणि सह निर्मितीचे केंद्र म्हणून भारताबद्दलची पसंती वाढत असल्याचे कुमार यांनी सांगितले. अशा संधींसाठी भारताकडे विचारणा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थांची संख्या वार्षिक 25 ते 30 वरून 100 ते 200 पर्यंत वाढली असल्याचे ते म्हणाले. जगभरातील चित्रपटकर्मींना भारतातील निर्मिती विषयक संसाधनांचा अनुभव आणि लाभ घेता यावा, यासाठी निर्मिती क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चित्रपट निर्मिती क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी असल्याचे ब्रुंडसन यांनी सांगितले. भारतातील विविध प्रकारची चित्रीकरण स्थळे, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्ती आणि प्रेक्षकांशी चित्रपटांचे असलेले भावनिक नाते यांमुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीसाठी भारत हे आकर्षक ठिकाण ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

ऑस्ट्रेलियात भारतीय चित्रपटांची लोकप्रियता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन चित्रपटांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी भारतीय चित्रपट पाहिला, असे त्यांनी सांगितले. भारतवंशीय नागरिकांची वाढती संख्या आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच व्यावसायिक क्षेत्रांतील दृढ संबंध यांमुळे संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चित्रपट निर्मितीसाठी सरकारचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगताना, ब्रुंडसन म्हणाल्या, प्रत्येक चित्रपट सुरुवात एका नव्या स्टार्टअपची सुरुवात असून एका चमत्कारासारखी असते. त्याची सुरुवात स्वप्नातून किंवा कल्पनेतून होते. मात्र, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी समर्पण, आवड आणि इतरांचे सहकार्य आवश्यक असते.

संयुक्त चित्रपट निर्मिती म्हणजे केवळ आर्थिक सहकार्य आणि जोखीम वाटून घेणे नव्हे, तर त्यातून सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करण्याची संधीही मिळते, असे त्यांनी सांगितले. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्यांना एकमेकांच्या कथाकथनाच्या परंपरांचा अभ्यास करता येईल. तसेच, परदेशात स्थायिक झालेल्या समुदायांचे अनुभव आणि दोन्ही देशांतील समान सामाजिक-सांस्कृतिक पैलू यांवर आधारित, दोन्ही देशांतील प्रेक्षकांना भावतील अशा कथा साकारता येतील, असे त्या म्हणाल्या. भारत सरकारने सुरू केलेल्या इंडिया सिने हब या व्यासपीठाचे कौतुक करताना, अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपट चित्रीकरणासाठी परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया आता बरीच सुधारल्याचे सांगितले. भारतातील विविध भौगोलिक प्रदेश, खाद्यसंस्कृती, वेशभूषा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे चित्रपट निर्मितीसाठी अनेक सर्जनशील शक्यता उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटाला भौगोलिक सीमांचे बंधन नसते, असे सांगताना ते म्हणाले, भावनांना कोणतेही राष्ट्रीयत्व नसते. गरज असते ती केवळ चित्रीकरणाची संधी मिळण्याची.

एक खिडकी प्रणालीचा लाभ केवळ प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांनाच नव्हे, तर नवोदित निर्माते, लेखक, चित्रपट निर्मिती क्षेत्रातील व्यावसायिक आणि दिग्दर्शक होऊ इच्छिणाऱ्यांनाही होत असल्याचे खेर यांनी सांगितले. मात्र, चित्रीकरणाच्या परवानग्या मिळवून देण्याच्या नावाखाली चित्रपट निर्मात्यांचा गैरफायदा घेणारे मध्यस्थ निर्माण होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीसाठी भारत हे पसंतीचे ठिकाण बनण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधी या चर्चेतून अधोरेखित झाल्या. सुलभ परवानगी प्रक्रिया, विविध प्रकारची चित्रीकरण स्थळे आणि सर्जनशील सहकार्याच्या संधी यांमुळे भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनू शकतो, असे या चर्चेतून स्पष्ट झाले.

जागतिक चित्रपट क्षेत्रातील विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारे व्यासपीठ म्हणून इफ्फीची भूमिका महत्त्वाची आहे. चित्रपट उद्योगातील आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक मजबूत करणे आणि चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे यांमुळे जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात, हा मुद्दाही या सत्रात अधोरेखित करण्यात आला.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/तुषार पवार/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340046
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026