57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

वेव्हज बाझारच्या माध्यमातून मौलिक आशयाचा शोध घेण्यासाठी एनएफडीसी आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांच्यात भागीदारी


संयुक्त उपक्रमातून 5 भाषांमध्ये काल्पनिक आणि वास्तवाधारित मौलिक आशयाच्या संकल्पना सादर करण्याचे आवाहन

Posted On: 22 NOV 2026 1:50PMby PIB MumbaiRelease ID: 2339927Views: 11

गोवा, 22 नोव्‍हेंबर 2026

 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांच्यात आज गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सामंजस्य करार झाला. या कराराअंतर्गत वेव्हज बाझार- एसपीएनआय आशय संकल्पना सादरीकरण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देशभरातील लेखक, आशय निर्माते आणि निर्मिती संस्थांना आपापल्या मौलिक काल्पनिक आणि वास्तवाधारित संकल्पना एसपीएनआयसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये या संकल्पना सादर करता येतील.

या उपक्रमांतर्गत काल्पनिक कथांवर आधारित मालिका, टीव्ही आणि ओटीटी आशय, रिअॅलिटी शो, खेळ आणि स्पर्धांवर आधारित कार्यक्रम, कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम तसेच पटकथेचा आधार नसलेल्या अन्य संकल्पना सादर करता येणार आहेत. निवड झालेल्या अर्जदारांना आपल्या संकल्पना एसपीएनआयसमोर सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. त्यानंतर या संकल्पनांचा विचार करून त्यावर आधारित कार्यक्रमांची निर्मिती करण्याची शक्यता तपासली जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले एनएफडीसीचे वेव्हज बाझार हे व्यासपीठ भारतातील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध घटकांना सर्जनशील प्रतिभेशी जोडण्याचे काम करते. या सहकार्यामुळे विशेषतः प्रादेशिक क्षेत्रांतील नव्या आशय निर्मितीच्या संधी वाढतील आणि विविध विचार, अनुभव व दृष्टिकोन व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.  इफ्फी हा चित्रपटसृष्टीचा आणि चित्रपट निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वांचा उत्सव आहे, असे एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार म्हणाले. या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर ते बोलत होते. 

जगभरातील कथा, संस्कृती आणि सर्जनशील प्रतिभा यांना एकत्र आणण्याचे काम हा महोत्सव करतो. चित्रपट आणि त्यातील विविध आवाजांचे वैविध्य हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. सीमांच्या पलीकडच्या कथा ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना चित्रपटसृष्टीचा आत्मा सुंदरपणे व्यक्त करते, असे त्यांनी सांगितले.

वेव्हज बाझार हे व्यासपीठ सर्जनशील प्रतिभा आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध घटकांमध्ये अर्थपूर्ण समन्वय घडवून आणत आहे, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह म्हणाले. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासोबतच्या या भागीदारीमुळे लेखक, आशय निर्माते आणि निर्मिती संस्थांना विविध भाषा आणि स्वरूपांमध्ये आपल्या मौलिक संकल्पना सादर करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.  

देशभरात प्रचंड सर्जनशील प्रतिभा असून, अनेकदा त्यांच्या कल्पनांना प्रस्थापित व्यासपीठांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही, असे सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी म्हणाले. एनएफडीसीच्या वेव्हज बाझारसोबतची ही भागीदारी लेखक आणि आशय निर्मात्यांना विविध भाषा आणि स्वरूपांमध्ये आपल्या मौलिक संकल्पना सादर करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. प्रेक्षकांसाठी नवे दृष्टिकोन आणि वेधक संकल्पना शोधण्याची आम्हाला उत्सुकता आहे, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी अर्ज वेव्हज बाझारच्या (https://wavesbazaar.com) या संकेतस्थळावर स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांमधून परस्पर सहमतीने ठरवलेल्या निकषांच्या आधारे एनएफडीसीकडून निवडक संकल्पनांची प्राथमिक निवड केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या अर्जदारांना आपल्या संकल्पना एसपीएनआयसमोर सादर करण्यासाठी निमंत्रित केले जाईल.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/राज दळेकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339927
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026