गोवा, 21 नोव्हेंबर 2026
57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा (IFFI - International Film Festival of India) एक भाग असलेल्या 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाच्या सहाव्या पर्वाचे आज गोव्यातील कला अकादमी इथे उद्घाटन झाले. हा उपक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरु केला असून, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने (NFDC) हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत यंदा देशभरातील 100 युवा सर्जनशील प्रतिभा एकत्र आल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून या प्रतिभांना परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारी, त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण आणि चित्रपट उद्योगक्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (FTII) कुलसचिव लौकिक पारख, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव के. के. निराला, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गौतम भानोत हे उपस्थित होते.
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सहभागी झालेल्या प्रत्येकाने यापूर्वीच आपली छाप पाडली आहेत, आणि त्यामुळेच आज ते इथे सहभागी झाले आहेत असे ते म्हणाले. या उपक्रमाच्या प्रारंभापासूनचे पुढचे 48 तास या सहभागींना त्यांच्यातील प्रतिभेचे चित्रपटात रूपांतर करण्याची संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपली मुळे ही संस्कृती, भाषा आणि अनुभवांतून घडत असतात, तर स्वप्ने ही कल्पनाशक्ती, कुतूहल आणि काहीतरी नवीन करून पाहण्याच्या धाडसातून निर्माण होतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. फ्रेंच तत्वज्ञ जोसेफ ज्युबर्ट यांच्या विचारांचा संदर्भही त्यांनी मांडला. कल्पनाशक्ती माणसाला स्वप्न पाहायला मदत करते, कलाकौशल्य शिकल्याने त्या स्वप्नांना दिशा मिळते आणि आपली मुळे अशा कथांना त्यांची अभिव्यक्ती मिळवून देतात असे ते म्हणाले.

इथे आलेल्या प्रत्येक सहभागींनी आपल्या कथांची व्याप्ती मर्यादित न ठेवता आपल्या मुळांपासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या एका लहानशा गावातून जन्मलेली कथा जर प्रामाणिकपणे मांडली गेली, तर ती जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ शकते, असे ते म्हणाले.
सिनेमा ही एक सामूहिक कला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. इथे आलेल्या प्रत्येक सहभागींनी एकमेकांचे म्हणणे ऐकावे, आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवावा, प्रयोग करावेत, सर्जनशील जोखीम घ्यावी आणि या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मुळांची सोबत कायम ठेवूनच कल्पनाशक्तीला भरारी घेऊ द्यावी आणि आपल्या कथा जगासमोर मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने 48 तासांच्या कालावधीत चित्रपट निर्मिती करण्याच्या स्पर्धेचा औपचारिक प्रारंभही झाला. हेच या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षणही ठरले. या उद्घाटनासाठी तयार केली गेलेली विशेष चित्रपट स्लेट पारंपरिक पद्धतीने वाजवून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी या स्पर्धेच्या सहाव्या पर्वाचा प्रारंभ झाल्याची घोषणा केली.
2026 च्या स्पर्धेमध्ये दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, संपादन आणि उपशिर्षक लेखन, पटकथा लेखन, पार्श्वगायन, संगीत रचना, ध्वनीमुद्रण, वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, कला दिग्दर्शन, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), ऑगमेंटेड रिॲलिटी (AR), व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), तसेच व्हॉइस-ओव्हर आणि डबिंग या 13 चित्रपट निर्मिती कलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 100 सहभागींचा समावेश आहे.
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) च्या सहकार्याने आयोजित, 48-तासात चित्रपट निर्मिती करण्याच्या स्पर्धेत 5 संघ सहभागी होणार आहेत. हे संघ एकत्रितपणे संकल्पना विकसित करुन 48 तासांच्या निर्मिती कालावधीत लघुपटांची निर्मिती करतील. तयार झालेल्या चित्रपटांचे इफ्फी’मध्ये विशेष प्रदर्शन केले जाईल. तसेच चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांच्या प्रतिष्ठित ज्युरीद्वारे त्यांचे मूल्यांकन केले जाईल.

सीएमओटी टॅलेंट कॅम्पच्या माध्यमातून सहभागी तरुणांना प्रसार माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडण्याची संधी मिळणार आहे. तसेच चित्रपट निर्मिती संस्था, स्टुडिओ, संगीत कंपन्या, ओटीटी व्यासपीठ, ब्रॉडकास्टर आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर भागधारकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार.
2021 मध्ये स्थापन झाल्यापासून, सीएमओटी हे उदयोन्मुख सर्जनशील व्यावसायिकांना प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योगाशी जोडणारे एक व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. या उपक्रमाच्या माजी सहभागींपैकी अनेकांनी आंतरराष्ट्रीय निर्मिती प्रकल्पांमध्ये काम केले असून कान्स, बर्लिनाले, टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार यांसारख्या व्यासपीठांवर आणि महोत्सवांमध्ये त्यांना गौरवण्यात आले आहे. सीएमओटीच्या माध्यमातून विकसित केलेल्या कलागुणांचे व्यवसाय संधीमध्ये रूपांतर होत असल्याचे हे एक उल्लेखनीय उदाहरण बनले आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे