Posted On:
21 NOV 2026 1:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2026
'गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस' (GeM) या राष्ट्रीय सार्वजनिक पोर्टलने, 20 नोव्हेंबर 2026 रोजी 'ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (TICCI) सोबत एक सामंजस्य करार केला आहे. सरकारी खरेदी प्रक्रियेत आदिवासी उद्योजक आणि उपक्रमांचा सहभाग अधिक बळकट करणे, तसेच आदिवासी उद्योगांना सरकारी खरेदीच्या संधींशी जोडणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. यासाठी लक्षित जनजागृती आणि संपर्क उपक्रम, क्षमता बांधणी, नोंदणी प्रक्रियेसाठी सहाय्य तसेच सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य पुरवण्यात येणार आहे.
GeM चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित बी. चव्हाण आणि TICCI चे संस्थापक आणि अध्यक्ष सुधाकर धरावथ यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराद्वारे GeM च्या माध्यमातून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे, आदिवासी उद्योजकांची क्षमता विकसित करणे आणि या प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढवणे या उद्देशाने दोन्ही संस्थांमधील भागीदारीला औपचारिक स्वरूप देण्यात आले आहे.
या सहकार्याबद्दल बोलताना GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार म्हणाले, “TICCI सोबत करण्यात आलेली ही भागीदारी आदिवासी उद्योजकांना सार्वजनिक खरेदीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी उचलण्यात आलेले महत्वाचे पाऊल आहे. त्यांच्यात अधिकाधिक जागरूकता निर्माण करणे, क्षमता बांधणी करणे हे आमचे उद्दिष्ट असून, GeM मध्ये त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करणे आणि GeM च्या पारदर्शक आणि समावेशक खरेदी परिसंस्थेत त्यांचा सहभाग आणखी सुधारण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
या कराराच्या माध्यमातून TICCI आदिवासी उद्योजकांना शोधून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेईल. त्यांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर नेण्याचे काम सुलभ करेल. त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर आवश्यक ते सहाय्य पुरवेल तसेच प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे जाळे विकसित करेल. या प्रयत्नांना पाठबळ म्हणून, GeM प्रशिक्षणविषयक संसाधने उपलब्ध करून देणे, नोंदणी प्रक्रियेत सहाय्य, क्षमता बांधणीचे उपक्रम राबवणे आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा विकसित करणे यासारखे उपक्रम राबवेल. याशिवाय, कृती आराखडे तयार करणे, प्रगतीचा आढावा घेणे आणि सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योजकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाचा समावेश करणे यासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करतील.
या करारावर स्वाक्षरी करताना अजित बी. चव्हाण म्हणाले, “ही भागीदारी विशेष पोहोच उपक्रम, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाद्वारे GeM ला आदिवासी उद्योजकांच्या अधिक जवळ नेण्यास मदत करेल, ज्यामुळे त्यांना सरकारी खरेदीच्या संधींपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचता येईल.”
या सामंजस्य करारामुळे सार्वजनिक खरेदी प्रक्रियेला अधिक सर्वसमावेशक बनवण्याच्या GeM च्या वचनबद्धतेला बळकटी प्रदान करतो. तसेच, विविध पार्श्वभूमीतील उद्योगांना राष्ट्रीय खरेदी परिसंस्थेत सहभागी होण्याची आणि व्यवसाय वाढीच्या संधी मिळवण्याची सुविधा प्राप्त होते.
* * *
आशिष सांगळे/सविता म्हसकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai