सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
Posted On:
20 NOV 2026 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 23 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी), ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) यांच्या नवीन मालिकेसंदर्भात डेटा वापरकर्त्यांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. 2026 या वर्षात या तिन्ही निर्देशकांच्या नवीन मालिका सुरू करण्यात आल्या. या नवीन मालिकांमध्ये करण्यात आलेले पद्धतशीर बदल, वापरलेले माहितीचे स्रोत आणि केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांची ओळख डेटा वापरकर्त्यांना करून देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.
राष्ट्रीय लेखा प्रणालीची वर्ष 2022-23 वर आधारित नवीन मालिका 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये आयआयपी आणि उत्पादक किंमत निर्देशांक (पीपीआय) यांच्या सुधारित मालिकांचा समावेश करून ती अद्ययावत केली.
आधार वर्ष 2024 असलेली सीपीआयची नवीन मालिका 12 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या मालिकेतील वस्तू आणि सेवा विषयक घटकांची व्याप्ती वाढवून त्यात 358 घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 50 सेवांचा समावेश आहे. या घटकांच्या किमती 434 शहरांमधील 1,465 ग्रामीण आणि 1,395 शहरी बाजारपेठांमधून, तसेच 12 ऑनलाइन बाजारपेठांमधून संकलित केल्या आहेत. ग्रामीण भागातील घरभाड्याचा समावेश पहिल्यांदाच केला आहे. तसेच इंधन, विमान प्रवासाचे भाडे, दूरसंचार शुल्क आणि ओटीटी सेवा यांसारख्या घटकांसाठी प्रशासकीय तसेच ई-कॉमर्समधील माहितीचा वापर केला आहे.
वर्ष 2022-23 वर आधारित आयआयपीची नवीन मालिका 1 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या मालिकेचे आधार वर्ष जीडीपी, घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आणि पीपीआय यांच्या आधार वर्षाशी सुसंगत ठेवण्यात आले आहे. या नवीन मालिकेच्या व्याप्तीमध्ये किरकोळ आणि दुर्मिळ खनिजे, इंधन-वायू पुरवठा, पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापन या नवीन क्षेत्रांचा समावेश केला आहे.
- या परिषदेत भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय), सेबी यांचे प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ, संशोधक, वित्तीय संस्था आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध विषयांचे विशेषज्ञ, अधिकृत सांख्यिकी माहितीचे वापरकर्ते आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
उद्घाटन सत्रात सांख्यिकी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग, आरबीआयच्या उप-गव्हर्नर डॉ. पूनम गुप्ता, एचडीएफसीचे माजी अध्यक्ष दीपक पारेख आणि महासंचालक (केंद्रीय सांख्यिकी) डॉ. दलीप सिंह यांची भाषणे होतील.
त्यानंतर जीडीपी, सीपीआय आणि आयआयपी यांच्या नवीन मालिकांवर तीन तांत्रिक सत्रे होणार आहेत. या सत्रांमध्ये मंत्रालय आणि आरबीआय यांच्यातर्फे सादरीकरणे होतील तसेच खुल्या चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. या निर्देशांकांच्या सुधारित मालिकांच्या संकल्पना समजावून देणाऱ्या संक्षिप्त टिपणांचा समावेश असलेली पुस्तिका सहभागींना दिली जाणार आहे.
या परिषदेमुळे डेटा वापरकर्ते आणि अधिकृत सांख्यिकी डेटा संकलक अधिकारी या दोघांनाही नवे बदल आणि त्यांचे परिणाम यांवर थेट चर्चा करण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होईल.
या परिषदेचा उद्देश अधिकृत सांख्यिकी डेटाचे अधिक चांगले आकलन आणि प्रभावी वापराला प्रोत्साहन देणे, तसेच मंत्रालय आणि डेटा वापरकर्त्यांमध्ये परस्परसंवाद बळकट करणे असा आहे.
या महत्त्वपूर्ण सल्लामसलत प्रक्रियेत सर्व संबंधित भागधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपली मते व अनुभव मांडावेत, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
सुवर्णा बेडेकर/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai