Posted On:
20 NOV 2026 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
देशाच्या वैज्ञानिक क्षमता तसेच आत्मनिर्भरतेच्या दिशेने चाललेली देशाची वाटचाल यामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठत, आज भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या आणि सामान्य भाषेत ज्या बर्ड फ्लू म्हणतात त्या एव्हीयन एन्फ़्लुएनझा (एच5एन1) आजारावर पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेली लस देशाला समर्पित केली. याप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी भोपाल येथे सुमारे 300 कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या नव्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या उभारणीची घोषणा केली. परदेशात बोलत असताना, आपल्या देशाच्या संवैधानिक संस्थांवर आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांवर त्यांनी टीका केली. प्रती मात्रा 1 ते 2 रुपये इतक्या किफायतशीर दरात बर्ड फ्लूच्या विशिष्ट प्रकाराला प्रतिबंध करणारी जगातील ही पहिली लस आहे. ही लस, कुक्कुटपालन क्षेत्रात रोगप्रतिबंध बळकट करेल, लाखो कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करेल आणि पशुंच्या आजारांमुळे होणारे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत करेल.

सदर कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधत केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की, हे नेते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणाले की जे नेते परदेशी जातात आणि स्वतःच्याच देशाची प्रतिमा मलीन करतात त्यांनी, भारताने विविध क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिऱी आणि वाढत्या वैज्ञानिक क्षमता लक्षात घ्यायला हव्या. देशाच्या पहिल्याच बर्ड फ्लू विरोधी लसीचे विकसन हे देशाचे वैज्ञानिक सामर्थ्य आणि स्वावलंबनाचे आणखी एक उदाहरण आहे असे ते पुढे म्हणाले.

भोपाळ येथील आयसीएआर-राष्ट्रीय उच्च सुरक्षितता पशु आजार संस्थेचे (एनआयएचएसएडी) यश अधोरेखित करत केंद्रीय मंत्री चौहान यांनी भोपाळ शहरात 300 कोटी रुपये खर्चून नवीन, अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा केली.
पशुपालन आणि कुक्कुटपालन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, असे चौहान म्हणाले. शेतीबरोबरच पशुधन हे शेतकऱ्यांसाठी ‘फिरते एटीएम’ ठरते. त्यातून शेतकऱ्यांना दरमहा नियमित उत्पन्न मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये पशुपालन क्षेत्राचा वाटा 14 टक्के, तर कुक्कुटपालन क्षेत्राचा वाटा आणखी 1 टक्का आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. काही मोठ्या प्रमाणावर होणा-या पशुरोगांमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘फूट अँड माऊथ डिसीज’ म्हणजेच लाळ्या-खुरकूत रोगामुळे दरवर्षी सरासरी ₹22,000 कोटींचे नुकसान होते. लम्पी स्किन डिसीज (लम्पी त्वचारोग) यामुळे ₹20,000 कोटी, ब्रुसेलोसिसमुळे ₹9,212 कोटी, तर पेस्ट डेस पेटिट्स रुमिनंट्स ( कमी प्रमाणात खूप सावकाश रवंथ करणाऱ्या प्राण्यांना होणारा रोग) यामुळे ₹4,683 कोटींचे नुकसान होते. या सर्व रोगांमुळे देशाचे आणि शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे ₹56,000 कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुधनाचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे आणि हे आर्थिक नुकसान कमी करणे यासाठी स्वदेशी लसी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे ते म्हणाले.

भारतात बर्ड फ्लूचा (पक्षी तापाचा) पहिला प्रादुर्भाव 2006 मध्ये महाराष्ट्रातील नवापूर येथे झाला होता. या प्रादुर्भावात 10 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, अशी आठवण चौहान यांनी करून दिली. 2006 पासून देशात बर्ड फ्लूचे 500 हून अधिक प्रादुर्भाव झाले आहेत. त्यामुळे कुक्कुटपालन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. या रोगाचा संसर्ग सस्तन प्राणी आणि मानवांमध्येही होण्याचा धोका असल्याने, त्याचा प्रभावी प्रतिबंध आणि नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. नवीन स्वदेशी लस लहान कुक्कुटपालन शेतकऱ्यांनाही परवडावी, यासाठी तिची किंमत प्रति डोस केवळ ₹1 ते ₹2 ठेवण्यात आली आहे. या कमी किमतीमुळे प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक सुलभ होईल आणि देशभरातील कुक्कुटपालन शेतकऱ्यांची उपजीविका सुरक्षित ठेवण्यास मदत होईल, असे मंत्री म्हणाले.
प्रमुख पशुरोगांवर लसीकरणाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे चौहान यांनी सांगितले.
या लसीच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव करताना चौहान यांनी त्यांना या यशाचे खरे नायक म्हटले. त्यांच्या असाधारण बांधिलकीचे आणि समर्पणाचे त्यांनी कौतुक केले. संशोधन पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही न घेता अनेक महिने सातत्याने काम केले, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या शिस्तीशी आणि त्यागाशी शास्त्रज्ञांचे समर्पण मिळतेजुळते आहे, असे सांगत चौहान यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. हे यश भारतीय वैज्ञानिक समुदायाच्या असाधारण चिकाटीचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.
सुवर्णा बेडेकर /संजना चिटणीस/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai