Posted On:
20 NOV 2026 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज दिल्ली विद्यापीठाच्या 103 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधरांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा, उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटचालीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अलिकडच्या काळात देशात घडून आलेल्या आर्थिक स्थित्यंतराबद्दलही त्यांनी सांगितले. एका दशकभरापूर्वी देशातल्या स्टार्टअप्सची संख्या काही शे इतकीच होती, मात्र आज देशाने जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे, आजमितीला देशात 2.5 लाख स्टार्टअप आणि 130 पेक्षा जास्त युनिकॉर्न कार्यरत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. युवा भारतीय आता नोकरी मागणारे न राहता अधिकाधिक प्रमाणात नोकरी देणारे बनू लागले आहेत. तसेच ते प्रयोग करण्याची तयारी, अपयश स्वीकारण्याची मानसिकता आणि नवी आव्हाने पेलण्याचे धाडस दाखवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकसित भारत 2047 च्या दिशेने देशाच्या सुरु असलेल्या वाटचालीचा भार हा देशभरातल्या युवा वर्गाच्या खांद्यावर असल्याचे ते म्हणाले. पदवीधर झालेले युवा आपापल्या कारकिर्दीत जसजशी प्रगती साधत जातील, तसतशी त्यांच्याकडे समाजातील कमी सुविधाप्राप्त आणि वंचित घटकांसाठी चांगले भविष्य घडवण्याच्याही प्रचंड संधी असतील असे त्यांनी सांगितले. जे अशा प्रकारच्या संधींपासून वंचित राहीले आहेत, त्यांच्या भविष्याशी पदवीधर युवा वर्गाचे भविष्य जोडलेले असल्याचे गोयल यांनी सांगितले. देशातल्या पदवीधर युवांनी समाजातल्या अशा घटकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकलो तरी त्यातून मिळणारे समाधान अमर्याद असते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी गोयल यांनी यशाची सहा सूत्रे युवा पदवीधर विद्यार्थ्यांसमोर मांडली. पदवीधर युवा वर्गाने मोठा विचार करावा, सकारात्मक राहावे, आपले लक्ष विचलीत होऊ देऊ नये, सातत्यपूर्णतेने शिकत राहावे, आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि आपल्या संघर्षावर विश्वास ठेवावा असा प्रोत्साहनपर सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पदवीधर होऊन विद्यापीठातून बाहेर पडत असलेला प्रत्येक विद्यार्थी सक्षम असेल, प्रोत्साहित झालेला असेल आणि त्यांच्याकडे भविष्याबद्दलच्या दृष्टिकोनात अधिक स्पष्टता असेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. विद्यार्थी म्हणजे अखंड ऊर्जेची राष्ट्रीय संपत्ती असते असे ते म्हणाले. हेच विद्यार्थी देशाचे भवितव्य घडवतील आणि आपल्या शिक्षकांना, पालकांना तसेच देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी इतिहासातून शिकत राहावे, मात्र इतिहासाला कधीही घाबरू नये असे आवाहन गोयल यांनी केले. अडचणी आणि आव्हाने आली तरी मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि धाडसी उद्दिष्टे गाठण्याचे प्रयत्न सुरुच ठेवावेत, यासोबतच स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवण्याच्या प्रक्रियेत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai