गोवा, 19 नोव्हेंबर 2026
सिंगापूरचे प्रख्यात चित्रपट निर्माते अँथनी चेन यांच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या प्रभावी चित्रपटाच्या प्रदर्शनाने 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) समारोप होणार आहे. 2026 मध्ये निर्मित हा सिंगापूरचा चित्रपट यंदाच्या महोत्सवाचा समारोपीय चित्रपट म्हणून प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट प्रेक्षकांना मानवी नातेसंबंध, कौटुंबिक बंध आणि समकालीन जीवनातील गुंतागुंतीचे एक भावपूर्ण नाट्यमय चित्रण सादर करतो.

समकालीन सिंगापूरच्या विविधरंगी पार्श्वभूमीवर आधारित, ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटात 21 वर्षीय जुनयांग या तरुणाची कथा मांडण्यात आली आहे. त्याचे मुक्त आणि बिनधास्त आयुष्य त्याच्या प्रेमसंबंधांमध्ये अचानक घडलेल्या एका घटनेमुळे बदलून जाते. त्यामुळे त्याला आणि त्याच्या प्रेयसीला अपेक्षेपेक्षा लवकर प्रौढत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागते. त्याच वेळी, जुनयांगच्या कष्टकरी वडिलांच्या आयुष्यातही एका उत्साही स्त्रीचे आगमन होते. त्यामुळे वडील आणि मुलगा यांच्यातील न बोलता टिकून असलेल्या नात्याच्या समतोलात सूक्ष्मबद्दल घडू लागतात. प्रभावी अभिनयाच्या जोरावर, हा चित्रपट दोन्ही पिढ्यांच्या समांतर प्रवास सुंदर पद्धतीने गुंफतो. प्रेम, विरह आणि जबाबदारीचा सामना करताना दोन्ही पिढ्या कौटुंबिक नात्यांच्या व्याख्यांना नव्याने आकार देतात. जन्माने मिळालेली नाती आणि आपण स्वतः निवडलेली नाती यांच्यातील नाजूक बंध ही या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहेत.
'वी आर ऑल स्ट्रेंजर्स' हा अँथनी चेन यांच्या गाजलेल्या 'ग्रोइंग अप' चित्रपट त्रयीमधील नवीन अध्याय आहे. त्यांच्या पहिल्या 'इलो इलो' (2013) या चित्रपटासाठी त्यांना कान्स कॅमेरा डी'ओर पुरस्कार मिळवून दिला होता. त्यानंतर 'वेट सीझन' या चित्रपटातूनही त्यांनी संवेदनशील आणि वास्तववादी कथाकथनाची परंपरा पुढे नेली. गोव्यातील प्रदर्शनापूर्वी, हा चित्रपट 2026 च्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर करण्यात आला होता. मेलबर्न आणि हेलसिंकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही तो प्रशंसेस पात्र ठरला होता.
भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडिसी) यांनी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) यांच्या सहकार्याने आयोजित केलेला 57 वा इफ्फी महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात होणार आहे. ‘सीमांच्या पलीकडील कथा’ ही या महोत्सवाची संकल्पना असून जगभरातील विविध चित्रपट परंपरा, अभिव्यक्ती आणि कथांना या महोत्सवात एकत्र आणले जाणार आहे.
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे