Posted On:
18 NOV 2026 5:32PM by PIB Mumbai
“भारत आणि जपान यांच्यातील वाढते सागरी सहकार्य हे मुक्त, खुल्या व नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्राप्रति उभय देशांचा दृढ विश्वास आणि सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.18 नोव्हेंबर , 2026 रोजी त्यांनी जपानचे संरक्षणमंत्री शिनजिरो कोइझुमी यांच्यासोबत योकोसुका येथील जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या नौदल तळाला भेट दिली. जपानमध्ये आगमन झाल्यानंतर, संरक्षणमंत्र्यांनी आपल्या अधिकृत कार्यक्रमांची सुरुवात जपानच्या संरक्षण मंत्रालयाला दिलेल्या भेटीने केली, जिथे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.



राजनाथ सिंह यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली , त्यानंतर मंत्रालयात दोन्ही मंत्र्यांनी थोडा वेळ संवाद साधला. त्यानंतर, ते जपान सेल्फ-डिफेन्स फोर्सेसच्या हेलिकॉप्टरने जेएमएसडीएफ नौदल तळावर पोहोचले. नौदल तळावर, दोन्ही मंत्र्यांनी 'मोगामी' श्रेणीतील बहुउद्देशीय युद्धनौका 'जेएस नातोरी' ला भेट दिली.

संरक्षण मंत्र्यांनी टोकियोमध्ये भारतीय दूतावासाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वृद्धीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्हाने असूनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास आला आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व वाढ अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, देशांतर्गत संरक्षण उत्पादनाने 1.80 लाख कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे, जो एका दशकापूर्वी 48,000 कोटी रुपये होता. संरक्षण निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली असून, ती 600 कोटी रुपयांवरून 38, 000 कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. हे भारताच्या वाढत्या स्वदेशी क्षमतांचे आणि जागतिक संरक्षण बाजारपेठेतील विस्तारित उपस्थितीचे प्रतीक आहे.

भ्रष्टाचाराप्रति सरकारच्या 'शून्य सहनशीलता' धोरणावर भर देत, संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांमध्ये भ्रष्टाचारावर लक्षणीय नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, कल्याणकारी योजनांचे लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. "आमच्या सरकारच्या सचोटीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही," असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी गरिबी निर्मूलनासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि देशभरात स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांचाही उल्लेख केला.
संरक्षमंत्र्यांचा जपान दौरा दोन दिवसांचा आहे. 19 नोव्हेंबर, 2026 रोजी ते चौथ्या भारत-जपान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय संवादात (2+2) सहभागी होतील आणि जपानच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. टोकियो येथे होणाऱ्या या 2+2 मंत्रीस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे जपानचे शिंजिरो कोइझुमी आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी यांच्यासोबत भूषवतील. राजनाथ सिंह आणि शिंजिरो कोइझुमी यांच्यातील ही द्विपक्षीय भेट या वर्षातील त्यांची तिसरी भेट असेल.
***
Shailesh Patil / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai