वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त व्यापार समितीच्या 14 व्या बैठकीत भारत आणि थायलंडने द्विपक्षीय व्यापार तसेच आर्थिक सहकार्याचा घेतला आढावा


आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारत-थायलंड द्विपक्षीय व्यापारात 12.6 %ची वाढ

युपीआय जोडणी, स्थानिक चलन समायोजन आणि वित्ततंत्रज्ञान सहकार्य या विषयांवर भारत आणि थायलंडमध्‍ये चर्चा

Posted On: 16 NOV 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026

थायलंडमध्ये नोंथाबरी येथे आज, दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी, संयुक्त व्यापार समितीची (जेटीसी) 14 वी बैठक आयोजित करण्यात आली.केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव आणि थायलंडच्या वाणिज्य मंत्रालयातील व्यापार वाटाघाटी विभागाच्या महासंचालक चोतीमा लेम्सावासदीकुल हे या बैठकीचे सह-अध्यक्ष होते. दोन्ही देशांची संबंधित मंत्रालये, विभाग आणि संस्थांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारातील उत्साहवर्धक गतीची नोंद घेतली. दोन्ही देशांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या व्यापारात 12.6 टक्क्यांची वाढ नोंदवत, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हा द्विपक्षीय व्यापार 21.49 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. भारताने आसियान देशांशी केलेल्या एकूण व्यापारापैकी 16.7टक्के व्यापार एकट्या थायलंडशी केला आहे. व्यापार तसेच गुंतवणुकीमध्ये सुलभता आणण्यात जेटीसीच्या भूमिकेची नोंद घेत बैठकीच्या सहअध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापार तसेच गुंतवणुकीत वाढ करण्याप्रती तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याप्रती आपापल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

दोन्ही देशांनी औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा, आयुष आणि पारंपरिक औषधे, वस्त्र-प्रावरणे, प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्स, मौल्यवान रत्ने आणि दागिने तसेच सेवा क्षेत्रातील सहकार्यासाठी संधींची चाचपणी केली. व्यापार प्रोत्साहन संस्थांमधील सहयोगाबद्दल देखील चर्चा करण्यात आली.

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी भारतातील युपीआय प्रणालीची थायलंडच्या ‘प्रॉम्टपे’ प्रणालीशी जोडणी, स्थानिक चलन समायोजन तसेच रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ थायलंड यांच्या दरम्यान वित्ततंत्रज्ञानातील सहकार्य यांसारख्या विषयांसह आर्थिक भरणा आणि वित्तीय जोडणी बाबत देखील विचारविनिमय केला. जेटीसीची यानंतरची बैठक भारतात आयोजित करण्यात आली आहे.


सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2337203) अभ्यागत कक्ष : 12