Posted On:
16 NOV 2026 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, अजित’दादा’ पवार यांच्या अकस्मात निधनामुळे महाराष्ट्राची विशेषतः पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवड या भागांची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कोणत्याही एका व्यक्तीमुळे भरून निघणारी नाही. शाह म्हणाले की, हे संपूर्ण महाराष्ट्राचे इतके मोठे नुकसान आहे की त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही. अजित पवार यांचे जाणे ही आपल्यासाठी वैयक्तिक हानी असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अजित पवार माझे उत्तम मित्र होते. अजितदादांच्या जाण्यामुळे आपण विकासासाठी आवश्यक विषयांची सखोल माहिती असलेला तसेच पंचायती राज, सहकार, कृषी आणि आधुनिक शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ अनुभव तसेच सुस्पष्ट विचार आणि दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला आहे.
अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व इतके उत्साही आणि सकारात्मक होते की, डोळे मिटले तरी ‘दादा’ आपल्यासमोर उभे असल्याचा भास होतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचे. नेहमी प्रसन्न चेहरा, सकारात्मक विचार आणि आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता, असे दुर्मीळ गुण ईश्वराने फार थोड्या व्यक्तींना दिले आहेत, असे शाह यावेळी म्हणाले. अजित पवार स्पष्टवक्ते होते, असेही शाह यांनी सांगितले. एखादे काम होऊ शकत असेल तरच ते ‘हो’ म्हणायचे आणि शक्य नसेल तर स्पष्टपणे ‘नाही’ सांगायचे. अत्यंत कठीण आणि निर्णायक राजकीय वाटाघाटींच्या वेळीही ‘दादा’ नेहमी स्पष्ट आणि परखड भूमिका मांडायचे. त्यांचे उत्तर एकतर ‘हो’ असायचे किंवा ‘नाही’. असे धैर्य फार थोड्या लोकांकडे असते, असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य सहकार क्षेत्रासाठी समर्पित केले आणि या क्षेत्रात मोठे कार्य उभे केले. कामाचे नेमके महत्त्व काय आहे आणि कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यायला हवा, याची त्यांना उत्तम जाण होती, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

दूध सहकारी महासंघ असो, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका किंवा जिल्हा सहकारी बँका, सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाच्या समस्यांचा चालताबोलता ज्ञानकोश म्हटले तर एकच नाव समोर येते आणि ते म्हणजे अजित पवार, असे शाह यांनी सांगितले. सहकार क्षेत्राचे महत्त्व सखोलपणे समजून घेतल्याशिवाय आणि शेतकरी, गावे तसेच गरीब दूध उत्पादक महिलांविषयी मनापासून आस्था असल्याशिवाय हे शक्य होत नाही, असे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील उणिवा, सामर्थ्य आणि प्रशासन यांचे ज्ञान कोणत्याही पुस्तकातून मिळू शकत नाही. या क्षेत्रात तळागाळापासून सर्वोच्च स्तरापर्यंत प्रत्यक्ष काम केल्यावरच अशी समज विकसित होते. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे केवळ उत्तम संगोपनच केले नाही, तर ते अधिक पुढे नेण्यासाठी आणि त्यातील अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले, असे शाह म्हणाले.

उपमुख्यमंत्री असूनही अजित पवार यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जनतेमध्ये राहण्याची आपली सवय कायम जपली होती, असे अमित शाह यांनी सांगितले.

अजित पवार हे आपल्या कामाविषयी अत्यंत समर्पित असलेले नेते होते, असे शाह म्हणाले. ईश्वराने त्यांना खूप लवकर आपल्यातून नेले. त्यांच्या अकाली निधनाने आपण सर्वजण दुःखी आहोत. मात्र, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी घालून दिलेली कार्यसंस्कृती, लोकांच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता, पद्धतशीर नियोजन, शिस्त आणि वेळेत काम पूर्ण करण्याची वृत्ती, महाराष्ट्रातील अनेक तरुण राजकीय नेत्यांना येणाऱ्या काळात प्रेरणा देत राहील, असे शाह यांनी सांगितले.
सुवर्णा बेडेकर /संजना चिटणीस/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai