Posted On:
15 NOV 2026 11:52AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताला प्रगत तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता न बनवता, महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये त्याचा विकासक, नवोन्मेषक आणि जागतिक नेता बनवण्याचे आवाहन केले आहे. संरक्षण सज्जता आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी देशाची विनाशकारी न ठरणाऱ्या चाचणी (एनडीटी) परिसंस्था बळकट करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. 15 नोव्हेंबर 2026 रोजी अ -विनाशकारी मूल्यमापन नॉन-डिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन आणि सक्षम तंत्रज्ञानावरील 36 व्या वार्षिक परिषदेला आणि अवकाश आणि विमानवाहतूक क्षेत्रातील अ-विनाशकारी चाचण्यांवरील 15व्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रगत तपासणी तंत्रज्ञानामध्ये स्वदेशी क्षमता विकसित करणे, सातत्यपूर्ण गुणवत्ता हमी पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि विशेषतः धोरणात्मक उपयोगांमध्ये चाचणी निकालांची अचूकता, विश्वासार्हता आणि सचोटी सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. धोरणात्मक उपयोगांमध्ये चाचणी निकालांच्या अचूकतेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“आपण प्रगत तपासणी तंत्रज्ञान, विशेष सेन्सर्स, मूल्यमापन उपकरणे आणि संबंधित सॉफ्टवेअरमधील आपल्या स्वदेशी क्षमता मजबूत केल्या पाहिजेत. तांत्रिक अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि महत्त्वाच्या संरक्षण पुरवठा साखळ्या सुरक्षित करण्यासाठी या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. आपण संपूर्ण संरक्षण औद्योगिक परिसंस्थेमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता हमी पद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खाजगी उत्पादक, स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (एमएसएमई) या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका आहे. तपासणीचे निकाल अचूक, विश्वासार्ह आणि शोधण्यायोग्य असतील आणि ते योग्य मानके व मजबूत प्रक्रियेवर आधारित असून पात्र व्यावसायिकांच्या मूल्यमापनानंतरच दिले जातील, याची आपण खात्री केली पाहिजे,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, एनडीटी तंत्रज्ञानामुळे कोणत्याही वस्तूला, घटकाला किंवा रचनेला कोणतीही हानी न पोहोचवता त्यांच्या अखंडतेची तपासणी करणे शक्य होते. ही संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले की, ज्याप्रमाणे अल्ट्रासाऊंड आणि क्ष-किरण शस्त्रक्रियेशिवाय मानवी शरीराची तपासणी करण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे एनडीटी तंत्रामुळे महत्त्वाच्या उपकरणांचे भाग वेगळे न करता किंवा त्यांचे नुकसान न करता त्यांतील अंतर्गत दोष शोधता येतात.
संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले की, भारतीय संरक्षण प्रणाली अधिक अत्याधुनिक होत असताना, प्रत्येक महत्त्वाचे साहित्य, घटक, जोडणी आणि उत्पादन प्रक्रियेने गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची सर्वोच्च मानके पूर्ण केली पाहिजेत. “लपलेले दोष कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात, देखभालीची गरज वाढवू शकतात, उपकरणांचे आयुष्य कमी करू शकतात आणि गंभीर परिस्थितीत मोहिमेच्या यशाला धोका निर्माण करू शकतात. केवळ दोष ओळखण्याच्या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेचा अंतर्भाव करून दोष सक्रियपणे रोखण्याकडे आपण वळले पाहिजे,” असे ते म्हणाले.
_20261115115358_744afe.jpeg)
राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, राष्ट्राची प्रगती केवळ त्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून नसते, तर त्याने तयार केलेल्या प्रणालींची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता यावरही अवलंबून असते. क्षेपणास्त्रे, विमाने, नौदल युद्धनौका आणि अंतराळयानांसह संरक्षण क्षेत्रातील उपयोगांमध्ये गुणवत्ता ही केवळ उत्पादनाची गरज नसून ती कार्यात्मक विश्वासार्हता आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक आवश्यक घटक आहे, असे ते म्हणाले.
या क्षेत्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, तांत्रिक नेतृत्व मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या देशासाठी एनडीटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताचा संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा प्रयत्न हे केवळ एक आर्थिक उद्दिष्ट नसून ती एक धोरणात्मक गरज देखील आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
भारताच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण परिसंस्थेवर प्रकाश टाकताना राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्र विकास, नौदल युद्धनौका, अवकाश आणि विमान अभियांत्रिकी, रडार प्रणाली आणि अंतराळ उपयोगांमधील यशाचा उल्लेख देशाच्या विस्तारणाऱ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षमतांचे प्रतिबिंब म्हणून केला. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे, आयएनएस विक्रांतचे जलावतरण हा आत्मनिर्भर भारत प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले.
नवोन्मेषाच्या व्यापक महत्त्वाविषयी बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, नवोन्मेष हा वैज्ञानिक शोध आणि नवीन आविष्कारांच्या पलीकडे जातो, ज्यामध्ये विद्यमान तंत्रज्ञान आणि प्रणालींची सतत सुधारणा, अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण यांचा समावेश होतो. संस्थात्मक यंत्रणा आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे संरक्षण क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी झालेल्या प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला. संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष (आयडीइएक्स) आणि तंत्रज्ञान विकास निधी (टीडीएफ) हे महत्त्वाचे उपक्रम असून त्यांनी नाविन्यपूर्ण विचारसरणी, तांत्रिक विकास आणि प्रयोगांना प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण परिसंस्थेला एक नवीन दिशा मिळाली आहे, असे ते म्हणाले.
वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षा वातावरणाशी जुळवून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, स्वदेशी शस्त्रे, प्लॅटफॉर्म आणि सहाय्यक प्रणालींनी नेहमीच सर्वोच्च पातळीची विश्वासार्हता आणि कामगिरी दिली पाहिजे. एनडीटी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी आपल्या क्षमता सतत अद्ययावत कराव्यात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान व बदलत्या सुरक्षा गरजांशी सुसंगत राहून नवोन्मेषाची भावना जिवंत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
_20261115115406_1655cd.jpeg)
अ विनाशकारी मूल्यमापन क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाबद्दल बोलताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, रोबोटिक्स, प्रगत सेन्सर्स, डिजिटल ट्विन्स आणि भविष्यवेधी विश्लेषण यामुळे तपासणी आणि संरचनात्मक आरोग्य देखरेखीच्या शक्यता मोठ्या प्रमाणात विस्तारत आहेत. ते म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे तपासणीचा वेग आणि सातत्य सुधारू शकते, क्लिष्ट माहितीचे विश्लेषण करणे सोपे होऊ शकते आणि पारंपारिक पद्धतींद्वारे सहजपणे न सापडणारे नमुने ओळखता येऊ शकतात.
राजनाथ सिंह यांनी भर दिला की, तपासणी प्रक्रिया अधिक अचूक, कार्यक्षम आणि उदयोन्मुख औद्योगिक गरजांना प्रतिसाद देणारी बनवण्यासाठी प्रस्थापित तपासणी तंत्रांचे प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाशी बुद्धिमत्तेने एकत्रीकरण करण्यातच भविष्य आहे. भारताने केवळ हे तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या धोरणात्मक आणि औद्योगिक गरजांनुसार स्वदेशी उपाय विकसित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. संशोधन, प्रगत उपकरणे, सॉफ्टवेअर आणि कुशल मनुष्यबळामध्ये गुंतवणूक केल्याने देशांतर्गत क्षमता मजबूत होतील आणि भारतीय तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळू शकेल, असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले की, जेव्हा सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन प्रयोगशाळा एकत्र काम करतात तेव्हाच नवोन्मेष बहरतो. तांत्रिक प्रगती आणि धोरणात्मक आत्मनिर्भरतेच्या समान उद्दिष्टासाठी सर्व भागधारकांनी एकत्र काम करावे आणि संपूर्ण सरकार व संपूर्ण परिसंस्थेचा दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
_20261115115413_357301.jpeg)
तेलंगणातील हैदराबाद येथे इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगतर्फे आयोजित केलेल्या या तीन दिवसीय परिषदेत एनडीटीमधील नवीनतम प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि उपयोगांवर विचारमंथन करण्यासाठी 2,000 हून अधिक व्यावसायिक, संशोधक, उद्योग तज्ज्ञ आणि विद्यार्थी एकत्र आले आहेत. या परिषदेने उद्योग, शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधील भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण, तांत्रिक चर्चा आणि सहकार्यासाठी एक विचारमंच उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये संरक्षण आणि अवकाशासह विविध क्षेत्रांमध्ये एनडीटी क्षमता बळकट करणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि अत्याधुनिक तपासणी व मूल्यमापन तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
***
शिल्पा पोफळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com