Posted On:
15 NOV 2026 11:22AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, खासदार आणि इतर मान्यवरांनी आज संसद परिसरातील प्रेरणा स्थळ येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अर्थात जनजातीय गौरव दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.

या निमित्ताने सी. पी. राधाकृष्णन यांनी एक्स या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात लिहिले आहे की, "धैर्य आणि प्रतिकाराचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी समाजाचे नेतृत्व केले आणि त्यांचे हक्क, सन्मान आणि ओळख अबाधित ठेवण्यासाठी लढा दिला. त्यांचा 'उलगुलान'चा नारा स्वातंत्र्य आणि न्यायाच्या लढ्याचा एक बुलंद आवाज बनला. जनजातीय गौरव दिनानिमित्त, आम्ही त्यांचा चिरस्थायी वारसा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व राष्ट्र उभारणीत आदिवासी समाजाने दिलेल्या अमूल्य योगदानाचा सन्मान करतो. त्यांचा वारसा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्र उभारणीतील आदिवासी समाजाचे अनमोल योगदान साजरे करणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे अत्यंत प्रेरणादायी होते."

आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 2021 पासून 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. आदिवासी समाजाने अनेक क्रांतिकारी चळवळींच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हा दिवस त्यांचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारसा साजरा करतो. भारताचे स्वातंत्र्य आणि प्रगतीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल एकता, अभिमान आणि ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या सोहळ्याचा एक भाग म्हणून, मान्यवरांचे स्वागत करताना विविध राज्यांतील सहा आदिवासी लोककलाकारांनी संसद परिसरातील प्रेरणा स्थळ येथे आपली कला सादर केली.

***
शिल्पा पोफळे/नितीन गायकवाड/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com