विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नव्या पिढीच्या अर्थात नेक्स्ट जनरेशन सिंक्रोट्रॉन बीमलाईन्सच्या विकासासाठी इटलीतील एलेट्रा 2.0 कार्यक्रमात सह भागीदार म्हणून भारत 7 दशलक्ष युरोंपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी वचनबद्ध : डॉ. जितेंद्र सिंह


2026-27 पासून पुढील पाच वर्षांत भारत प्रगत संशोधन पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ विकासामध्ये गुंतवणूक करणार

Posted On: 14 NOV 2026 3:10PM by PIB Mumbai

 

इटलीतील एलेट्रा सिंक्रोट्रॉन ट्रायस्टे इथल्या संशोधनासाठीच्या बीमलाईन्सच्या (अतिप्रखर आणि शक्तिशाली प्रकाशकिरणांचा मार्ग, ज्याद्वारे पदार्थांच्या अणू-रेणूंची सूक्ष्म रचना तपासली जाते) पुनर्विकासासाठी एलेट्रा 2.0 कार्यक्रमाअंतर्गत सह भागीदार म्हणून सहभागी होण्याची घोषणा भारताने केली आहे. या घोषणेतून भारताने प्रगत आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्याप्रती असलेली आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. यासाठी 2026-27 पासून पुढच्या पाच वर्षांसाठी 7 दशलक्ष युरोंपेक्षा जास्त गुंतवणुक करण्याची वचनबद्धताही भारताने व्यक्त केली आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी एलेट्रा सिंक्रोट्रॉन ट्रायस्टे इथे दिलेल्या भेटीदरम्यान ही घोषणा केली. भारताच्या या सहभागामुळे संशोधन विषयक पायाभूत सुविधा आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळणार आहे. यामुळे भारत आणि इटली यांच्यामधील दीर्घकालीन वैज्ञानिक भागीदारीच्या एका महत्त्वाच्या नवीन टप्प्याचाही प्रारंभ झाला आहे.

या सुधारित आणि अद्ययावत सुविधांमुळे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्रगत साहित्य, संरचनात्मक जीवशास्त्र आणि इतर वैज्ञानिक क्षेत्रांमधील संशोधनासाठीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ भारतातील तसेच इतर देशांतील संशोधकांना होणार आहे.

भारताचे संशोधन समूह आणि इटलीतील या सुविधेदरम्यान गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वैज्ञानिक सहकार्य सुरु आहे. या सहकार्याच्या पायावरच एलेट्रा 2.0 मधील भारताचा सहभाग आधारलेला आहे. भारतीय शास्त्रज्ञ 1998 पासून एलेट्रा इथे संशोधनात्मक प्रयोग करत आहेत आणि आजही या सुविधांचा वापर करत आहेत. सध्या इटलीनंतर भारत हा एलेट्रा सुविधेचा दुसरा सर्वात मोठा वापरकर्ता देश आहे. यातून भारतीय वैज्ञानिक समुदायाचा या सुविधेअंतर्गत असलेला सातत्यपूर्ण सहभाग दिसून येतो.

भारताच्या संशोधन समुहांकडून एलेट्रा संस्थेला आजवर 1,100 हून अधिक प्रायोगिक प्रस्ताव सादर केले गेले आहेत. यातूधूनही या उपक्रमातील भारताच्या सहभागाची व्याप्ती दिसून येते. सादर केलेल्या प्रस्तावांच्या संख्येच्या बाबतीत इटलीनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीने 54,140 प्रस्ताव सादर केले असून, भारताने 1,098 प्रस्ताव सादर करणाऱ्या फ्रान्सला मागे टाकले आहे.

एलेट्रा 2.0 कार्यक्रमाअंतर्गत, सध्या अस्तित्वात असलेल्या भारत-केंद्रित एक्सआरडी 2 आणि एक्सप्रेस या बीमलाईन्स सेवेतून निवृत्त केल्या जातील आणि त्यांच्या जागी वाढीव क्षमता असलेल्या दोन नवीन बीमलाईन्स बसवल्या जातील. यामध्ये बृहद रेण्वीय स्फटिकशास्त्रासाठी (macromolecular crystallography) मायक्रो-एक्सआरडी नावाच्या मायक्रोफोकस बीमलाईनचा आणि उच्च दाब विवर्तनासाठी (high-pressure diffraction) एक्सप्रेस सुपरबेंड नावाच्या बीमलाईनचा समावेश केला जाणार आहे.

हा पुनर्विकास प्रकल्प एलेट्रा  येथील विशेष संशोधन पायाभूत सुविधांमध्ये भारताने यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचाच एक पुढचा टप्पा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने  इटालियन बाजूच्या सहकार्याने, एक्सआरडी2 आणि एक्सपीआरईएसएस  या दोन प्रगत डिफ्रॅक्शन बीमलाईन्सच्या  उभारणीसाठी सुमारे 22 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले होते. या दोन्ही बीमलाईन्सचे उद्घाटन 20 ऑक्टोबर 2016 रोजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांच्या इटली भेटीदरम्यान संयुक्तपणे करण्यात आले होते.

या बीमलाईन्स कार्यान्वित झाल्यापासून, भारतीय संशोधकांकडून त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. दरवर्षी सुमारे 50 ते 60 भारतीय वैज्ञानिक ट्रिएस्टे  येथे जाऊन या सुविधेचा वापर करून आपले संशोधन प्रयोग पूर्ण करतात.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने इंडो-इटालियन एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम ऑफ कोऑपरेशन, ईपीओसी  द्वारेही भारतीय संशोधकांना एलेट्रामधील सुविधांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आहे. ईपीओसी 2022-24 अंतर्गत, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याद्वारे दरवर्षी 50 भारतीय संशोधकांना (प्रत्येक सत्रात 25 संशोधक) 'एलेट्रा' बीमलाईन्सवर प्रयोग करण्यासाठी तिथे जाण्यास आर्थिक पाठबळ दिले जाते.

ईपीओसी 2025-2027 मध्येही भारतीय संशोधकांना या सुविधेवर प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे, ज्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीत 1.5 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

***

राधिका अघोर/तुषार पवार/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2336246) अभ्यागत कक्ष : 23