वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 15 ते 16 नोव्हेंबर 2026 दरम्यान इजिप्तला भेट देणार


पीयूष गोयल 7 व्या भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीच्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवणार

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यासाठी व्यापार मंच

भारत-इजिप्त व्यापार मंचामध्ये भारतीय उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि स्टार्टअप्स सहभागी होणार

नवीन व्यापार, गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांच्या संधी शोधण्यासाठी भारत-इजिप्त स्टार्टअप फोरमची स्थापना

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह 130 हून अधिक आघाडीचे व्यावसायिक आणि स्टार्ट-अप्सचा समावेश असलेले मोठे व्यावसायिक शिष्टमंडळ बैठकीत सहभागी होणार

Posted On: 14 NOV 2026 10:54AM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल 15 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत इजिप्तच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. भारत-इजिप्त यांच्यातील दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करणे, हे या भेटीचे उद्दिष्ट असून, यावेळी द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, औद्योगिक सहकार्य वाढवणे आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करणे यावर विशेष भर दिला जाईल.

भारत आणि इजिप्त दरम्यान दीर्घकालीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरिकांमधील परस्पर संबंध असून, ते राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि सांस्कृतिक सहकार्याचा समावेश असलेल्या बहुआयामी भागीदारीमध्ये विकसित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत-इजिप्त संबंधांना नव्याने गती मिळाली. याचा परिणाम म्हणून द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाला, यात आर्थिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्याची सामायिक वचनबद्धता आहे.

या दौऱ्यात भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीचे (जेटीसी) 7 वे सत्र, भारत-इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषदेची (जेबीसी) बैठक आणि भारत-इजिप्त व्यवसाय मंच यांचा समावेश असेल. या कार्यक्रमात इजिप्तच्या वरिष्ठ मंत्र्‍यांबरोबर द्विपक्षीय बैठका, प्रमुख व्यावसायिक प्रतिनिधींशी संवाद आणि आफ्रिकन एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक (आफ्रेक्सिमबँक), इजिप्शियन ज्युनियर बिझनेसमेन असोसिएशन आणि इजिप्त-इंडिया स्टार्टअप्स फोरम यांच्याबरोबरच्या बैठकांचा समावेश असेल. या संबंधांमुळे द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक सहकार्य नाविन्यपूर्ण संबंधांना नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीचे (जेटीसी) 7 वे सत्र 15 नोव्हेंबर 2026 रोजी कैरो येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इजिप्तचे गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यापार मंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांच्या सह-अध्यक्षतेखाली होणार आहे.

जेटीसीला मंत्रीस्तरीय दर्जा देण्यात आला असून, याद्वारे दोन्ही देश आपली आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्याला देत असलेले महत्त्व प्रतिबिंबित होते. या बैठकीमुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची, तसेच द्विपक्षीय व्यापार क्षेत्रात अधिक विविधता आणण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. चर्चेमध्ये बाजार प्रवेशाशी संबंधित समस्या, बिगर-शुल्क अडथळे, व्यापारी उपाययोजना, कृषी आणि अन्न उत्पादने, औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा, अभियांत्रिकी वस्तू, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, खते, वस्त्रोद्योग, एमएसएमई, सीमाशुल्क सहकार्य, सेवा, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स यासारख्या परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे.

एप्रिल–सप्टेंबर 2026 या कालावधीत द्विपक्षीय वस्तू व्यापार 5.04 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका राहिला, ज्यामध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान भारताची इजिप्तला झालेली निर्यात 3.87 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती, तर इजिप्तमधून झालेली आयात 2.60 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी राहिली. भारताच्या इजिप्तला होणाऱ्या प्रमुख निर्यातीमध्ये मांस आणि कुक्कुट उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने, सेंद्रीय रसायने, कापूस आणि यंत्रसामग्री यांचा समावेश आहे; तर प्रमुख आयातीमध्ये कच्चे पेट्रोलियम, खते, कापूस आणि खनिज उत्पादने यांचा समावेश होतो. (स्रोत: DGCIS)

एकमेकांच्या बाजारपेठेत व्यवसायांचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे, व्यापाराशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आणि गुंतवणूक भागीदारीला प्रोत्साहन देणे या विषयांवर दोन्ही बाजू चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. सुएझ कालवा आर्थिक क्षेत्र, औद्योगिक विकास, उत्पादन, पायाभूत सुविधा, बंदरे आणि लॉजिस्टिक्स तसेच प्रादेशिक मूल्य साखळी यांमधील सहकार्याच्या संधींवरही या चर्चेत भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. इजिप्तचे मोक्याचे भौगोलिक स्थान भारतीय व्यवसायांना त्या देशात आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी आणि आफ्रिका, मध्य पूर्व व युरोपमधील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देते.

विविध क्षेत्रांतील 130 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी  आणि वरिष्ठ उद्योग प्रतिनिधींचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ भारत–इजिप्त संयुक्त व्यवसाय परिषद बैठक आणि भारत–इजिप्त व्यवसाय मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या संधींचा शोध घेणे, संयुक्त उपक्रमांना प्रोत्साहन देणे, तंत्रज्ञान भागीदारीला चालना देणे आणि औद्योगिक सहकार्य बळकट करणे यासाठी दोन्ही देशांतील व्यावसायिक नेते व उद्योग भागधारकांमध्ये थेट संवादाचे व्यासपीठ म्हणून ही संयुक्त व्यवसाय परिषद बैठक आणि व्यवसाय मंच काम करतील.

या दौऱ्यादरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे विशेषत्वाने व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी इजिप्तच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

उत्तर आफ्रिकेतील एक महत्त्वाचा भागीदार आणि प्रादेशिक बाजारपेठांचे मोक्याचे प्रवेशद्वार असलेल्या इजिप्तसोबत आपले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या भारताच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला प्रदर्शित करणाराहा  दौरा आहे. उत्पादन, औषधनिर्मिती, स्वयंचलित वाहने, वस्त्रोद्योग, रसायने, अभियांत्रिकी वस्तू, अन्न प्रक्रिया, नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य विस्तारण्याच्या दोन्ही देशांना मोठ्या संधी आहेत. या दौऱ्यामुळे भारत–इजिप्त आर्थिक भागीदारीला नवी गती मिळेल, संस्थात्मक सहकार्य मजबूत होईल आणि भारतीय व इजिप्शियन व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

***

यश राणे/ राजश्री आगाशे/ शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2336169) अभ्यागत कक्ष : 36