Posted On:
14 NOV 2026 10:46AM by PIB Mumbai
आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सवाचा 13 नोव्हेंबर 2026 रोजी समारोप झाला. भारताच्या समृद्ध आदिवासी साहित्यिक परंपरांचे जतन करणे आणि स्थानिक ज्ञान व मौखिक कथांना समकालीन साहित्यिक अभिव्यक्तीशी जोडणे, या विषयांवर या महोत्सवात चर्चा करण्यात आली. 'आदिवासी गौरव दिवस' सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित या महोत्सवात ‘मौखिक परंपरेपासून समकालीन आदिवासी साहित्यापर्यंत’ या संकल्पनेअंतर्गत देशभरातील आदिवासी लेखक, कवी, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ आणि अभ्यासक एकत्र आले होते.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी मौखिक महाकाव्ये आणि वीर परंपरा, बहुभाषिक शिक्षणात आदिवासी ज्ञानाचे योगदान या विषयांवर वैचारिक चर्चासत्र पार पडले. तसेच उदयोन्मुख आदिवासी लेखक व कवींनी आपल्या साहित्याचे वाचन केले. कथा, गाणी, महाकाव्ये आणि कविता कशा प्रकारे आदिवासी समुदायाची सामूहिक स्मृती, सांस्कृतिक ओळख आणि जगण्याचे जीवनानुभवांचे जतन करतात, हे या सत्रांमध्ये अधोरेखित करण्यात आले.
मौखिक महाकाव्ये आणि वीर परंपरा
प्रकाश झा यांच्या सूत्रसंचालनाखाली आयोजित झालेल्या पहिल्या सत्रात भगवानदास पटेल, उपेंद्र अनू आणि मयंगलंबम सदानंद सिंह यांचा सहभाग होता. वक्त्यांनी गोंड रामायण आणि भिल्ल महाभारतासह भिल्ल आणि गोंड समुदायांचा मौखिक साहित्यिक वारसा, तसेच मणिपूरची 'वारी लीबा' (Wari Leeba) कथन परंपरा आणि 'खंबा-थोईबी' (Khamba-Thoibi) महाकाव्याच्या वैशिष्ट्यांवर विचारमंथन केले. दृकश्राव्य रेकॉर्डिंग आणि संशोधनाच्या माध्यमातून या परंपरांचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व या चर्चेत अधोरेखित करण्यात आले, तसेच समुदायातील कथाकार आणि ज्ञानधारकांना आदिवासी साहित्यिक वारशाचे रक्षक म्हणून मान्यता देण्यावर भर देण्यात आला.
बहुभाषिक शिक्षणातील मौखिक परंपरा
पुढील सत्रात सर्वसमावेशक शिक्षण मजबूत करण्यासाठी स्थानिक भाषा आणि सामुदायिक ज्ञानाच्या भूमिकेचे परीक्षण करण्यात आले. साहित्य अकादमीचे माजी सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या सत्रात अनिल कुमार बोरो, सिल्व्हॅनस लामारे आणि पार्वती तिर्की सहभागी झाले. मौखिक कथा, पारंपरिक गाणी आणि सामुदायिक गोष्टींमुळे शिक्षणाचा अनुभव कसा समृद्ध होऊ शकतो आणि मुलांचे त्यांच्या मातृभाषेशी व सांस्कृतिक ओळखीशी असलेले नाते कसे दृढ होऊ शकते, यावर या विचारमंथनात प्रकाश टाकण्यात आला. विशेषतः बालपणीच्या सुरुवातीच्या शिक्षणात स्थानिक ज्ञान आणि मौखिक परंपरांचा समावेश करण्यावर वक्त्यांनी भर दिला आणि आदिवासी भाषांना पाठबळ देण्यासाठी दस्तऐवजीकरण, भाषांतर आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर चर्चा केली.

समारोप सत्रात आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा यांनी आदिवासी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक भाषांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना प्रकाशक व व्यापक वाचकवर्गाशी जोडण्यासाठी शाश्वत व्यासपीठ निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. आदिवासी संगीतकार आणि कलाकारांचे सर्जनशील हक्क ओळखण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटीच्या (IPRS) सहकार्याने विकसित केलेल्या 'लिव्हिंग रूट्स ओरिजिनल्स' या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. तसेच, प्रगती मैदान येथे होणाऱ्या नॅशनल बुक ट्रस्टच्या आगामी पुस्तक मेळाव्यात आदिवासी साहित्यासाठी एक स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्याच्या मंत्रालयाच्या उपक्रमावरही त्यांनी प्रकाश टाकला, ज्यामुळे आदिवासी लेखक आणि प्रकाशकांना त्यांचे साहित्य प्रदर्शित करण्याची आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.
***
यश राणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai