संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 5.0 अंतर्गत 20 लाखांहून अधिक संरक्षण दलांच्या निवृत्तीवेतनधारकांनी पूर्ण केली


डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया

व्यापक पोहोच आणि तळागाळापर्यंत पाठबळ सुनिश्चित करण्यासाठी सीजीडीएद्वारे देशव्यापी कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 12 NOV 2026 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण लेखा विभागाच्या  महानियंत्रक  (CGDA) कार्यालयाने देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) मोहीम 5.0 चा भाग म्हणून एक व्यापक जनजागृती उपक्रम सुरू केला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या (DoP&PW) समन्वयाने ही महिनाभर चालणारी मोहीम 1 ते 30 नोव्हेंबर 2026 दरम्यान देशभरात राबवली जात आहे. 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत 20.48 लाखांहून अधिक संरक्षण निवृत्तीवेतनधारकांनी यशस्वीरित्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले असून, सर्व सहभागी विभागांपैकी हे सर्वाधिक योगदान आहे.

प्रगत तंत्रज्ञान-सक्षम उपायांद्वारे संरक्षण निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सहज आणि कोणत्याही अडथळ्याविना सादर करता यावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वयोवृद्ध, अतिज्येष्ठ आणि दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांना कोणत्याही कार्यालयीन अडचणींशिवाय त्यांची वार्षिक ओळख पटवण्याची प्रक्रिया सोयीस्करपणे पूर्ण करता येण्याला,  प्रामुख्याने प्राधान्य दिले आहे.

देशव्यापी व्यापक जनजागृती आणि यंत्रणेची सज्जता

प्रत्यक्ष पोहोच आणि तळागाळातील सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण लेखा विभागाने (DAD) खालील यंत्रणा सज्ज केल्या आहेत:

  • निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि स्पर्श (SPARSH) प्लॅटफॉर्मच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज अशी 194 स्पर्श सेवा केंद्रे (SSCs).
  • निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करणे सुलभ व्हावे यासाठी 4.63 लाख सामायिक सेवा केंद्रे (CSCs), 13 भागीदार बँका / आयपीपीबी आणि 29 नोडल अधिकारी.
  • देशभरात सुमारे 80 जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
  • शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.महामेळावे: जागेवरच डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याचे सहाय्य देण्यासाठी 23 नोव्हेंबर 2026 रोजी कोची येथे एका भव्य डिजिटल जीवन प्रमाणपत्र

चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन

जीवन प्रमाण पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे आधार-आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा मोहीम 5.0 चा मुख्य केंद्रबिंदू असून यामध्ये 80% हून अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्रे फेस आयडी म्हणजेच चेहरा ओळखून तयार केली जात आहेत. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना स्मार्टफोनचा वापर करून त्यांचे जीवन प्रमाणपत्र प्रमाणित करता येते, ज्यामुळे बाह्य बायोमेट्रिक उपकरणांची गरज भासत नाही.

प्रमुख फायद्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

  • घरूनच सादरीकरण: निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या घरच्या घरी आरामात प्रमाणपत्रे तयार करण्याची सुविधा देते. ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि बँक शाखा किंवा संरक्षण कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज टळते.
  • बायोमेट्रिक अस्पष्टतेवर मात: काळानुसार आणि वाढत्या वयामुळे ज्या अतिज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाले आहेत, त्यांना येणाऱ्या अडचणींचे यातून निराकरण होते.
  • दिव्यांग माजी सैनिकांना सहाय्य: हालचालींवर मर्यादा असलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ही सुविधा अत्यंत सुलभ ठरते.
  • डिजिटल स्वावलंबन: निवृत्तीवेतनधारकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डिजिटल पद्धतींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे भविष्यातील वार्षिक सादरीकरणासाठी स्वावलंबन निर्माण होते.

सिद्ध झालेल्या कामगिरीवर पुढील वाटचाल

संरक्षण लेखा विभागाने (DAD) देशव्यापी डिजिटल प्रशासन उपक्रमांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर घडवून आणण्यात सातत्य राखले आहे. नोव्हेंबर 2025 मधील डीएलसी मोहीम 4.0 दरम्यान, संरक्षण लेखा विभागाने स्पर्श सेवा केंद्रे, सामायिक सेवा केंद्रे आणि भागीदार बँकांच्या देशव्यापी जाळ्याद्वारे 20.94 लाखांहून अधिक डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार केली.

स्पर्श (SPARSH) अंतर्गत पोहोचण्याचा विस्तारही लक्षणीयरीत्या झाला असून, ऑक्टोबर 2026 पर्यंत 35.11 लाख संरक्षण निवृत्तीवेतनधारकांची यात नोंदणी झाली आहे. याला 301 स्पर्श जनजागृती कार्यक्रम आणि 204 रक्षा पेन्शन समाधान आयोजनांची साथ लाभली, ज्याद्वारे 8,000 हून अधिक तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले.

‘योग्य निवृत्तीवेतनधारकाला योग्य वेळी योग्य निवृत्तीवेतन’ या आपल्या मार्गदर्शक तत्त्वाचा पुनरुच्चार करत, संरक्षण लेखा विभागाने सर्व संरक्षण निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांनी आवाहन केले आहे की, त्यांनी नोव्हेंबर 2026 दरम्यान त्यांच्या जवळच्या स्पर्श सेवा केंद्राला, बँकांना किंवा 80 जनजागृती कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमाला भेट देऊन कोणत्याही अडथळ्याविना, पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेचा अनुभव घ्यावा.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335640) अभ्यागत कक्ष : 4