आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आदिवासीबहुल 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 आदिवासी क्षेत्रांत औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा राष्ट्रीय उपक्रम

Posted On: 12 NOV 2026 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय), लखनौ यांच्या सहकार्याने, “भारतातील आदिवासीबहुल क्षेत्रांमध्ये शाश्वत आदिवासी उपजीविकेसाठी एकात्मिक संवर्धन, कृषी-तंत्रज्ञान आणि जैवसंसाधन उद्यम विकास” हा प्रकल्प 12 नोव्हेंबर 2026 रोजी ओडिशा केंद्रीय विद्यापीठ, कोरापुट येथे औपचारिकरीत्या सुरू केला.

आदिवासी क्षेत्रांतील समृद्ध औषधी वनस्पती जैवविविधतेचे संवर्धन करणे, तसेच पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक जैवसंसाधनांचा उपयोग करून आदिवासी समुदायांसाठी शाश्वत उपजीविका आणि उद्यमाच्या संधी निर्माण करणे हे तीन वर्षे अवधीच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पांतर्गत 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडलेल्या 16 आदिवासीबहुल क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामध्ये अल्लुरी सीताराम राजू (आंध्र प्रदेश), कोकराझार (आसाम), नारायणपूर (छत्तीसगड), नवसारी (गुजरात), पूर्व सिंहभूम (झारखंड), कोडगू (कर्नाटक), वायनाड (केरळ), कारगिल (लडाख), अनुपपूर (मध्य प्रदेश), गडचिरोली आणि नाशिक (महाराष्ट्र), कंधमाल, बलांगीर आणि कोरापुट (ओडिशा), सोनभद्र (उत्तर प्रदेश) आणि धारचुला (उत्तराखंड) यांचा समावेश आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे 200 ते 300 औषधी वनस्पतींच्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण, दुर्मिळ, संकटग्रस्त आणि धोक्यात असलेल्या (आरईटी) 30 ते 40 प्रजातींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व प्रसार, 16 सामुदायिक रोपवाटिका आणि 16 बीज बँकांची स्थापना तसेच औषधी वनस्पतींची लागवड आणि जैवसंसाधनांवर आधारित उद्योगांसाठी समुदाय स्तरावर क्षमता विकास यांचा समावेश आहे. संवर्धन, प्रसार आणि शाश्वत लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 40,000 ते 50,000 दर्जेदार लागवड साहित्याचे वितरण करण्याचेही या प्रकल्पात नियोजन आहे.

   

या उपक्रमाद्वारे वैज्ञानिक संस्था, कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), वन धन विकास केंद्रे (व्हीडीव्हीके), राज्यांचे आदिवासी कल्याण आणि वन विभाग तसेच स्थानिक समुदाय यांच्यात मजबूत समन्वय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. संवर्धन, क्षमता विकास, लागवड आणि मूल्यसाखळी विकास या प्रक्रियांमध्ये आदिवासी शेतकरी, पारंपरिक वैद्य, महिला आणि ग्रामीण युवकांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

* * *

माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335597) अभ्यागत कक्ष : 3
Read this releasein: English , Urdu , Gujarati