संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्यमंत्र्यांनी केला नूतनीकृत शौर्य पुरस्कार पोर्टलचा शुभारंभ

Posted On: 12 NOV 2026 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2026

 

संरक्षण राज्यमंत्री  संजय सेठ यांनी 12 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे नूतनीकरण केलेल्या (https://gallantryawards.gov.in) या शौर्य पुरस्कार पोर्टलचा  शुभारंभ केला. शौर्य पुरस्कार विजेत्यांचे धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच भावी पिढ्यांसाठी त्यांचा वारसा जतन करण्यासाठी हे पोर्टल एक समर्पित डिजिटल उपक्रम आहे.

नव्याने विकसित केलेल्या या पोर्टलमध्ये सहज सुलभ नेव्हिगेशन, रिस्पॉन्सिव्ह डिझाइन आणि सुधारित सुलभतेसह नागरिकाभिमुख यूजर इंटरफेस आणि यूजर एक्सपिरियन्स समाविष्ट आहे. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये कार्यक्रम, स्मारके आणि संग्रहालये, वॉरपीडिया, पुरस्कार विजेते, गॅलंट्रीपीडिया (लेख), माध्यम आणि एक परस्परसंवादी श्रद्धांजली विभाग यांचा समावेश आहे, ज्याद्वारे नागरिक देशाचा लष्करी इतिहास जाणून घेऊ शकतात आणि शूरवीरांना अभिवादन करू शकतात.

शौर्य पुरस्कार पोर्टलवर 'वीर गाथा' साठी देखील एक समर्पित डिजिटल दालन उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रत्येक आवृत्तीसाठी एक स्वतंत्र पृष्ठ आहे. यामध्ये त्याची प्रस्तावना, विषय, वेळापत्रक, मूल्यमापन निकष, बक्षिसे, संसाधने, निकाल, सत्कार समारंभ, मीडिया गॅलरी आणि विद्यार्थ्यांचे उपक्रम एकाच ठिकाणी एकत्र आणले आहेत. या माध्यमातून 'वीर गाथा' विद्यार्थ्यांना थेट शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या कथांची अनुभूती देते. विद्यार्थी या वीरांचे धैर्य आणि बलिदानाबद्दल जाणून घेतात आणि ते जे शिकतात ते स्वतःच्या प्रवेशिकांद्वारे व्यक्त करतात.

पहिल्या आवृत्तीतील सुमारे 8 लाख विद्यार्थी आणि 4,788 शाळांपासून सुरू झालेला हा उपक्रम पाचव्या आवृत्तीत 1.92 कोटींहून अधिक विद्यार्थी आणि 1.9 लाख शाळांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये 18 देशांमधील 91 सीबीएसई-संलग्न शाळांमधील 28,005 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यानंतरचे शौर्य पुरस्कार, पुरस्कार विजेते, युद्धे आणि लष्करी कारवायांची सर्वसमावेशक आणि अधिकृत डिजिटल माहिती संकलित करणे, तसेच विशेषतः तरुणांमध्ये देशभक्तीला चालना देणे आणि समृद्ध लष्करी वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

याप्रसंगी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335570) अभ्यागत कक्ष : 7