Posted On:
11 NOV 2026 5:17PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या मुख्य समन्वयाअंतर्गत सी व्हिजिल 26 (Sea Vigil-26) या अखिल भारतीय सागरी संरक्षण सरावाची पाचवी आवृत्ती 11 ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केली गेली आहे. हा सराव दोन टप्प्यांत पार पडणार आहे. 11 ते 17 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सागरी संरक्षण आणि सुरक्षा सज्जता मूल्यमापन (CDSRE - Coastal Defence and Security Readiness Evaluation) हा पहिला टप्पा पार पडेल, त्यानंतर 18 आणि 19 नोव्हेंबर 2026 रोजी सी फेज म्हणजेच प्रत्यक्ष समुद्रातील सरावाचा टप्पा पार पडणार आहे.
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची उपयुक्तता आणि परिणामकारकता पडताळून पाहण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये सी व्हिजिल या सरावाला सुरुवात केली गेली होती. सी व्हिजिल-26 या सरावाअंतर्गत भारताची संपूर्ण किनारपट्टी आणि विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) व्यापले जाते. याअंतर्गत किनारी प्रदेशाची सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मच्छीमार तसेच किनारी प्रदेशात राहणाऱ्या समुदायांसह इतर सागरी भागधारकांचा सहभाग असतो.
या सरावाअंतर्गतची भौगोलिक व्याप्ती, सहभागी संस्था आणि दलांची संख्या, तसेच सरावाच्या उद्दिष्टांची व्याप्ती या दृष्टीने हा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. या सरावात भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, किनारपट्टी सुरक्षा पोलीस, सीमाशुल्क आणि इतर सागरी यंत्रणांचे ताफे तसेच संसाधने सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय यांच्यासह केंद्र सरकार, किनारी प्रदेशाची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या इतर यंत्रणांच्या सहकार्याने या सरावाचे आयोजन केले जात आहे.
हा सी व्हिजिल सराव भारतीय नौदलाचा सर्वात मोठा द्विवार्षिक युद्धाभ्यास असलेल्या ट्रॉपेक्स (TROPEX - Theatre Level Readiness Operational Exercise म्हणजेच नौदल, भूदल, हवाई दल या तिन्ही सैन्यदलांची युद्धसज्जता आणि प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेची प्रत्यक्ष समुद्रात चाचपणी करण्यासाठी आयोजित केला जाणारा भारतीय नौदलाचा सर्वोच्च आणि सर्वात मोठा द्विवार्षिक युद्ध सराव) या सरावाची पूर्वतयारी म्हणूनही आयोजित केला जातो. सी व्हिजिल आणि ट्रॉपेक्स हे दोन्ही सरावांमध्ये किनारपट्टी भागांच्या संरक्षणापासून ते मुक्त महासागरातील मोहिमांपर्यंतच्या संपूर्ण सागरी सुरक्षेच्या आव्हानांचा अंतर्भाव असतो.
सी व्हिजिल सरावाच्या आयोजनामुळे राष्ट्रीय पातळीवर देशाच्या सागरी सुरक्षा आणि किनारपट्टी संरक्षणातील सज्जतेचे सर्वोच्च स्तरावर मूल्यमापन करण्याची संधी उपलब्ध होत असते. सी व्हिजिल 26 हा सराव देशाच्या सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वास्तववादी मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने तसेच त्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.


***
Shailesh Patil / Tushar Pawar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai