आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोलंबोत पहिल्या बिमस्टेक आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त जाहीरनाम्यास सर्वानुमते मंजुरी; भारताचे प्रादेशिक आरोग्य सहकार्य मजबूत करण्यावर भर

Posted On: 11 NOV 2026 5:05PM by PIB Mumbai

प्रादेशिक आरोग्य सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, आज श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या पहिल्या 'बिमस्टेक' (BIMSTEC) आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत एक 'संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन' सर्वसंमतीने स्वीकारण्यात आले. यादरम्यान, बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण प्रदेशात सर्वसमावेशक, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुढे नेण्यासाठी, प्रादेशिक आरोग्य सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि लवचिक सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी सदस्य देशांच्या सामूहिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. 

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी या ऐतिहासिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले. ज्ञान-देवाणघेवाण, डिजिटल नवोपक्रम, क्षमता बांधणी आणि सामायिक सार्वजनिक आरोग्य आव्हानांवर एकत्रित कृती याद्वारे प्रादेशिक आरोग्य सहकार्य वाढवण्यात भारताची वाढती भूमिका त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

तसेच या बैठकीत 'सार्वजनिक आरोग्यावरील संकलित बिमस्टेक कृती आराखडा (2026-2030)' देखील मंजूर करण्यात आला. हा आराखडा रोग सर्वेक्षण, महामारी तयारी, डिजिटल आरोग्य, पारंपरिक वैद्यकशास्त्र, 'वन हेल्थ' आणि आरोग्य कार्यदलाचा विकास या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी मार्गदर्शन करतो.

 

या बैठकीतील भारताचा सहभाग श्रीलंकेसोबतच्या महत्त्वपूर्ण द्विपक्षीय उपक्रमांमुळे आणखी ठळक ठरला. यामध्ये 100 अतिरिक्त पूर्णतः सज्ज रुग्णवाहिकांच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करार, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 50 मेडिकल किऑस्क / हेल्थ एटीएमसाठी सहकार्य करण्याची केलेली घोषणा यांचा समावेश आहे. नड्डा यांनी नेपाळच्या आरोग्यमंत्र्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली आणि कोलंबोतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. याद्वारे त्यांनी या प्रदेशाशी भारताची दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

बिमस्टेक आरोग्यमंत्र्यांकडून संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदनाला सर्वसंमतीने मंजुरी

उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना नड्डा यांनी, हे निवेदन प्रादेशिक सहकार्यातील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले. एप्रिल 2025 मध्ये बँकॉक येथे झालेल्या 6व्या 'बिमस्टेक' शिखर परिषदेत सदस्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांमध्ये सहकार्यासाठी एक विशेष समर्पित यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याच निर्णयाचे हे फलित आहे.

आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करणे, दर्जेदार आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारणे आणि उद्भवणाऱ्या नवीन आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी वाढवणे यासाठी बिमस्टेक देश सामायिक जबाबदारी उचलत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

सर्वसंमतीने स्वीकारण्यात आलेले 'संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन' हे प्रादेशिक कृतीसाठीच्या प्रमुख प्राधान्यक्रमांची माहिती देत, सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण (युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज) आणि शाश्वत विकास ध्येय 3 (SDG 3) याची पूर्तता करण्यासाठी सर्व सदस्य देशांची कटिबद्धता अधोरेखित करते.

रोग सर्वेक्षण, आपत्कालीन पूर्वतयारी, लवकरात लवकर इशारा देणारी यंत्रणा, प्रतिजैविकांच्या रोधाचे व्यवस्थापन, डिजिटल आरोग्य सेवा, पारंपारिक वैद्यकशास्त्र, हवामानाशी संबंधित आरोग्य प्रतिसाद आणि क्षमता बांधणी अधिक सक्षम करण्यासाठीचा आराखडा या निवेदनात समाविष्ट करण्यात आला आहे.

 

तसेच, यामध्ये टेलिमेडिसिन, परस्पर कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी आणि निदान व रोगांचे मॉडेलिंग यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी 'बिमस्टेक डिजिटल हेल्थ फ्रेमवर्क' चा शोध घेण्याची / ते विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बैठकीत प्रादेशिक उपक्रमांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये श्रीलंकेत प्रस्तावित बिम्स्टेक रिजनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर पब्लिक हेल्थ , थायलंडमध्ये बिम्स्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन ट्रॉपिकल मेडिसिनची स्थापना आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याबाबत भारताचा पुढाकार यांचा समावेश आहे.

बैठकीच्या एका महत्त्वपूर्ण निष्कर्षांतर्गत, दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत एका सामंजस्य कराराची  देवाणघेवाण झाली. या करारानुसार, श्रीलंकेच्या 1990 सुवा सेरिया  आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी 100 अतिरिक्त सुसज्ज रुग्णवाहिका पुरवल्या जाणार आहेत.

 

या उपक्रमासाठी भारत सरकार 1,725.73 दशलक्ष श्रीलंकन रुपये (सुमारे 5.28 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) इतके अनुदान देणार आहे. यामुळे श्रीलंकेतील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमता सुधारेल आणि संपूर्ण श्रीलंकेत आपत्कालीन आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होईल.

सुवा सेरिया सेवेची स्थापना आणि विस्तारामध्ये भारत दीर्घकाळापासून एक विकास भागीदार राहिला आहे. यापूर्वी भारताने 2016 मध्ये 7.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि 2018 मध्ये 15.02 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे अनुदान दिले होते.

या उपक्रमांच्या माध्यमातून 297 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, ज्यांनी कोविड-19 महामारी आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

आता पुरवल्या जाणाऱ्या अतिरिक्त 100 रुग्णवाहिकांमुळे ही यशस्वी भागीदारी अधिक दृढ होईल आणि श्रीलंकेचे आपत्कालीन आरोग्य सेवा जाळे अधिक सक्षम होईल.

श्रीलंकेत 50 मेडिकल किओस्क अर्थात वैद्यकीय दालने / हेल्थ एटीएम आरोग्य एटीएम साठी भारताकडून मदतीची घोषणा

द्विपक्षीय आरोग्य सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने,  नड्डा यांनी श्रीलंकेतील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी 50 मेडिकल किओस्क किंवा हेल्थ एटीएम उपलब्ध करून देण्यास भारताचा पाठिंबा जाहीर केला.

या उपक्रमासाठी भारत सरकार 225 दशलक्ष श्रीलंकन रुपयांपर्यंतचे अनुदान देणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 दरम्यान श्रीलंकेत आलेल्या डिटवाह  चक्रीवादळानंतर, भारत सरकारने जाहीर केलेल्या 450 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या सर्वसमावेशक पुनर्वसन पॅकेजचा हा एक भाग आहे.

 

हे मेडिकल किओस्क श्रीलंकेतील आरोग्य या  प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसवले जातील. याद्वारे रुग्णांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी रोगनिदान सेवा मिळतील, ज्या टेलिमेडिसिन सुविधांशी जोडलेल्या असतील. या उपक्रमामुळे अत्यावश्यक निदान सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल, वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे शक्य होईल आणि तंत्रज्ञानावर आधारित प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होतील. विशेषतः अशा समुदायांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल, ज्यांना सुलभ आणि कार्यक्षम आरोग्य सेवांची गरज आहे.

हे उपक्रम श्रीलंकेच्या आरोग्य प्रणालीला पाठिंबा देण्याच्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विकास भागीदारीला पुढे नेण्याच्या भारताच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत.

नड्डा यांची नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांशी भेट; द्विपक्षीय आणि प्रादेशिक आरोग्य सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा.

पहिली बिम्स्टेक  आरोग्य मंत्री परिषद सुरू असताना, नड्डा यांनी नेपाळच्या आरोग्य आणि खाद्य सुरक्षा मंत्री,  नीशा मेहता यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

 

***

Shailesh Patil / Vaibhavi Joshi / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335262) अभ्यागत कक्ष : 8