दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्ट आणि इंडिगोतर्फे 15 विमानांमध्ये डिजिटल डिटॉक्स 2.0 उपक्रमाचे आयोजन

Posted On: 10 NOV 2026 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया पोस्ट अर्थात टपाल विभागाने इंडिगो एअरलाईन्सच्या सहकार्याने डिजिटल डिटॉक्स 2.0 या उपक्रमाचे आयोजन केले. पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, विमानामध्ये पोस्टकार्ड लिहिण्याचा हा दुसरा टप्पा होता. सणासुदीच्या काळात राबवलेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांना आपल्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हाताने लिहिलेली पोस्टकार्ड्स वापरण्याची एक अनोखी संधी मिळाली.

ही मोहीम इंडिगोच्या 15 विमानांमध्ये राबवण्यात आली, ज्याद्वारे चंदीगड, रांची, बागडोगरा, दिल्ली, मुंबई, गोवा, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, वाराणसी आणि जयपूर अशा 11 शहरांमधील प्रवाशांपर्यंत पोहोचता आले. प्रवाशांना विशेष डिजिटल डिटॉक्स किट देण्यात आले, ज्यामध्ये पोस्टकार्ड्स, ग्रीटिंग कार्ड्स आणि दिवाळीच्या खास स्टिकर्सचा समावेश होता. याद्वारे प्रवाशांना स्क्रीनपासून दूर राहून, स्वतःच्या हाताने सणासुदीचे संदेश लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

 

पहिल्या आवृत्तीच्या यशानंतर, या उपक्रमाचा उद्देश हाताने पत्र लिहिण्याची परंपरा पुन्हा जिवंत करणे आणि मनापासून संवाद साधण्याला प्रोत्साहन देणे हा होता. विमान प्रवाशांना पत्र लेखनाचा अनुभव देऊन, या मोहिमेने डिजिटल युगातही वैयक्तिक पत्रव्यवहाराचे महत्त्व आणि त्याचे चिरंतन आकर्षण अधोरेखित केले.

प्रवाशांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आणि आपले अविस्मरणीय अनुभव व्यक्त केले. एका प्रवाशाने सांगितले, 30,000 फूट उंचीवर असताना पोस्टकार्ड लिहिणे हा एक अद्भुत अनुभव होता, जो माझ्या कायम स्मरणात राहील. दुसऱ्या एका सहभागी व्यक्तीने म्हटले, मी पहिल्यांदाच पोस्टकार्ड लिहिले. आजच्या झटपट डिजिटल संवादाच्या युगात, हाताने लिहिलेले संदेश किती खास असू शकतात, याची जाणीव मला झाली. सणासुदीच्या वातावरणाशी सुसंगत अशा या उपक्रमाचे कौतुक करताना एका प्रवाशाने म्हटले, डिजिटल संदेशापेक्षा हाताने लिहिलेल्या पोस्टकार्डद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा पाठवणे अधिक वैयक्तिक आणि अर्थपूर्ण वाटले.

डिजिटल डिटॉक्स 2.0 च्या माध्यमातून इंडिया पोस्टने नाविन्यपूर्ण जनसंपर्काप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पत्रांच्या माध्यमातून लोकांना जोडण्याच्या कालातीत परंपरेला जपत, दिवाळीच्या उत्सवात एक वैयक्तिक स्पर्श जोडण्याचे काम या उपक्रमाने केले आहे.

   

    

 

* * *

सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334786) अभ्यागत कक्ष : 5