राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 10 NOV 2026 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2026

 

भारतीय पोलीस सेवेच्या 78 आरआर (2025 तुकडी) मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (10 नोव्हेंबर 2026) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, नागरिकांसाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे प्रशासनाचे प्रतीक असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सहसा पोहोचू न शकणाऱ्या सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींच्या मनातील भीती दूर करण्याला आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, व्यवस्थेतील काही कर्मचारी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा अधिक कुशल असू शकतात. त्यामुळे अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आपल्या पथकातील अगदी कनिष्ठ सदस्यांकडूनही शिकण्यास संकोच करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या कामाच्या पद्धतीत लोकसहभाग आणि सांघिक कार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले. पथकातील सदस्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिल्याने त्यांची क्षमता आणि उत्साह वाढेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस व्यवस्थेशी संबंधित कायदे आणि नियमांमधून मोठे अधिकार प्राप्त होतात. मात्र, त्यांच्या कामगिरीच्या आणि मूल्यव्यवस्थेच्या आधारेच ते लोकांचा खरा आदर मिळवू शकतात. नागरिकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याऐवजी नागरिकांची सेवा करण्याची भावना त्यांनी बाळगली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ते अधिक गंभीर स्वरूपाचे होत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या गांभीर्याबाबत पोलिसांनी समाजात अधिक व्यापक प्रमाणात जागरूकता निर्माण केली पाहिजे. अशा गुन्ह्यांकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोनही पोलीस अधिकाऱ्यांनी नव्याने विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डीपफेक सामग्रीमुळे नागरिकांसमोर नवे धोके निर्माण होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिकारी नेहमीच एक पाऊल पुढे राहतील, याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

   

 

* * *

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2334677) अभ्यागत कक्ष : 6