Posted On:
07 NOV 2026 1:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 07 नोव्हेंबर 2026
नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी संरक्षण दलांनी सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने देखरेख ठेवण्यावर, सायबर लवचिकता तसेच माहितीची अखंडता बळकट करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्वोच्च स्तरावरील परिचालनात्मक सज्जता राखायला हवी असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. दिनांक 07 नोव्हेंबर 2026 रोजी, दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्त भारतीय हवाई दलाच्या पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे असलेल्या तळावर तैनात जवानांशी ते बोलत होते. ते म्हणाले की संरक्षणविषयक परिदृश्य अलीकडे अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे आणि सध्याची युद्धनीती सीमेलगतच्या पारंपरिक कार्यांच्या पलीकडे पोहोचून, असममित युध्द, छुपी युद्धे, सायबर-हल्ले, ड्रोन्सचे थवे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवण्यापर्यंत आणि त्यांच्या विचारसरणीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत विस्तारली आहे.

“बहुतेकदा, शत्रू थेट संघर्ष टाळतो आणि त्याऐवजी आपल्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. समाज माध्यमांद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवून, हा शत्रू स्थानिक जनता आणि आपले सैनिक यांच्या मनांमध्ये संशयाची बीजे रोवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी तुम्हा सर्वांची भूमिका एका सामान्य सैनिकापेक्षाही अधिक विस्तारते,” संरक्षणमंत्री म्हणाले.
बागडोगरा हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश असून तो भारताच्या, विशेषतः ईशान्य प्रदेशासाठीच्या संरक्षण विषयक आराखड्यातील महत्त्वाचा दुवा आहे असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याप्रति संरक्षण दलाच्या जवानांनी दाखवलेले धैर्य आणि समर्पणवृत्ती यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की या भागात तैनात केलेले हे हवाई योद्धे देशाच्या पूर्व भागाच्या संरक्षणासाठीचे मजबूत कवच म्हणून कार्य करतात आणि त्यांची सज्जता या भागात स्थैर्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी जवानांची शिस्त आणि धैर्य हे गुण आजही अपरिहार्य आहेत हे अधोरेखित करत संरक्षणमंत्री म्हणाले की संरक्षण दलांतील जवानांची वर्तणूक, देहबोली, भाषा तसेच त्यांचा संयम हे गुण स्थानिक समुदायांमध्ये लष्कराची प्रतिमा घडवतात. या गुणांसह स्वतःची कर्तव्ये पार पाडल्याबद्दल सैनिकांची प्रशंसा करुन संरक्षणमंत्र्यांनी त्यांना स्थानिक जनतेशी, विशेषतः बागडोगरामधील आणि परिसरातील लोकांशी असलेला संवाद आणखी दृढ करण्याची तसेच सामान्य जनता आणि संरक्षण दले यांच्यात विश्वास आणि स्नेहाचा घट्ट बंध जोपासण्याची सूचना केली. “जितका तुम्ही स्थानिक समुदायाशी अधिकाधिक संवाद साधाल तितके शत्रूपक्षाचे कारस्थान दुर्बल होत जाईल,” ते म्हणाले.

‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ड्रोन, ड्रोनविरोधी यंत्रणा आणि प्रगत लष्करी उपकरणांच्या विकासात भारतीय स्टार्टअप्स आणि उद्योगांचे वाढते योगदान अधोरेखित केले. स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याबद्दल तसेच ड्रोन संचालन आणि सायबर सुरक्षेतील नवीन कौशल्ये आत्मसात केल्याबद्दल त्यांनी संरक्षण दलांचे कौतुक केले. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी लष्कर अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.


अग्निवीरांसाठी ‘ सेकंड टूर ऑफ ड्युटी’ म्हणजे या पदाचा सेवा कालावधी संपल्यानंतर, दुसऱ्यांदा सेवेची संधी या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीचा संदर्भ देताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे अग्निवीरांना पुन्हा एकदा देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्व अग्निवीरांना त्यांच्या इच्छेनुसार आणि निवड निकषांची पूर्तता केल्यास नियमित सैनिक म्हणून भरती होण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय अग्निवीरांसाठी दिवाळीची महत्त्वपूर्ण भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, संरक्षण दलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

राजनाथ सिंह यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि हवाई योद्धे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. सणाच्या काळात कुटुंबीयांपासून दूर राहावे लागत असतानाही हे जवान आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दृढनिश्चयी आणि अढळ राहतात, असे त्यांनी सांगितले. जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सैनिक सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असताना, देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव उभा राहील आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित, बागडोगरा हवाई दल तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर मनीष शर्मा आणि भारतीय हवाई दलाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai