माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हएक्सतर्फे इफ्फी गोवा 2026 मधील वेव्ह्स बाजार मध्ये सहभागी होण्यासाठी स्टार्टअप्सना आमंत्रण


इफ्फी गोवा 2026 मधील वेव्ह्स बाजारासाठी वेव्हएक्स अंतर्गत स्टार्टअप पॉड्सच्या नोंदणीला सुरुवात

वेव्ह्स बाजारातील वेव्हएक्स स्टॉल्सच्या माध्यमातून चित्रपट आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख स्टार्टअप्सना आपली उत्पादने सादर करण्याची संधी; जागतिक स्तरावर ओळख आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार

 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गोवा येथे 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) वेव्ह्स बाजारातील वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियनमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रपट आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत.

या उपक्रमाचा उद्देश नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान आणि उपाययोजना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि माध्यम क्षेत्रासमोर सादर करण्यासाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.  तसेच, जागतिक सर्जनशील परिसंस्थेतील चित्रपट निर्माते, निर्मिती संस्था आणि गुंतवणूकदारांसोबत नेटवर्किंग, उद्योग सहभाग आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

चित्रपट आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत डीपीआयआयटी-नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठी अर्ज खुले आहेत. पात्र स्टार्टअप्सचा विचार वेव्हएक्सद्वारे गठित निवड समितीच्या छाननी आणि मूल्यांकन प्रक्रियेद्वारे केला जाईल.

इच्छुक आणि पात्र स्टार्टअप्सना अर्ज करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या नवकल्पना सादर करण्याच्या या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

नोंदणी अर्ज आणि अधिक माहिती wavex.wavesbazaar.com येथे उपलब्ध आहे. प्रश्नांसाठी Wavex-mib[at]gov[dot]in या ईमेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.

इफ्फी, गोवा विषयी

1952 मध्ये स्थापन झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. जागतिक चिनत्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा गौरव करणारा हा महोत्सव भारतासह जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार, निर्माते आणि चित्रपट रसिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. गोव्यात दरवर्षी आयोजित होणारा इफ्फी जागतिक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणतो, विविध चित्रपट कलाकृतींचे प्रदर्शन करतो, सर्जनशील देवाणघेवाणीला प्रोत्साहन देतो आणि चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देतो.

वेव्हएक्स विषयी

वेव्हएक्स (वेव्ह्स स्टार्टअप अॅक्सिलरेटर) हा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्टार्टअप अॅक्सिलरेटर आणि इन्क्युबेशन उपक्रम आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नवकल्पना, उद्योजकता आणि उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, विस्तारित वास्तव (एव्हीजीसी-एक्सआर) आणि मीडिया तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत स्टार्टअप्सना पाठबळ देण्यावर हा उपक्रम लक्ष केंद्रित करतो.

***

नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333934) अभ्यागत कक्ष : 12