कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
Posted On:
06 NOV 2026 4:47PM by PIB Mumbai
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राष्ट्रीय डिजिटल जीवन प्रमाणपत्र (हयातीचा डिजिटल दाखला) मोहीम 5.0 सुरू केली. या मोहिमेच्या पहिल्या पाच दिवसांत सुमारे 40 लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत तयार झालेल्या सुमारे 25 लाख प्रमाणपत्रांच्या तुलनेत ही संख्या 60 टक्क्यांनी अधिक आहे.
याच कालावधीत चेहरा ओळख प्रमाणीकरणाच्या (Face Authentication) स्वीकारार्हतेचे प्रमाण 61 टक्क्यांवरून जवळपास 80 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होणाऱ्या निवृत्तीवेतन सेवांवरील निवृत्तीवेतनधारकांचा विश्वास वाढत असल्याचे यातून दिसून येते. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या मोहिमेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून डिजिटल नवकल्पनांमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ, सोयीस्कर आणि सन्मानजनक होत असून त्यांचे जीवनमानही सुधारत असल्याचे स्पष्ट होते.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ही मोहीम आता देशव्यापी चळवळ बनली आहे. अखंडित सेवा पुरवण्यासाठी सरकारी विभाग, निवृत्तीवेतन वितरित करणाऱ्या बँका, निवृत्तीवेतनधारकांच्या संघटना आणि त्यांचे कुटुंबीय या मोहिमेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणकारी संघटना आणि कुटुंबातील सदस्य डिजिटल जीवन प्रमाणपत्रे मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यामुळे ही मोहीम आता अधिकाधिक ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ या संकल्पनांवर आधारित चळवळ बनली आहे. आजी-आजोबांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात मदत करणारी नातवंडे, यामुळे तंत्रज्ञानाचा स्वीकार हा कुटुंबासाठी एक आनंददायी अनुभव ठरत आहे, असे ते म्हणाले. या मोहिमेची वाढती स्वीकारार्हता नागरिक-केंद्रित प्रशासनाला चालना देण्यासाठी सरकारी संस्था, निवृत्तीवेतनधारक आणि समाज यांच्या सामूहिक सहभागाचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी नमूद केले.




***
Sushma Kane / Ashutosh Save / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai