मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
Posted On:
06 NOV 2026 8:26AM by PIB Mumbai
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्री, राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, 5 नोव्हेंबर 2026 रोजी पद्मश्री डॉ. अय्यप्पन कॉन्फरन्स हॉल, एनएफडीबी, हैदराबाद येथे राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या (एनएफडीबी) 13 व्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीला तेलंगणाचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री वाकिटी श्रीहरी, अरुणाचल प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री गॅब्रिएल डेनवांग वांगसू, आणि त्रिपुराचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधांशु दास हे देखील उपस्थित होते. राज्य/केंद्रशासित प्रदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रतिनिधी आणि एनएफडीबी नियामक मंडळाचे 13 अशासकीय सदस्य देखील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी एनएफडीबी ला आवाहन केले की, त्यांनी एक सक्रिय विकास संस्था म्हणून आपली भूमिका अधिक बळकट करावी, मत्स्यशेती करणाऱ्यांपर्यंत थेट पोहोच वाढवावी आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी अधिक जवळचा समन्वय साधावा. मच्छीमारांचे उत्पन्न आणि उपजीविकेची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी आणि पूर्णता करण्यावर, तसेच निधीचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्र्यांनी उत्पादन, पुरवठा आणि उपभोग यामधील तफावत भरून काढण्यासाठी आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ईशान्येकडील आणि देशातील इतर राज्यांना विशेष सहाय्य देण्याचे निर्देश दिले. मत्स्य उत्पादनात 2019-20 मधील 141.64 लाख टनांवरून आता 197.75 लाख टनांपर्यंत झालेली वाढ लक्षात घेता, त्यांनी उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यावर भर दिला. तसेच, एनएफडीबीच्या च्या भविष्यातील उपक्रमांना दिशा देण्यासाठी मोजता येण्याजोगे परिणाम महत्त्वाचे ठरतील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागाचे सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी जलकृषी (ॲक्वाकल्चर) क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि सध्या सुमारे 70,000 कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीला बळकटी देण्यासाठी विभाग आणि राज्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. एनएफडीबीची डिजिटल उपस्थिती बळकट करण्यावर आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी भागधारकांचा पाठिंबा आणि अभिप्राय यंत्रणा सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला. सहकारी संस्था, मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था, स्टार्टअप्स आणि खासगी उद्योजकांच्या माध्यमातून अधिकाधिक खासगी गुंतवणूक आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे त्यांनी आवाहन केले. त्याचबरोबर, मत्स्यपालन धोरणे आणि कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यामध्ये निरंतर सुधारणा करण्यासाठी राज्यांशी नियमित सल्लामसलत करणे, आणि संबंधित भागधारकांकडून अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि मत्स्य बाजार तसेच एकात्मिक 'ॲक्वा पार्क्स' उभारण्यासाठी केंद्राकडून निरंतर सहकार्याची मागणी केली. त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि ग्रामीण विकास कार्यक्रमांमधील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर दिला, यामुळे 'अमृत सरोवर', जलाशय आणि इतर जलस्रोतांचा वापर मत्स्यव्यवसाय विकासासाठी उत्पादकपणे करता येईल. केंद्रीय मंत्र्यांनी मच्छिमार, उद्योजक, महिला, स्वयं-सहायता गट आणि अधिकारी यांच्यासाठी अधिक उत्तम प्रशिक्षण, क्षमता विकास, तसेच आंतर-राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, तसेच पीएमएमएसवाय अंतर्गत लाभार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू ठेवण्यावर भर दिला. त्यांनी पोषण-केंद्रित जनजागृती उपक्रमांद्वारे माशांच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
एनएफडीबी चे मुख्य कार्यकारी डॉ. विजय कुमार बेहरा यांनी मत्स्यव्यवसाय आणि जलसंवर्धन क्षेत्रात मंडळाद्वारे राबवले जाणारे प्रमुख उपक्रम, कामगिरी, आणि सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला. त्यांनी एनएफडीबीद्वारे राबवले जाणारे विविध मत्स्यव्यवसाय उपक्रम, योजना आणि कार्यक्रमांच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आणि या क्षेत्राच्या विकासासाठी मंडळाकडून सुरू असलेल्या हस्तक्षेपाची प्रशासकीय मंडळाला माहिती दिली.
प्रभावी अंमलबजावणी, अधिक मजबूत केंद्र-राज्य समन्वय आणि परिणाम-केंद्रित उपाययोजनांद्वारे मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेतीच्या विकासाला गती देण्याच्या दिशेने केंद्र सरकार, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, एनएफडीबी आणि इतर भागधारकांच्या सामूहिक वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला.
***
NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai