पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी साधला संवाद

2010 मध्ये 14 पदकांपासून सुरू झालेला प्रवास 114 पदकांपर्यंत पोहोचला, हा तुमच्या अथक परिश्रमांचा आणि समर्पणाचा सर्वोत्तम पुरावा आहे: पंतप्रधान

ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून, यंदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी आपल्या तरुणांना प्रतिभाशोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे: पंतप्रधान

सरकारने खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे, आता आपल्या क्रीडा साहित्य उत्पादन उद्योगाने नवे टप्पे गाठण्याची वेळ आली आहे: पंतप्रधान

भारतीय किंवा परदेशी खेळाडू जेव्हा मैदानात उतरतील, तेव्हा त्यांचे क्रीडा साहित्य, पोशाख आणि पादत्राणेही ‘मेड इन इंडिया’ असावीत: पंतप्रधान

भारताने जागतिक दर्जाचे खेळाडू घडवावेत आणि जागतिक दर्जाची क्रीडा उपकरणेही तयार करावीत, अशी आमची इच्छा आहे: पंतप्रधान

Posted On: 05 NOV 2026 7:52PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी संवाद साधला.

काही आठवड्यांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना भेटण्यासाठी आपण आतुर होतो, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीतून भारत एक प्रमुख जागतिक क्रीडाशक्ती म्हणून वेगाने उदयाला येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. 140 कोटी देशवासीयांच्या वतीने त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा, प्रशिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल गौरव केला. या खेळाडूंनी केवळ मोठ्या व्यासपीठावर पदकेच जिंकली नाहीत, तर देशातल्या लाखो लोकांची मनेही जिंकली आहेत, असे ते म्हणाले.

पूर्वीच्या काळात भारताचा क्रीडा स्पर्धांमधील सहभाग केवळ औपचारिकता मानला जात असे आणि पॅरा क्रीडा प्रकारांमध्येही देश मागे होता, याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी 2010 च्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेल्या केवळ एका सुवर्णपदकासह एकूण 14 पदकांचा उल्लेख केला. त्यानंतर भारतीय पथकाने ऐतिहासिक झेप घेत 114 पदके जिंकली. यामध्ये 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्यपदकांचा समावेश आहे. याशिवाय 5 विश्वविक्रम आणि 9 आशियाई विक्रमही या खेळाडूंनी नोंदवले आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

56 महिला खेळाडूंपैकी 34 जणींनी पदके जिंकली, चार क्रीडा प्रकारांमध्ये पोडियमवरील तिन्ही पदके भारतीय खेळाडूंनी पटकावली आणि स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय पथकाने नऊ सुवर्णपदके जिंकली, हे नमूद करत त्यांनी स्पर्धेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विजयी घोडदौड कायम राखण्याच्या खेळाडूंच्या अथक जिद्दीचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “14  पदकांपासून 114 पदकांपर्यंतचा हा प्रवास तुमच्या कठोर परिश्रमाची  पराकाष्ठा आहे.”

ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताला यापूर्वी कधीही यश मिळाले नव्हते, अशा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथमच पटकावलेल्या सुवर्णपदकांचा उल्लेख करत , पंतप्रधान म्हणाले की, मोना अग्रवाल हिने पॅरा-शूटिंगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला, तर हनीने स्वतःचाच जुना जागतिक विक्रम मोडीत काढला. "हिमांशू, रवी आणि जेहान यांनी आपल्या कामगिरीने  जगाला दाखवून दिले की, शारीरिक आव्हानांवर मात कशी करायची असते," असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, खेळाडूचे वैयक्तिक यश असो किंवा सामूहिक विजय असो ,विजयाची चमक संपूर्ण जग पाहत असते. मात्र त्या यशाची भव्य इमारत ही अनेक वर्षांची मेहनत , दिवसरात्र गाळलेला घाम आणि अथक तपस्येवर उभी असते असे सांगत त्यांनी खेळाडू रिंकूचे उदाहरण दिले, ज्याने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या अवघ्या दोन महिने आधी आपल्या आईला गमावले, एवढ्या मोठ्या दुःखद प्रसंगी त्याने धैर्याने परिस्थिती हाताळली आणि सुवर्णपदक जिंकल्यावर आपल्या आईचा फोटो उंचावून तिला ते पदक समर्पित केले ,  "त्या क्षणाने आम्हा सर्वांना भावूक केले." असे  पंतप्रधान मोदी म्हणाले.

खेळाडूंचा संघर्ष आणि यश  अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी त्यांच्या वैयक्तिक प्रवासातील आणि विकासाच्या दिशेने देशाच्या वाटचालीतील  साधर्म्याकडे  लक्ष वेधले. . "आज तुमचे प्रयत्न आणि देशाचे प्रयत्न एकत्र येऊन एक अजेय शक्ती बनत आहेत," असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान म्हणाले की, ज्याप्रमाणे खेळाडूंनी संकटांसमोर हार मानली नाही, त्याचप्रमाणे देशानेही आपली व्यवस्था आमूलाग्र बदलण्याचा संकल्प केला आहे, जेणेकरून तरुणांमधील प्रतिभा वाया जाणार नाही. यामुळे तरुण खेळाडूंमध्ये  विश्वास निर्माण झाला आहे की, देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

 

तिरंदाजी, ॲथलेटिक्स, नेमबाजी, पोहणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, ज्युडो आणि पॉवरलिफ्टिंग या खेळांमध्ये भारताची कामगिरी सातत्याने उंचावत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये,  पदार्पण करणाऱ्या 61 खेळाडूंपैकी 36 खेळाडूंनी पदके जिंकली, तर संदीपने पदार्पणातच जागतिक विक्रम नोंदवला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "तरुणांचा हा सहभाग म्हणजे आजच्या भारताचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातील भारताची झलकही त्यातून दिसते," असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

क्रीडा क्षेत्राकडे सरकार केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे माध्यम म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रबांधणीचे महत्त्वाचे साधन म्हणून पाहते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. खेळांमुळे तरुणांमध्ये जीवनातील आवश्यक मूल्ये रुजतात, असेही त्यांनी सांगितले. "खेळच तरुणांना पराभवानंतर पुन्हा विजय मिळवण्याची प्रेरणा देतात. तसेच शिस्त आणि सांघिक भावनेचे महत्त्व शिकवतात," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

शाळा आणि तळागाळातील स्तरावर राबवण्यात येणाऱ्या मोहिमा, अनेक 'खेलो इंडिया केंद्रे' आणि टॉप्स (TOPS – Target Olympic Podium Scheme) योजनेअंतर्गत ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशात आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धांवर लक्ष केंद्रित करून देशभरात राबवण्यात येणाऱ्या गुणवत्ता शोध मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन लाल किल्ल्यावरून अलीकडेच तरुणांना केले होते, याची आठवण करून दिली. "याच दृष्टिकोनातून आम्ही देशासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण करत आहोत," असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय उपक्रमांमध्ये दिव्यांगांच्या-क्रीडा स्पर्धांनाही  समान प्राधान्य दिले जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम अलीकडील स्पर्धेत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. "या स्पर्धेत टॉप्स  योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या खेळाडूंनी 41 पदके, तर खेलो इंडिया उपक्रमातील खेळाडूंनी 19 पदके जिंकली. यावरून आमचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताची आधुनिक क्रीडा धोरणे केवळ मैदानापुरती मर्यादित नसून, त्यातून तरुणांसाठी विविध क्षेत्रांत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. क्रीडा पायाभूत सुविधांची उभारणी, क्रीडा साहित्याचे उत्पादन आणि क्रीडा स्पर्धांच्या प्रक्षेपणाशी संबंधित उद्योगांचा वेगाने विस्तार होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "आज भारतातील आधुनिक क्रीडा धोरणांमुळे मैदानाबाहेरही क्रीडा क्षेत्रात तरुणांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत," असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

अलीकडेच 1,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 'खेलो इंडिया क्रीडा साहित्य उत्पादन योजने'ला  मिळालेल्या मंजुरीचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी देशांतर्गत क्रीडा उत्पादन उद्योगाला असे आवाहन केले की, जगभरातील खेळाडू जेव्हा मैदानावर उतरतील तेव्हा त्यांचे क्रीडा साहित्य, त्यांनी परिधान केलेला पोशाख आणि पादत्राणे ही भारतात बनवलेली असतील यासाठी प्रयत्न करावेत; ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळ मिळेल आणि लहान शहरांमध्ये व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. "भारताने जागतिक दर्जाचे खेळाडू घडवावेत आणि जागतिक दर्जाचे क्रीडा साहित्यही तयार करावे, अशी आमची इच्छा आहे," असे मोदी यांनी सांगितले.

आगामी  काळात ज्यावेळी हे खेळाडू शाळा, महाविद्यालये आणि संस्थांना भेटी देतील तेव्हा, त्यांनी मैदानावरील विजयासोबतच मैदानाबाहेरील क्रीडा क्षेत्रातील करिअरबाबत तरुणांना मार्गदर्शन करावे, तसेच दिव्यांगांसाठीच्या सरकारी उपक्रमांवर प्रकाश टाकावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दिव्यांगांचे निवृत्तीवेतन वाढवणे, त्यासाठीच्या पात्रतेची अट 80 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत खाली आणणे आणि वयाच्या 18 वर्षांऐवजी जन्मापासूनच पेन्शन संरक्षणाचे कवच देणे, या अलीकडील केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयाकडे त्यांनी या खेळाडूंचे लक्ष वेधले. यासोबतच 10,000 शब्दांचा 'इंडियन साइन लँग्वेज' अर्थात भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश तयार करणे, सांकेतिक भाषेतील शालेय पुस्तके उपलब्ध करून देणे आणि 'सुगम्य भारत अभियाना'अंतर्गत सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगासाठी सहज हाताळणीयोग्य बनवणे या उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला. “देशातील प्रत्येक दिव्यांग भावाला आणि बहिणीला सन्मान मिळावा, समान संधी मिळाव्यात आणि ते स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर जीवनात पुढे जाऊ शकतील, हाच आमचा प्रयत्न आहे,” अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

आयची-नागोया मधील पोडियम म्हणजे पारितोषिकप्राप्तीच्या मंचापर्यंत केलेली कामगिरी ही अंतिम लक्ष्यप्राप्ती नसून ती केवळ एक सुरुवात आहे, कारण भारताचे लक्ष आता लॉस एंजेलिस 2028 खेळांवर केंद्रित आहे, ज्यासाठी अवनी आणि मनिष यांनी आधीच कोटा निश्चित केला आहे, याची आठवण पंतप्रधानांनी पथकाला करून दिली. 2028 मध्ये विक्रमी सहभाग आणि पदकांची कमाई सुनिश्चित करण्यासाठी खेळाडूंनी त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करावा आणि त्वरित तयारीला लागावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि आपल्या शुभेच्छा देऊन भाषणाचा समारोप केला. “देश तुमच्या पाठीशी आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पुढील विजयाची वाट पाहत आहे,” असा विश्वास  मोदी यांनी व्यक्त केला.

***


Radhika Aghor / Nikhilesh Chitre / Sushma Kane / Ashutosh Save / Shailsh Patil / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333367) अभ्यागत कक्ष : 16