Posted On:
04 NOV 2026 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज जयपूरमध्ये 'वाणिज्य भवन' आणि 'उद्योग भवन'चे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. याद्वारे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच त्याच्याशी संबंधित आणि संलग्न संस्थांची कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली एकत्र आणणारे जयपूर हे देशातील पहिले शहर आणि एखाद्या राज्याची पहिली राजधानी ठरली आहे.
या उपक्रमाबद्दल वाणिज्य विभाग आणि उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांचे गोयल यांनी अभिनंदन केले. हा प्रकल्प देशभरात, विशेषतः प्रत्येक राज्याच्या राजधानीत ही संकल्पना राबवण्यासाठी जलद गतीने कृती करण्याची सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही केंद्रे उद्योगांना आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला पाठबळ देणारी केंद्रे म्हणून काम करतील तसेच निर्यात, गुंतवणूक आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रसाराशी संबंधित उपक्रमांसाठी 'एक-थांबा' स्थान म्हणून कार्य करतील. ही केंद्रे 'विकसित भारत 2047' च्या प्रवासात व्यवसाय आणि उद्योगांना देखील पाठबळ देतील, असे त्यांनी सांगितले.
परवाना आणि परवानगीसाठी अर्ज, SCOMET मंजुरी आणि इतर सेवांच्या अर्जांसह सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केल्या पाहिजेत, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. देशभरातील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या प्रादेशिक प्राधिकारणांकडील मागील डेटा आणि रेकॉर्डच्या डिजिटायझेशनसह आवश्यक डिजिटायझेशन पूर्ण करण्यासाठी त्यांनी 31 मार्च 2027 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. 1 एप्रिल 2027 पासून, या सेवांसाठी कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता किंवा अपेक्षा असणार नाही.
जिथे मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक असेल, तिथे कागदपत्रांची पडताळणी आणि अपलोडिंग सुलभ करण्यासाठी एक लहान काउंटर उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. आवश्यक असेल तिथे, कागदपत्रांची एकाच वेळी पडताळणी आणि अपलोडिंग सक्षम करण्यासाठी कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर संगणक देखील बसवले जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने नागरिक आणि व्यवसायांवर आपला विश्वास दर्शवला पाहिजे, यावर भर देत, मंत्रीमहोदयांनी स्वयं-प्रमाणित पद्धतीला आणि भागधारकांवर अधिक विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन दिले.
गोयल यांनी प्रक्रिया, स्वरूप आणि अर्ज सोपे करण्याचे आवाहन केले, तसेच विभागांनी संस्थात्मक सीमा ओलांडून व्यवसाय आणि नागरिकांसाठी अधिक चांगले परिणाम देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन विभाग आणि मंत्रालयाअंतर्गत विविध संस्थांमधील सुधारित समन्वय आवश्यक असेल, असे गोयल म्हणाले.
सध्या मंत्रालयाची सुमारे 500 कार्यालये आणि 46 संस्था आहेत. मुंबईतील ईसीजीसीच्या मोठ्या कार्यालयासारख्या अत्यंत मोठ्या परिसरांव्यतिरिक्त, जी स्वतंत्रपणे कार्यरत राहतील ती इतर सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या व्यवस्थेअंतर्गत एका ठिकाणी आणली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. एकाच ठिकाणी असलेली ही केंद्रे केवळ तेथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या संस्थांसाठीच सेवा देणार नाहीत, तर मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सर्व 46 संस्था आणि विविध विभागांच्या सेवा सुलभ करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक भू-राजकीय घडामोडींमधील मोठ्या अनिश्चिततेच्या आणि अस्थिरतेच्या काळात कार्यक्षम सेवा वितरणाचे महत्त्व अधोरेखित करताना, वेळेचे पालन आणि स्पर्धात्मकता यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे गोयल यांनी सांगितले. प्रत्येक कार्यालयाचे कामकाज सुलभ, सहकार्यपूर्ण, अनुकूल आणि उपयुक्त असेल याची खातरजमा करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. एकाच छताखाली कार्यालये एकत्र आणल्याने त्यांच्या कामकाजात नियंत्रण आणि संतुलन प्रस्थापित करण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
देशभरात सुरू असलेल्या कामावर अधूनमधून देखरेख करणे शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक कार्यालय नवी दिल्लीतील वाणिज्य भवनातील मुख्य सर्व्हरशी जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. सतत देखरेख ठेवणे हा याचा उद्देश नसून कामकाजावर लक्ष ठेवणे आणि चोरी व अशा प्रकारच्या इतर घटनांपासून संरक्षण प्रदान करणे हे नियतकालिक तपासणीचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
* * *
माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai