Posted On:
03 NOV 2026 8:45AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाने 48 तासांहून अधिक काळ चाललेल्या वेगवान आणि समन्वित मोहिमेत, 'अझिनी' मासेमारी जहाजाची सशस्त्र चाच्यांच्या तावडीतून यशस्वीपणे सुटका केली. या मोहिमेत जहाजावरच्या सर्व 20 कर्मचाऱ्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोमालियाच्या ईशान्य किनारपट्टीवर सशस्त्र चाच्यांच्या टोळीने ‘अझिनी’ या मासेमारी जहाजाचे अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. या जहाजाच्या अपहरणामुळे सागरी सुरक्षेपुढे मोठा धोका निर्माण झाला होता, तसेच भविष्यात या भागातील व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी 'मदर शिप' म्हणून या जहाजाचा वापर केला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, भारतीय नौदलाने मोहिमेवर तैनात असलेल्या एका युद्धनौकेला हस्तक्षेप करण्याचे काम सोपवले, यात सागरी टेहळणी करणाऱ्या विमानाचेही सहकार्य मिळाले. निकट समन्वयाने काम करत, या पथकाने सतत पाळत ठेवून अपहरणग्रस्त जहाजाचा शोध घेतला, त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला आणि जहाजाची हालचाल रोखण्यासाठी, तसेच ते निसटून जाऊ नये, यासाठी कॅलिब्रेटेड नॉन-कायनेटिक युद्ध शैलीचा प्रयोग केला.
भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) सी-17 विमानाद्वारे अचूक एअरड्रॉप करून मरिन कमांडोंना बळ देण्यात आले.
भारतीय नौदलाने अत्यंत जलद आणि सुव्यवस्थित रणनैतिक कारवाई करून, जहाजाचा ताबा मिळवला, चाच्यांवर मात केली आणि जहाजावरील सर्व 20 कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे सुटका केली.
ही यशस्वी मोहीम भारतीय नौदलाची उच्च परिचालन सज्जता आणि विविध सेवांमधील उत्तम समन्वयाद्वारे गुंतागुंतीच्या सागरी सुरक्षा मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याच्या क्षमतेचा दाखला आहे. यामधून हिंद महासागर क्षेत्रात प्रथम प्रतिसाद देणारा आणि पसंतीचा सुरक्षा भागीदार राहण्याप्रति भारताची अतूट वचनबद्धता देखील अधोरेखित होते.
भारतीय नौदल खुलाशांची सुरक्षा, महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांच्या संरक्षण आणि हिंद महासागर क्षेत्रात सुरक्षित, संरक्षित आणि स्थिर सागरी वातावरण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
(1)_20261103085727_c6f33c.jpeg)
(1)_20261103085740_15977f.jpeg)
***
NitinFulluke / RajashreeAgashe/ DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai