Posted On:
01 NOV 2026 4:30PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चंदीगड पोलिसांच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित हीरक महोत्सवी सोहळ्याला उपस्थिती लावली आणि चंदीगड पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर प्रदान करण्याच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. यावेळी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाब चंद कटारिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, आज चंदीगड पोलिसांना प्रदान करण्यात आलेला प्रेसिडेंट्स कलर हा त्यांच्या सहा दशकांच्या सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचा गौरव आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणे ही कोणत्याही हुतात्म्यासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि ज्या संघटनेशी तो जवान संबंधित असतो, त्या संघटनेसाठीही ती अभिमानाची बाब असते, असेही अमित शहा म्हणाले. 1966 पासून आजपर्यंत चंदीगड पोलिसांनी या वैशिष्ट्यपूर्ण शहराच्या संरक्षणासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत आणि आपल्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
अमित शाह यांनी सांगितले की, आज चंदीगड पोलिसांच्या ताफ्यात 141 नवीन वाहने समाविष्ट केली जात आहेत. यामुळे जलद प्रतिसाद, सखोल गस्त, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि आधुनिक पोलीस व्यवस्था अधिक बळकट होईल. त्यांनी नमूद केले की, रिस्पॉन्स टाइम म्हणजे प्रतिसादाच्या वेळे बाबत चंदीगड पोलीस देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि 141 नवीन वाहनांच्या समावेशानंतर ते संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर येतील.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, राष्ट्रपती ध्वज हा सन्मान अशा दलाला दिला जातो ज्यांनी 15 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे आणि ज्यांच्या जवानांनी शिस्त व समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या 60 वर्षांत चंदीगड पोलिसांनी संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी यशस्वीपणे काम केले असून, उत्तर भारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण सुरक्षा दल म्हणून आपली भूमिका बजावली आहे. शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले चंदीगड हे भारतातील सर्वात उत्तम नियोजित शहरांपैकी एक मानले जाते. मात्र, जेव्हा देशात दहशतवादाचा काळ आला, तेव्हा चंदीगडही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. अशा कठीण काळात चंदीगड पोलिसांनी असाधारण शौर्य आणि धैर्याचे प्रदर्शन केले. आपल्या पराक्रम, सेवाभाव आणि सुशासनाच्या जोरावर त्यांनी केवळ चंदीगडलाच नव्हे, तर संपूर्ण परिसराला दहशतवादापासून सुरक्षित ठेवण्याचे काम केले.
आपल्या देशातील पोलिसिंग हे प्रामुख्याने दहशतवाद नियंत्रण, अंमली पदार्थ विरोधी कारवाया, सायबर गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यावरच केंद्रित राहिलेले आहे. परंतु, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देणे ही देखील पोलिसांची एक तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
चंदीगड पोलिसांनी आपल्या 'बीट पोलिसिंग अॅप' आणि या मॉडेलच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर एक उत्कृष्ट यंत्रणा यशस्वीपणे उभारली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या विविध कामांसाठी पोलिस ठाण्याचे खेटे मारावे लागत नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.
देशात दरडोई वाहनांची संख्या चंदीगडमध्ये सर्वाधिक असूनही, शहराला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही, असे त्यांनी नमूद केले. चंदीगड पोलिसांचा ‘क्विक रिस्पॉन्स टाइम’ 10 मिनिटांचा आहे; परंतु प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पोलिसांना सरासरी अवघ्या 4 मिनिटांचा वेळ लागतो, असे ते म्हणाले.
2015 नंतर ‘बीट पोलिसिंग’ ही पद्धत सुरू करणारे चंदीगड हे पहिले शहर ठरले असल्याची माहितीही शहा यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजांच्या काळातील तीन जाचक कायद्यांच्या जागी देशात जे तीन नवीन फौजदारी कायदे आणले, त्यांची सुरुवातही चंदीगडमधूनच झाली होती, याचाही त्यांनी उल्लेख केला.
आता आपण 'नशामुक्त भारत' घडवण्याचा संकल्प केला असून, चंदीगड हे देशातील पहिले नशामुक्त शहर बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai