Posted On:
01 NOV 2026 2:34PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण क्रीडा स्पर्धा 2026 चे उद्घाटन केले.
उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी या स्पर्धांचे वर्णन धैर्य, दृढनिश्चय, करुणा आणि जीवनाच्या अमूल्य देणगीचा उत्सव असे केले. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी रेनल केअर फाउंडेशन, सर गंगाराम रुग्णालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेचे (नोटो) त्यांनी अभिनंदन केले.
निःस्वार्थ सेवेच्या भारताच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपतींनी महर्षी दधीची यांच्या त्यागाचे स्मरण केले. हा त्याग व्यापक कल्याणासाठी केलेल्या दानाचे कालातीत प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अवयवदानाला ‘महादान’ असे संबोधले. या दानामुळे दुःखद प्रसंगातही आशेचा किरण कायम राहू शकतो, असे ते म्हणाले.
या स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धांपुरत्या मर्यादित नसल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, या स्पर्धा प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तींच्या जिद्दीचा उत्सव साजरा करतात आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतात. सहभागींचे धैर्य, शिस्त आणि खिलाडूवृत्ती यांचे त्यांनी कौतुक केले. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांच्या यशामुळे आशा निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
उपराष्ट्रपतींनी दिवंगत अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनःपूर्वक आदर व्यक्त केला. त्यांच्या निःस्वार्थ निर्णयांमुळे इतरांना नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. प्रेम आणि करुणेच्या सर्वोच्च मूल्यांचे उदाहरण घालून देणाऱ्या जिवंत अवयवदात्यांचेही त्यांनी कौतुक केले. एका दिवंगत अवयवदात्यामुळे आठ जणांपर्यंतचे प्राण वाचू शकतात, यावर त्यांनी विशेष भर दिला.
अवयवदानाबाबत अधिक जनजागृती करण्याचे आवाहन करताना उपराष्ट्रपतींनी यासंदर्भातील गैरसमज आणि चुकीच्या धारणा दूर करण्याची, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देण्याची तसेच नागरिकांनी अवयवदानाबाबतची आपली इच्छा कुटुंबीयांना सांगण्याची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण क्रीडा स्पर्धा या मोहिमेला पुढे नेण्यासाठी एक उत्कृष्ट मंच उपलब्ध करून देतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण, अवयवदाते, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येतात, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘जिंदगी दोबारा’ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जर्मनीतील ड्रेस्डेन येथे 2025 मध्ये झालेल्या जागतिक अवयव प्रत्यारोपण क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी 570 अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि अवयवदात्यांनी एकत्रितपणे ताडासन करून जागतिक विक्रम नोंदवला. हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर ‘ताडासन करणाऱ्या अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्ण आणि अवयवदात्यांचा सर्वात मोठा समूह’ या विक्रमासाठी नवी दिल्लीतील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने आयोजकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
उपराष्ट्रपतींनी उपस्थितांसमवेत अवयवदानाची शपथ घेतली. तसेच कबड्डी, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांच्या प्रात्यक्षिक सामन्यांचे अवलोकन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना उपराष्ट्रपतींनी अवयवदानाला सामायिक मानवतेची प्रभावी अभिव्यक्ती बनवण्याचे आवाहन केले. अधिकाधिक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाचा लाभ मिळावा आणि अवयवांच्या प्रतीक्षेत कमी लोकांचे प्राण जावेत, अशा समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, लोकसभा खासदार बांसुरी स्वराज, सर गंगाराम ट्रस्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण क्रीडा स्पर्धा 2026 चे मुख्य संरक्षक डॉ. डी. एस. राणा, या स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. ए. के. भल्ला आणि राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेचे (एनओटीटीओ) संचालक डॉ. अनिल कुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
***
राधिका अघोर/गजेंद्न गायकवाड/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai