Posted On:
01 NOV 2026 10:52AM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाकडून 2 नोव्हेंबर 2026 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात कोळसा आणि लिग्नाइट (तपकिरी कोळसा) खाणकामातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्षम कामकाज, पर्यावरणीय शाश्वतता, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा, तांत्रिक प्रगती तसेच संसाधनांचे जबाबदार व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण निकषांवरील उत्कृष्ट कामगिरीसाठी खाणींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे विशेष अतिथी असतील. कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त आणि अतिरिक्त सचिव सनोज कुमार झा यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कोळसा आणि लिग्नाइट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, उद्योग क्षेत्रातील भागधारक आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
कोळसा खाणींसाठीच्या स्टार रेटिंग धोरणामध्ये कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या कामगिरीचे विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यासाठी एक संरचित आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कार्यक्षम कामकाज, तंत्रज्ञानाचा वापर, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा, पर्यावरण व्यवस्थापन, शाश्वत विकास, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना तसेच स्थानिक समुदायांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. कोळसा नियंत्रक संघटनेने नियुक्त केलेल्या परीक्षकांकडून मूल्यमापन आणि पडताळणी केल्यानंतर खाणींना 5 स्टारपासून ते शून्य स्टारपर्यंत श्रेणी दिली जाते. 2024–25 या मूल्यमापन वर्षात सर्वोच्च स्टार रेटिंग प्राप्त करणाऱ्या खाणींचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
वैज्ञानिक, सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक खाणकाम पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर तसेच देशाच्या ऊर्जा सुरक्षेत आणि आर्थिक विकासात कोळसा क्षेत्राचे योगदान अधिक बळकट करण्यावर सरकारचा सातत्यपूर्ण भर असल्याचे हे पुरस्कार दर्शवतात.
पारदर्शक आणि कामगिरीवर आधारित मूल्यमापन प्रक्रियेद्वारे स्टार रेटिंग धोरण खाण कंपन्यांना कार्यप्रणालीचे निकष सातत्याने उंचावण्यासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी आणि खाणकामाच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करते. या पुरस्कारांमुळे खाण कंपन्यांमध्ये निकोप स्पर्धेला चालना मिळण्याबरोबरच या क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पद्धतींचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळते.
जबाबदार खाणकाम, संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खाणींचा गौरव करण्यासाठी हा सोहळा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.
***
यश राणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai