कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2026 मध्ये कोळशाच्या आयातीत 5.83 टक्क्यांची घट; आयातीवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे प्रतिबिंब

Posted On: 01 NOV 2026 10:52AM by PIB Mumbai

ऑगस्ट 2026 मध्ये भारताच्या एकूण कोळसा आयातीत 5.83 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2025 मधील 111.05 दशलक्ष टनांवरून ही आयात ऑगस्ट 2026 मध्ये 104.57 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली. म्हणजेच 6.48 दशलक्ष टनांची घट नोंदवण्यात आली. देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणे, उपलब्धता सुधारणे आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे, या उद्देशाने कोळसा मंत्रालयाकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे. देशाचे आयात केलेल्या कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रमुख ठळक बाबी

1. वीज क्षेत्रातील कोळसा आयातीत 6.39 टक्क्यांची घट

वीज निर्मिती केंद्रांकडून होणाऱ्या कोळशाच्या आयातीत 6.39 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2025 मधील 22.77 दशलक्ष टनांवरून ही आयात ऑगस्ट 2026 मध्ये 21.32 दशलक्ष टनांपर्यंत कमी झाली. देशांतर्गत कोळशाची उपलब्धता वाढवणे आणि देशांतर्गत कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमध्ये मिश्रणासाठी आयात केलेल्या कोळशावरील अवलंबित्व कमी करणे, या प्रयत्नांशी ही घट सुसंगत आहे.

2. आयात केलेल्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांच्या आयातीत किरकोळ वाढ

आयात केलेल्या कोळशावर आधारित (आयसीबी) वीज निर्मिती केंद्रांच्या कोळसा आयातीत 0.98 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. ऑगस्ट 2025 मधील 18.13 दशलक्ष टनांवरून ही आयात ऑगस्ट 2026 मध्ये 18.31 दशलक्ष टनांपर्यंत वाढली. ही वीज निर्मिती केंद्रे प्रामुख्याने आयात केलेल्या कोळशावर चालण्यासाठी तयार करण्यात आली आहेत.

3. देशांतर्गत कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमध्ये मिश्रणासाठी होणाऱ्या आयातीत 35.23 टक्क्यांची घट

देशांतर्गत कोळशावर आधारित (डीसीबी) वीज निर्मिती केंद्रांमध्ये मिश्रणासाठी होणाऱ्या कोळशाच्या आयातीत 35.23 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2025 मधील 4.64 दशलक्ष टनांवरून ही आयात ऑगस्ट 2026 मध्ये 3.00 दशलक्ष टनांपर्यंत कमी झाली. या घटीवरून मिश्रणासाठी आयात केलेल्या कोळशाची गरज कमी झाल्याचे दिसून येते. वीज निर्मितीसाठी देशांतर्गत कोळशाची उपलब्धता वाढवण्याच्या प्रयत्नांशी ही बाब सुसंगत आहे.

4. एकूण कोळसा वापरातील आयातीचा वाटा कमी

भारताच्या एकूण कोळसा वापरामध्ये आयात केलेल्या कोळशाचा वाटा ऑगस्ट 2025 मधील 21.20 टक्क्यांवरून ऑगस्ट 2026 मध्ये 19.30 टक्क्यांपर्यंत कमी झाला. म्हणजेच 1.90 टक्के-बिंदूंची घट नोंदवण्यात आली. या महिन्यात देशाचे आयात केलेल्या कोळशावरील अवलंबित्व कमी झाल्याचे यातून दिसून येते.

5. कोकिंग कोळशाच्या आयातीत 4.18 टक्क्यांची घट

कोकिंग कोळशाच्या आयातीत 4.18 टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट 2025 मधील 28.49 दशलक्ष टनांवरून ही आयात ऑगस्ट 2026 मध्ये 27.30 दशलक्ष टनांपर्यंत कमी झाली. पोलाद उद्योगासाठी कोकिंग कोळसा हा महत्त्वाचा कच्चा माल आहे. मात्र, देशांतर्गत उपलब्ध कोळशाच्या गुणवत्तेची आणि वैशिष्ट्यांची मर्यादा असल्यामुळे त्याची उपलब्धता अद्याप आव्हानात्मक आहे. त्यामुळे या प्रकारच्या कोळशाची आयात ही पोलाद क्षेत्राच्या विशिष्ट कच्च्या मालाच्या गरजांवर अवलंबून असते.

देशांतर्गत कोळशाचा पुरवठा मजबूत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

देशांतर्गत कोळशाचे उत्पादन आणि उचल वाढवणे, कोळशाच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक संपर्कव्यवस्थेला (एफएमसी) बळकटी देणे, कोळसा वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा सुधारणे आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या साठ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे, यावर मंत्रालयाचा सातत्याने भर आहे.

वीज निर्मिती कंपन्यांना कोळशाचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि तिच्या उपकंपन्यांसोबत समन्वयाने प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत कोळशाच्या पुरवठ्याची विश्वासार्हता वाढवणे, टाळता येण्याजोगे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशभरात अखंडित वीज निर्मितीला सहाय्य करणे, हा या उपाययोजनांचा उद्देश आहे.

एकूण कोळसा आयातीत, विशेषतः देशांतर्गत कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमध्ये मिश्रणासाठी होणाऱ्या आयातीत झालेली घट, देशांतर्गत उत्पादन, वाहतूक आणि पुरवठा साखळीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्याचवेळी आयात केलेल्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रे आणि पोलाद क्षेत्राकडून होणारी आयात त्यांच्या विशिष्ट इंधन आणि कच्च्या मालाच्या गरजा दर्शवते.

शक्य त्या ठिकाणी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवणे, कोळसा वाहतुकीची क्षमता सुधारणे, पुरवठा साखळीची कार्यक्षमता मजबूत करणे आणि कोळशाच्या गुणवत्तेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कोळसा मंत्रालय कटिबद्ध आहे. त्याचबरोबर देशातील वीज आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी कोळशाची विश्वासार्ह उपलब्धता सुनिश्चित करण्यावरही मंत्रालयाचा भर आहे.

***

यश राणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2331088) अभ्यागत कक्ष : 25