Posted On:
31 OCT 2026 3:34PM by PIB Mumbai
एयर चीफ मार्शल ए पी सिंग पीव्हीएसएम, एव्हीएसएम, चीफ ऑफ द एअर स्टाफ (CAS) हे 31 ऑक्टोबर 2026 रोजी भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले, आणि राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या 42 वर्षांच्या प्रदीर्घ आणि उत्कृष्ट सेवेच्या एका दैदिप्यमान कारकीर्दीचा समारोप झाला.
एक कुशल लढाऊ वैमानिक आणि प्रयोगशील चाचणी वैमानिक म्हणून त्यांनी भारतीय वायुसेनेची धोरणात्मक क्षमता, युद्धसज्जता आणि आधुनिकीकरण यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणून त्यांचा कार्यकाळ हा खंबीर नेतृत्व आणि तातडीच्या युद्धसज्जतेवरील अविचल लक्ष या वैशिष्ट्यांसाठी विशेष ओळखला जातो. खासकरून 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय वायुसेनेने राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली अतुलनीय युद्धक्षमता, अचूकता आणि दृढनिश्चय सिद्ध करून दाखवला. त्यांच्या नेतृत्वामुळेच कोणत्याही प्रकारच्या लष्करी आव्हानांना आणि मोहिमांना चोख प्रत्युत्तर देण्याची भारतीय वायुसेनेची क्षमता अधिक मजबूत झाली.
परिचालनात्मक नेतृत्वापलीकडे जाऊन, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग हे संपूर्ण हवाई दलातील प्रत्येक वायुयोद्ध्याशी असलेल्या त्यांच्या सखोल आणि आपुलकीच्या नात्यासाठी सदैव लक्षात ठेवले जातील. तळागाळातील सैनिकांशी असणारा त्यांचा थेट संवाद हा, 'भारतीय हवाई दलाची खरी ताकद ही तिथल्या माणसांमध्येच आहे' या त्यांच्या दृढ विश्वासाची साक्ष देणारा होता. सैन्यात कार्यरत असलेल्या वायुयोद्ध्यापासून ते तरुण अधिकारी, हवाई सैनिक आणि कॅडेट्सपर्यंत प्रत्येकाशी संवाद साधताना त्यांनी व्यावसायिकता, जबाबदारीचे भान, स्वयंपुढाकार आणि सेवेचा सार्थ अभिमान या मूल्यांवर सातत्याने भर दिला. तरुण पिढीशी सहज नाते जोडण्याच्या आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या त्यांच्या क्षमतेतून, पुढील पिढीतील वायुयोद्धे व नेतृत्व घडवण्यावर असणारा त्यांचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला.
आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी स्वदेशीकरण, नवसंशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अंतर्भाव यांवर विशेष भर देत तंत्रज्ञानाने सक्षम व भविष्यासाठी सज्ज असे भारतीय हवाई दल घडवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाने एका सक्षम, विश्वासार्ह आणि युद्धसज्ज सैन्याची उभारणी करण्याचा हवाई दलाचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
भारतीय हवाई दल एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि सरिता सिंह यांना आगामी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचे प्रभावी नेतृत्व, संकटांना तोंड देण्याचा बाणा आणि वायुयोद्ध्यांशी असलेले अतूट नाते हा त्यांचा वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.




***
माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai