Posted On:
30 OCT 2026 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026
दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाने आज नवी दिल्लीतील डाक भवन येथे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी समर्पित दोन टपाल तिकिटे असलेले विशेष स्मरणिका पत्रक जारी केले. टपाल सेवा महासंचालक मनीषा सिन्हा यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्यासह इतर मान्यवर आणि दोन्ही मंत्रालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, मनीषा सिन्हा म्हणाल्या की, स्मरणिका टपाल तिकिटे हे देशाचे प्राधान्यक्रम दर्शवण्याचे आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन जागरूकता पसरवण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहेत. स्तनाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी नियमित तपासणी आणि लवकर निदान करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, तसेच महिलांना वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पाठबळ द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या. उपचार घेत असलेल्या महिलांसाठी संपर्क, प्रोत्साहन आणि भावनिक आधाराचे अर्थपूर्ण माध्यम म्हणून पोस्टकार्डची क्षमता देखील त्यांनी अधोरेखित केली.
पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी टपाल तिकीटांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याचे महत्व सांगणारा संदेश पुढे नेल्याबद्दल टपाल विभागाची प्रशंसा केली. सरकारचा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर असलेला भर अधोरेखित करत त्या म्हणाल्या की, स्तनाच्या, तोंडाच्या आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी नियमित तपासणी करणे हा राष्ट्रीय आरोग्य सेवा कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे.

भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग असून, दरवर्षी सुमारे दोन लाख नवीन प्रकरणांचे निदान होते. भारत सरकारने असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत, लोकसंख्येवर आधारित तपासणी आणि रोगाचे लवकर निदान करण्याच्या उपक्रमांना अधिक बळकट केले आहे.
टपाल विभागाने स्वतंत्रपणे, फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्याने, डाक भवन येथे स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यावर जनजागृती सत्रे, तसेच बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) आणि कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) यावर संवादात्मक सत्रे आयोजित केली, जेणेकरून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा जागरूकता आणि अत्यावश्यक जीवनरक्षक तंत्रांबाबत ज्ञान वाढेल.
भारतभरातील टपाल तिकीट संग्रह कार्यालयात आणि ई-पोस्ट ऑफिस पोर्टलद्वारे ही विशेष स्मरणिका टपाल तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
https://www.epostoffice.gov.in/
सुवर्णा बेडेकर /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai