अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऍट द टॉप, बुर्ज खलिफा व रिसॉर्टस वर्ल्ड सेन्टोसा येथे युपीआयद्वारे पैसे भरुन ऑनलाइन आरक्षण करता येणार


युएइ व सिंगापूरला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांना तेथील प्रेक्षणीय स्थळांसाठी आता युपीआयद्वारा आरक्षण सुविधा उपलब्ध

Posted On: 30 OCT 2026 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

युएइ आणि सिंगापूरला भेट देणारे भारतीय नागरिक आता तेथील प्रेक्षणीय स्थळांसाठीचे आरक्षण युपीआयद्वारे सहजपणे करू शकतील. जगातल्या या दोन प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन करणारे भारतीय पर्यटक आता तेथील पर्यटन स्थळांसाठीचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने करताना त्यांच्या पसंतीच्या युनिफाइड पेमेंटस इंटरफेस (युपीआय) ऍपद्वारे पैसे भरू शकतात. जगभरात पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना सोप्या, चलन समस्येची काळजी न करता पर्यटन करता यावे यासाठी हे पाऊल लक्षणीय ठरले आहे.  

भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळाची (एनपीसीआय) आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंटस लिमिटेडने (एनआयपीएल) युपीआयद्वारे ऑनलाइन आरक्षण करता यावे यासाठी युएइ आणि सिंगापूरसोबतची धोरणात्मक भागीदारी अनुक्रमे 29 जुलै 2026 व 9 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर केली होती. युएइसाठी निओपे व एमार एंटरटेनमेंट यांच्या भागीदारीत ऍट द टॉप, बुर्ज खलिफा येथे युपीआय पेमेंट स्वीकृती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इ कॉमर्ससाठी युपीआय वापरणारे युएइमधील हे पहिलेच पर्यटनस्थळ ठरले आहे.  सिंगापूरमध्ये प्रमुख देयक मंच फोमो पेच्या सहकार्याने रिसॉर्टस वर्ल्ड सेन्टोसा इथे युपीआय देयक सुविधा उपलब्ध झाली आहे. 2025 मध्ये 12 लाख भारतीय पर्यटकांनी सिंगापूरला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

जागतिक दर्जाची प्रमुख खरेदीची ठिकाणे असलेल्या ऍट द टॉप, बुर्ज खलिफा व आयकॉनिक रिसॉर्टस वर्ल्ड सेन्टोसा आणि युनिव्हर्सल स्टुडिओज सिंगापूर, सिंगापूर ओशनॅरियम तसेच ऍडव्हेंचर कोव वॉटरपार्क येथे खरेदीसाठी युपीआय सुविधा उपलब्ध असणे हे या विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय देयक मंचाला वाढती मागणी असल्याचे द्योतक आहे. यामुळे भारत आणि सिंगापूर व युएइ यांच्यातील डिजिटल तसेच आर्थिक संबंध दृढ होतील. भारतीय पर्यटकांना सोपे, सुरक्षित व माहिती असलेले देयक साधन उपलब्ध होईल.  

समावेशनाची प्रमुख वैशिष्ट्ये

डिजिटल नवोन्मेष, सुलभ आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या आणि भारताचे तंत्रज्ञानविषयक सामर्थ्य जागतिक स्तरावर दाखवून देण्याची क्षमता असलेल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ मंत्रालय नेहमीच वचनबद्ध आहे.

आधीचे उपक्रम

26 जानेवारी 2024 रोजी पॅरीसमधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी भारताच्या युपीआय मंचाद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली.  

युपीआयला दहा देशांची स्वीकृती

सिंगापूर, संयुक्त अरब अमीराती, फ्रान्स, मॉरीशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया आणि ग्रीस या देशांमध्ये भारतीय पर्यटकांसाठी युपीआयद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. उझबेकिस्तान या यादीतील 11 वा देश बनण्याच्या मार्गावर आहे. 30 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असताना दोन्ही देशांमधील व्यापारी कराराची घोषणा केली होती. 
 

सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2330650) अभ्यागत कक्ष : 11