Posted On:
30 OCT 2026 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील बनासकांठा येथे 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करण्यात आले. अलिकडेच नवरात्रौत्सवाची सांगता झाली , त्यानंतर त्यांनी आज अंबा मातेच्या पवित्र भूमीवरून उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी महिला, लहान मुले, शेतकरी आणि पशुपालकांसाठी अनेक उपक्रमांचा प्रारंभही केला. यासोबतच देशभरातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा नवीन हप्ता हस्तांतरितही केला.
शेतकरी आणि अन्नदाते हे विकसित भारताचे सर्वात भक्कम आधारस्तंभ आहेत, आणि केंद्र सरकारने त्यांच्या कल्याणाला आणि सक्षमीकरणाला कायम प्राधान्य दिले आहे असे पंतप्रधान म्हणाले. या अनुषंगानेच 2013-14 च्या तुलनेत कृषी क्षेत्रासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत पाच पटीपेक्षा जास्त वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुजरातमधील 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यात बनासकांठा मधील लाखो शेतकरी कुटुंबांसाठीच्या सुमारे 50 कोटी रुपयांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. आज देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरीत केल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांतील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झाली आहे किंवा त्यांना ते मिळाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. याच संदर्भाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत थेट अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 4.5 लाख कोटी रुपये जमा केले असल्याचे उदाहरणही त्यांनी मांडले. शेतकरी समुदायात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण 85 टक्क्यांपेक्षा जास्त असून, आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अशा छोट्या शेतकऱ्यांची काळजी घेतली आहे आणि त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत पुरवली असल्याचे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या काही वर्षांत अनिश्चिततेचे वातावरण आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र आपल्या शेतकरी केंद्रित केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर या भाववाढीचा ताण येऊ दिला नाही, आणि यासाठी केंद्र सरकारने सुमारे 16 लाख कोटी रुपये खर्च केल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारने किमान हमीभावासंदर्भात दिलेले वचनही पूर्ण केले असल्याचे ते म्हणाले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापोटी 24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भक्कम सुरक्षा कवच दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या 10 ते 12 वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या भूमिकेच्या व्याप्तीचा विस्तार करून सिंचनाचा खर्च कमी करण्याचे प्रयत्नही सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम कुसुम योजनेअंतर्गत वितरीत केलेल्या जवळपास 12 लाख सौर पंपांमुळे अतिरिक्त वीज निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचा 80 कोटी लिटर्सपेक्षा जास्त डिझेल खरेदीसाठीचा खर्च वाचला. केवळ या पाच प्रमुख योजनांमुळे आणि निर्णयामुळे एकंदर वित्तीय लाभ किंवा बचत 50 लाख कोटी रुपयांवर गेली असे त्यांनी स्पष्ट केले. “या 50 लाख कोटी रुपयांच्या रकमेने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले आणि भारतातील कृषी क्षेत्राची क्षमता वृद्धींगत केली,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
शेती ही भारताची परंपरा आणि संस्कृतीचा प्रमुख घटक दोन्हीही आहे या मुद्द्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये कृषी आणि पशुपालन क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश केला आहे. मृदा आरोग्य कार्ड हे याचे ठळक उदाहरण आहे. शेतीसाठी आवश्यक खताचा प्रकार व प्रमाण निश्चित करण्यामध्ये पूर्वी असलेल्या समस्या यामुळे दूर झाल्या आणि देशभरातील शेतीमध्ये आधुनिकता आली असे ते म्हणाले. “आज देशातील शेतकऱ्यांकडे 26 कोटी मृदा आरोग्य कार्ड आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
हवामानात वारंवार होणारे बदल ही शेतकऱ्यांसमोरची मोठी समस्या असल्याचे नमूद करुन पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांना हवामान अनुकूल बियाणे पुरवण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. “अलीकडच्या काळात बियाण्यांचे सुमारे तीन हजार प्रकार शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांचा व्यापक सहभाग असलेला पशुपालन व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित करत गेल्या दशकामध्ये दुग्धव्यवसाय आणि पशुधन क्षेत्रातही विज्ञान व तंत्रज्ञानाचा समावेश केल्याचे पंतप्रधान म्हणाले. उत्तम दर्जाच्या पशुधनामुळे दुधाचे उत्पादन वाढले तसेच वेळेत लसीकरण व वैद्यकीय उपचार यामुळे आजारांमुळे होणारे नुकसान टळले असे त्यांनी स्पष्ट केले. “याचाच अर्थ जर पशुधन आरोग्यसंपन्न असेल; तर माझ्या पशुपालक बंधुभगिनींचे उत्पन्न आणखी वाढेल,” असे मोदी म्हणाले.
देशी पशुधनाचे शास्त्रीयदृष्ट्या प्रजोत्पादन आणि जतन याला प्रोत्साहन देण्यामध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशनची भूमिका अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की बनासकांथा येथे नव्याने बांधलेल्या संशोधन केंद्रामुळे या अभियानाला बळकटी येईल आणि गाईंच्या गीर, साहिवाल आणि कांकरेज तसेच म्हशींच्या मेहसाणा, मुरा व जाफराबादी यासारख्या देशी प्रजातींचा दर्जा सुधारेल. कांकरेज प्रजातीचे संशोधन करणारी ही देशातील पहिलीच प्रयोगशाळा असेल. भरपूर दूध देणारी, कमी देखभाल आवश्यक असलेली, निरोगी गाय पुढच्या पिढीकडे सोपवण्याची एखाद्या शेतकऱ्याची इच्छा असेल तर आयव्हीएफ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्तम दर्जा राखण्याची शक्यता वाढेल असे त्यांनी स्पष्ट केले. “पशुपालक शेतकऱ्याला याचा थेट लाभ होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पाय आणि तोंडाच्या आजारापासून पशुंचे संरक्षण करण्याला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे कारण; आजाराचा पशुचे आरोग्य व दुधाचे उत्पादन दोन्हीवरही परिणाम होतो असे सांगून पंतप्रधानांनी देशव्यापी मोफत लसीकरण मोहीमेकडे लक्ष वेधले. आतापर्यंत सुमारे 150 कोटी लसी दिल्या गेल्या असून याचा 8 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. “यामुळे पशुपालक शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी झाला,” असे मोदी यांनी सांगितले.
या उपायांमुळे झालेल्या दुग्धोत्पादन व्यवसायावरील दृश्य परिणामांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की एक गाय किंवा म्हैस यांच्याकडून दररोज मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण 2013-14 मध्ये सरासरी 5 लिटर इतके होते ते आज सुमारे 8 लिटर झाले आहे. यामुळे जगात सर्वात वेगवान दुग्धोत्पादन विकास दर असलेला देश अशी भारताची ओळख निर्माण झाली आणि ग्रामीण कुटुंबांना याचा लाभ झाला. “दुग्धोत्पादन क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गाईचे शेण आणि दूध या दोन्हीपासून उत्पन्न मिळवण्यात पशुपालकांना मदत करण्याचा सरकारचा निर्धार व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, शेण आणि शेतातील अवशेषांपासून बायोगॅस, बायो-सीएनजी आणि सेंद्रिय खत तयार करण्यासाठी बनास डेअरी सारख्या संस्थांच्या महत्त्वपूर्ण पाठबळातून, पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आज दोन बायो-सीएनजी कारखान्यांची पायाभरणी करण्यात आली आहे. पशुधन निरोगी राखणे, दुधाचे उत्पादन वाढवणे आणि शेणाचा पूर्णपणे वापर होईल याची सुनिश्चिती करणे ही सरकारची सुस्पष्ट उद्दिष्टे त्यांनी अधोरेखित केली. “पशुपालन ही केवळ एक परंपरा न ठेवता, तिला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आणि गावे समृद्ध करण्याचे सामर्थ्यशाली साधन बनवत आहोत,” असे मोदी म्हणाले.
ग्रामीण भागाची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अलीकडच्या वर्षांमध्ये सरकारने एका व्यापक दृष्टीकोनातून कार्य केले आहे हे समजावून सांगत पंतप्रधानांनी मत्स्योद्योगाचा झालेला प्रचंड विस्तार आणि या क्षेत्रातील सहकारी संस्थांना मिळालेल्या चालनेकडे निर्देश केला. “भारताची सागरी खाद्यान्न निर्यात दुप्पट झाली आहे हे ऐकून तुम्हाला आनंद होईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मधमाशीपालन हा शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्न वाढवण्याचा आणखी एक प्रमुख मार्ग आहे हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की गेल्या 12 वर्षांत देशातील मध उत्पादन दुप्पट झाले आहे. या मधु क्रांतीला चालना देण्यात महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. “आपला देश नैसर्गिक मधाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार बनला आहे हे समजल्यावर तुम्हाला अभिमान वाटेल,” मोदी यांनी सांगितले.
7 ऑक्टोबर, 2001 रोजी पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर, यंदा 7 ऑक्टोबरला सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांचा सेवा काळ पूर्ण केला याचे स्मरण करत, पंतप्रधानांनी सांगितले की जेव्हा त्यांना सरकारी कार्यालये किंवा सरकारी नस्ती याबद्दल काहीही माहिती नव्हती त्यावेळी प्रत्येक गुजराती माणसाकडून अमर्याद प्रेम आणि मार्गदर्शन मिळाले. गरीब घरातील ज्या व्यक्तीच्या पूर्वजांनी कधीही गावाचा सरपंच होण्याचे देखील स्वप्न पाहिले नव्हते अशा व्यक्तीवर आधी गुजरात आणि नंतर देशाची सेवा करण्याची जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “आणि केवळ प्रेमापेक्षाही, प्रत्येक गुजराती व्यक्तीने मला काहीतरी शिकवले आणि योग्य मार्गावर नेले आहे,” पंतप्रधानांनी नमूद केले.
आपल्याला सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून देशाची सेवा करणे आणि गुजरातच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास करणे ही दोनच मार्गदर्शक तत्वे माहित होती आणि इतर सर्व गोष्टी आपण लोकांकडून शिकलो आहोत असे सांगत पंतप्रधानांनी देशासाठी साध्य केलेल्या कामगिरीचे श्रेय नागरिकांना दिले. “यासाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सेवेत कार्यरत राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या भागात 25 वर्षांपूर्वी जाणवलेल्या तीव्र पाणी आणि वीज टंचाईची ज्येष्ठ नागरिकांना आठवण करून देत, दोन्ही स्त्रोतांचे जतन करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाकडे लोकांनी कशा प्रकारे लक्ष दिले आणि परिस्थितीत इतके आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले की जुन्या काळातील या हालअपेष्टा आता केवळ आठवणीत उरल्या आहेत याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “मी आज पुन्हा तुम्हाला हेच सांगीन की आपल्याला पाणी तसेच वीज यांची बचत केली पाहिजे,” असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
नर्मदा नदीचे पाणी तसेच ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी बनासकांठा परिसरात कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणले आहे आणि या भागातील बटाट्यांना जागतिक स्तरावर प्रसिध्द केले आहे, आणि त्यासोबतच बनास डेअरीच्या सहकारी चळवळीचा काशी आणि त्यापलीकडे विस्तार केला आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी या बाबीकडे लक्ष वेधले की, फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्या रोपाची देखील क्षमता वाढवण्यात आली असून त्याद्वारे बटाट्याची अधिक खरेदी शक्य झाली आहे. “बटाटे उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी सुविधा आहे,” असे मोदी म्हणाले.
फळे आणि भाजीपाला उप्तादकांसाठी सुरु असलेल्या विद्यमान समूह विकास कार्यक्रमाअंतर्गत आज 12 समूहांना मंजुरी देण्यात आली असून यामध्ये टोमॅटो, बटाटा, मिरची, द्राक्षे, केळी, कांदा, संत्री, डाळिंब आणि कोको यांचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांना नवीन फळबागा लावण्याकरता आणि जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. "उत्तर गुजरातमध्ये मिळालेल्या दोन क्लस्टर्समुळे बनासकांठा आणि साबरकांठा येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल," असे पंतप्रधान म्हणाले.
गुजरातच्या विकासासाठी आज उदघाटन केलेल्या किंवा पायाभरणी केलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा उल्लेख करुन अहमदाबाद (साबरमती)-वाराणसी एक्स्प्रेस आणि महेसाणा-बेचराजी-साबरमती मेमू या आज सुरु झालेल्या दोन नवीन रेल्वे सेवांची त्यांनी माहिती दिली यासोबतच, अहमदाबाद मेट्रोच्या विस्तारांतर्गत 'गिफ्ट सिटी' आणि विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली. "अहमदाबाद-मेहसाणा महामार्ग आता चार पदरीवरून आठ पदरी होणार आहे." असे पंतप्रधान म्हणाले.
राज्यातील बालकांकरता आज उदघाटन झालेल्या सामाजिक कल्याण पायाभूत प्रकल्पांना अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की गुजरात मध्ये आणखी 4,000 अत्याधुनिक अंगणवाड्या उभारल्या जाणार आहेत. यामुळे सुमारे 4 लाख मुलांना आणि गर्भवती मातांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक विकासात्मक उपक्रमाचा उद्देश विकसित भारताची निर्मिती करणे हाच आहे. प्रत्येक शेतकरी, युवक, बहीण आणि कन्या विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मात्र, दुर्दैवाने काही घटकांना देशाची ही प्रगती आवडत नाही आणि त्यांना भारत अडचणीत सापडलेला पाहायचा आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “जेव्हा देशावर संकटे येतात, तेव्हा त्यांना आनंद होतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
इराण आणि आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा उल्लेख करुन ते म्हणाले की अशा प्रसंगी भारत खंबीरपणे एकजुटीने उभा राहिला मात्र काही घटक शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासेल आणि महिलांना गॅस चा पुरवठा होणार नाही अशा अफवा पसरवण्यात मग्न होते असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांना बदनाम करण्यासाठी देशात गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा डाव होता. "जेव्हा भारत एकजुटीने या परिस्थितीचा सामना करत होता, तेव्हा हे लोक अफवा पसरवत होते," असे पंतप्रधान म्हणाले.
शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या आपल्या वचनाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीतही सरकारने शेतीसाठी आवश्यक कृषी निविष्ठांची कोणतीही टंचाई निर्माण होऊ दिली नाही.
या युद्धामुळे खतांच्या आणि रासायनिक कच्च्या मालाच्या किंमती गगनाला भिडल्या असे सांगून पंतप्रधान म्हणाले की केंद्र सरकारने भारतीय उत्पादकांवर हा ताण येऊ दिला नाही, जागतिक बाजारपेठेत 3,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेली युरियाची पिशवी भारतात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 5,000 रुपयांहून अधिक किंमत असलेली डीएपी (DAP) ची पिशवी केवळ 1,350 रुपयांत पुरवण्यात आली. शेतकरी सक्षम व्हावा आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे म्हणून देश सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
भारताचा जलद गतीने होणारा विकास हा या अस्थिर आणि अनिश्चित जगासाठी एक आशेचा किरण आहे आणि आपण सर्वांनी एक भारत श्रेष्ठ भारताच्या तत्त्वानुसार मार्गक्रमण करत राहिले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. 31 ऑक्टोबर हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 'रन फॉर युनिटी' (एकतेसाठी धाव) निमित्त संपूर्ण देश एकतेच्या भावनेने प्रेरित होऊन धावतो. "मी सर्व देशवासियांना, विशेषतः माझ्या तरुण मित्रांना, उद्या सकाळी 'रन फॉर युनिटी'मध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करतो," असे ते म्हणाले.
31 ऑक्टोबर रोजी एकतानगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक एकता महोत्सवाच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी जाहीर केले की, यंदाचा महोत्सव उद्या सायंकाळी 5:30 वाजता भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात पोलीस आणि सुरक्षा दलांची पथसंचलने तसेच चित्ररथांचा समावेश असेल.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामाख्यापर्यंतच्या सर्व नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हा संकल्प पुन्हा एकदा दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“या आवाहनासह, विकासकामांसाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
सुषमा काणे/तुषार पवार/सुरेखा जोशी/संजना चिटणीस/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumba