वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत- ईएफटीए टीईपीए अंतर्गत भारत आणि लिक्टेनस्टाइन यांच्यातील वित्तीय संबंध अधिक बळकट करण्याच्या संधींवर तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर भर

Posted On: 28 OCT 2026 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

भारत भेटीवर आलेले, लिक्टेनस्टाइनचे युवराज प्रिन्स अलोईस यांनी आज म्हणजेच 28 ऑक्टोबर 2026 रोजी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत, दोन्ही देशातील वित्तीय व्यवहार अधिकाधिक दृढ करण्यासह भारत-ईएफटीए व्यापार आणि वित्तीय भागीदारी करारामुळे निर्माण झालेल्या गुंतवणुकीच्या संधींवर यावेळी भर देण्यात आला.

गोयल यांनी या बैठकीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत ढाचा, सातत्याने सुरु असलेल्या सुधारणा आणि विस्तारत असलेल्या उत्पादन क्षमता अधोरेखित करत, यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी महत्वाच्या संधी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, नियामक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करणे, डिजिटल प्रशासनाला पाठबळ आणि एक निश्चित, पारदर्शक तसेच स्पर्धात्मक व्यावसयिक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताची गुंतवणुकीतील कामगिरी, देशाच्या भविष्यातील आर्थिक विकासावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा वाढता विश्वास दर्शवणारी आहे.  वर्ष 2014-15 ते 2025-26 या कालावधीत भारतात एकूण 843 अब्ज अमेरिकी डॉलरचा  थेट परदेशी गुंतवणूकीचा ओघ राहिला. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ही गुंतवणूक विक्रमी 94.53 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली. यावरून गुंतवणुकीचे आकर्षक ठिकाण म्हणून भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.

भारतामध्ये स्टार्टअप्स व्यवस्थाही भरभराटीला आली आहे. देशातील 770 हून अधिक जिल्ह्यांमध्ये आणि 56 उद्योगक्षेत्रांमध्ये 2.50 लाख स्टार्टअप्स कंपन्या कार्यरत असून, त्यांच्यामार्फत 25.42 लाखांहून अधिक रोजगारांना चालना मिळाली आहे. यापैकी 52 टक्के स्टार्टअप्स महानगरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये आहेत.

भारत- ईएफटीए टीईपीए एक ऑक्टोबर 2025 पासून अस्तित्वात आला असून, त्या अंतर्गत, असलेल्या संधी, गोयल यांनी अधोरेखित केल्या. हा करार एएफटीए मधील देशांना, येत्या 15 वर्षात, भारतात थेट परदेशी गुंतवणूक 100 अब्ज डॉलर्सपर्यंत करण्याचे उद्दिष्ट देतो आणि तसेच, दहा लाख थेट रोजगारनिर्मितीसाठी सहाय्य पुरवितो, असेही त्यांनी सांगितले. या आराखड्याअंतर्गत, दोन्ही देशातील वित्तीय संबंध, दीर्घकालीन गुंतवणूक, उत्पादक क्षमता, तंत्रज्ञान भागीदारी आणि रोजगारनिर्मिती करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

भारतात मोठी आणि सातत्याने विस्तारत असलेली देशांतर्गत बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, स्पर्धात्मक उत्पादन व्यवस्था आणि विस्तारत असलेल्या जागतिक मूल्य साखळ्यांशी जोडले जाण्याची संधी, असे अनेक लाभ आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उपलब्ध असल्याचेही गोयल यांनी संगितले. लिक्टेनस्टाइनमधील कंपन्यांनी भारतातील संधींचा शोध घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये,  उत्पादन क्षेत्रातील भागीदारी, तंत्रज्ञान सहकार्य, संशोधन आणि विकास तसेच भारतीय पुरवठादार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबत व्यावसायिक संबंध, अशा संधी असल्याचे ते म्हणाले.

या चर्चेत, प्रिसीजन इंजिनियरिंग, अत्याधुनिक उत्पादन क्षेत्र, औद्योगिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अशा क्षेत्रात औद्योगिक सहकार्य वाढवण्याच्या संधीवरही भर देण्यात आला. या सर्व क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढल्यास, त्यातून तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, औद्योगिक संबंध वाढवणे आणि दोन्ही देशातील, उद्योग व्यवसायांसाठी, परस्परांना लाभयदायक अशा संधी निर्माण करता येतील.

या बैठकीत, भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराचा लाभ घेऊन गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे याबाबत दोन्ही बाजूंची समान रुची  दाखवल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या करारामुळे निर्माण झालेल्या संधींचे प्रत्यक्ष आर्थिक भागीदारीत रूपांतर करण्यावर भारताचा भर आहे. यामध्ये अधिक गुंतवणूक, उत्पादन क्षमता वाढवणे, तंत्रज्ञान सहकार्य आणि दर्जेदार रोजगारनिर्मिती यांचा समावेश असेल.

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329758) अभ्यागत कक्ष : 8