Posted On:
28 OCT 2026 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी, 26 ते 28 ऑक्टोबर 2026 दरम्यान सिंगापूरमधील 'मरिना बे सँड्स एक्सपो अँड कन्व्हेन्शन सेंटर' येथे आयोजित 'सिंगापूर आंतरराष्ट्रीय ऊर्जा सप्ताह 2026' मध्ये भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात मंत्री नाईक यांचे बीज भाषण झाले. तर दुसऱ्या दिवशीच्या सत्राच्या त्यांचे प्रारंभिक भाषण झाले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दिवसांतील सत्रांना संबोधित करताना, नाईक यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत भारताची स्थापित वीज क्षमता 558,9 गिगावॅट इतकी होती. त्यापैकी सुमारे 308 गिगावॅट (म्हणजेच 55 टक्के) क्षमता ही बिगर-जीवाश्म स्रोतांपासून मिळाली आहे. त्यांनी नमूद केले की, भारताने जून 2025 मध्येच बिगर -जीवाश्म स्रोतांपासून 50 टक्के स्थापित क्षमता गाठली आहे. भारताने हे उद्दिष्ट 2030 साठीच्या 'एनडीसी' लक्ष्यापेक्षा पाच वर्षे आधीच साध्य केले आहे. आता भारत 2030 पर्यंत बिगर -जीवाश्म स्रोतांपासून 500 गिगावॅट क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. प्रमुख योजनांतर्गत झालेली प्रगती अधोरेखित करताना ते म्हणाले की, 'पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना' अंतर्गत सुमारे 53 लाख 'रूफटॉप' सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ सुमारे 63 लाख कुटुंबांना झाला आहे.

एसआयईडब्ल्यू 2026 च्या निमित्ताने मंत्री नाईक यांनी खालील देश/संघटनांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या:
सिंगापूर: नाईक यांनी सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार, ऊर्जा, व्यापार आणि उद्योग राज्यमंत्री गान सिओ हुआंग यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी 'भारत-सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत ऊर्जा सहकार्यावर चर्चा केली. त्यामध्ये दोन्ही देशांमधील प्रस्तावित सीमापार वीज जोडणीचा समावेश होता. नाईक यांनी सिंगापूरला भारतातील पारेषण, पंप्ड स्टोरेज, बॅटरी स्टोरेज आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. याव्यतिरिक्त, हरित हायड्रोजन आणि अमोनिया, ऊर्जा कार्यक्षमता, तसेच भारतीय वीज उपकरण उत्पादक आणि सिंगापूरच्या युटिलिटी कंपन्यांमधील भागीदारीबाबतही चर्चा करण्यात आली.

भूतान: नाईक यांनी भूतानचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री, ल्योंपो सोनम ताशी यांची भेट घेतली आणि त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उभय मंत्र्यांनी 1200 मेगावॅट क्षमतेच्या 'पुनात्सांगचू-1' जलविद्युत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि 1020 मेगावॅट क्षमतेच्या 'पुनात्सांगचू-2' प्रकल्पाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. याव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय कंपन्यांच्या भागीदारीत विचाराधीन असलेल्या इतर प्रकल्पांवरही चर्चा केली.
आयआरईएनए: नाईक यांनी आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेचे (IRENA) महासंचालक फ्रान्सेस्को ला कॅमेरा यांची भेट घेतली. या चर्चेत आसियान क्षेत्रासह विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये नवीकरणीय ऊर्जेसाठी परवडणारी वित्तपुरवठा व्यवस्था, दीर्घकालीन ऊर्जा नियोजन, हरित हायड्रोजन आणि क्षमता बांधणी यांसारख्या विषयांचा समावेश होता.
आयईए: नाईक यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे (IEA) कार्यकारी संचालक डॉ. फातिह बिरोल यांची भेट घेतली. 'भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदे'त आयईएचा 'भारत नवीकरणीय ऊर्जा बाजार अहवाल 2026 आणि 'इंडिया मायनिंग वीक'मध्ये 'भारतातील महत्त्वपूर्ण खनिजे अहवाल' प्रकाशित होणार असल्याचे नाईक यांनी स्वागत केले.
आपल्या भेटीच्या तिसऱ्या दिवशी, नाईक यांनी जुरोंग बेटावर असलेल्या 'सेम्बकॉर्प' कंपनीच्या 326 मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी एनर्जी साठवणूक प्रकल्पाला भेट दिली.

* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai