Posted On:
28 OCT 2026 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंटेनर उत्पादन प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली. आर्थिक वर्ष 2039-40 पर्यंत 10,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या या योजनेचा उद्देश भारतात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कंटेनर निर्मिती परिसंस्था विकसित करणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि पुरवठा साखळीची लवचिकता अधिक बळकट करणे हा आहे. ही योजना नवीन उत्पादन सुविधांना समर्थन देण्यासोबतच, विद्यमान कंटेनर उत्पादन कंपन्यांच्या विस्तारासाठीही मदत करेल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कंटेनर उत्पादन प्रोत्साहन योजनेची घोषणा करण्यात आली होती.
या योजनेचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत:
- व्याज सवलत सहाय्य: यासाठी 859 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कंटेनर उत्पादकांनी ग्रीनफील्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी किंवा विद्यमान कंटेनर उत्पादन क्षमतांचा ब्राउनफील्ड विस्तार करण्यासाठी घेतलेल्या पात्र मुदत कर्जांवर (भांडवली कर्जावर) 3% वार्षिक व्याज सवलत दिली जाईल.
- ऑपरेशनल खर्च सहाय्य (ओईए): यासाठी 8,891 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून जागतिक शिपिंग मानकांनुसार उत्पादित केलेल्या आणि पात्र उत्पादकांद्वारे विकल्या गेलेल्या सर्व कंटेनर्ससाठी आर्थिक मदत दिली जाईल. यामुळे खर्चातील तफावत भरून काढण्यास आणि देशांतर्गत उत्पादित कंटेनर्सची स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत होईल.
- चाचणी आणि प्रमाणन सहाय्य: यासाठी 150 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून 'डायनॅमिक लॉंगिट्युडिनल इम्पॅक्ट टेस्टिंग' सारख्या सामायिक सुविधांच्या उभारणीसाठी सहाय्य दिले जाईल.
अपेक्षित परिणाम:
- देशांतर्गत कंटेनर उत्पादन क्षमता सुमारे दहा पटीने वाढवून ती 7.5 लाख टीईयू पर्यंत नेणे
- आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धाक्षम असा उत्पादन पाया निर्माण करून त्याद्वारे भारताला दर्जेदार शिपिंग कंटेनर्सचे जागतिक निर्यात केंद्र म्हणून ओळख मिळेल .
- भारताच्या सागरी आणि लॉजिस्टिक पुरवठा साखळीची लवचिकता बळकट होईल
- सुमारे 3,000 प्रत्यक्ष आणि 50,000 हून अधिक अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होतील; तसेच कॉर्नर कास्टिंग्ज, विशेष पोलाद, लाकडी चौकटी आणि रंग यांसारख्या पूरक उद्योगांना चालना मिळेल.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai