रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (E85/E100) फ्लेक्स इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा

Posted On: 26 OCT 2026 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ई 85 आणि इथेनॉलचे अधिक प्रमाण असलेल्या इतर इंधनांचा वापर करू शकणाऱ्या फ्लेक्स-इंधन वाहनांना  प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989  मध्ये सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. या सुधारणांनुसार, उत्सर्जन प्रमाणपत्रासंबंधीच्या तरतुदींमध्ये ई 85 बरोबरच ई 100 या इंधनाचाही स्पष्टपणे समावेश करण्यात आला आहे. या इंधनांवर चालण्यासाठी प्रमाणित केलेल्या वाहनांना त्यांच्या वाहन श्रेणीसाठी लागू असलेल्या उत्सर्जनविषयक आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करणे बंधनकारक असेल.

ई 85 हे पेट्रोल आणि इथेनॉल यांचे मिश्रण असलेले इंधन आहे. यामध्ये आकारमानानुसार 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल असते. इंग्रजीतील ‘E’ हे अक्षर इथेनॉल दर्शवते, तर त्यापुढील संख्या इंधनातील इथेनॉलचे प्रमाण दर्शवते.

ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञानाचा वापर आधीपासूनच केला जात आहे. ही वाहने एकाच इंधन टाकीच्या साहाय्याने इथेनॉल आणि पेट्रोल यांच्या वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रणावर चालण्यासाठी विशेषतः तयार केलेली असतात. वाहनाची रचना आणि त्याला मिळालेल्या प्रमाणपत्रानुसार, ही वाहने ई 85 किंवा प्रामुख्याने इथेनॉल असलेल्या ई 100 या इंधनावरही चालू शकतात. या वाहनांमधील इंधन प्रणालीचे भाग आणि त्यासाठी वापरलेले साहित्य हे मान्यताप्राप्त इंधन मिश्रणाला अनुरूप असतात. तसेच, इंधनातील घटकांच्या प्रमाणानुसार इंजिनची कार्यप्रणाली आपोआप बदलते. त्यामुळे वाहन उत्पादकाने प्रमाणित केलेल्या आणि निश्चित केलेल्या मर्यादेत वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनांची निवड करता येते.

देशात उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढल्यास आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. कच्चा माल आणि उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून, इथेनॉलचा वापर करण्यासाठी योग्य प्रकारे तयार केलेल्या वाहनांमधून काही प्रदूषकांचे उत्सर्जन कमी होऊ शकते. तसेच, इंधनाचे उत्पादन आणि वापर या दोन्ही टप्प्यांतून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासही मदत होऊ शकते.

ई 85/ई 100  हे इंधन केवळ त्यांचा वापर करण्यासाठी विशेषतः तयार केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या वाहनांसाठीच आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या किंवा वापरात असलेल्या सर्वसाधारण वाहनांना ते लागू होत नाही. एखादे वाहन ई10 किंवा ई 20 इंधनावर चालू शकते, याचा अर्थ ते ई 85 इंधनासाठीही योग्य आहे, असा होत नाही. या अधिसूचनेमुळे सध्याच्या वाहनधारकांना आपली वाहने ई 85 इंधनावर चालवण्याची गरज नाही. तसेच, त्यासाठी वाहनांमध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही. इंधन केंद्रावर इंधन निवडताना वाहनधारकांनी आपल्या वाहनावरील ‘इंधन अनुकूलता दर्शवणारे स्टिकर’ तपासावे आणि वाहन उत्पादकाने मालकाच्या पुस्तिकेत  दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

या अधिसूचनेद्वारे बायोडिझेलशी संबंधित तरतुदी अद्ययावत करण्याबरोबरच काही तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे नियम अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून लागू होतील.

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328759) अभ्यागत कक्ष : 6