Posted On:
25 OCT 2026 4:20PM by PIB Mumbai
भारतीय संसद 26 ऑक्टोबर 2026 रोजी 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे.
दोन दिवसीय परिषदेच्या आधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रशियन फेडरेशनच्या फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष एच.ई. व्याचेस्लाव वोलोडिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाच्या संसदीय शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.
बैठकीदरम्यान, भारत आणि रशियन संसदीय शिष्टमंडळांनी जागतिक व्यासपीठावर सहकार्य मजबूत करण्याची आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. भारताच्या संसदेतर्फे आणि 140 कोटी भारतीयांच्या वतीने वोलोडिन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत करताना बिर्ला यांनी परस्पर विश्वास, आदर आणि सामायिक आकांक्षांचा पाया असलेल्या भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि चिरकाल मैत्रीवर प्रकाश टाकला. त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाने भारताला दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाविरुद्ध ऐक्य आणि संकल्प दाखवून जागतिक शांततेसाठी एकत्र काम केले पाहिजे यावर भर दिला. 2027 मध्ये दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 80 वर्षे पूर्ण होतील, असे नमूद करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यात आल्यावर त्यांनी भर दिला.
संसदीय मुत्सद्देगिरीच्या महत्त्वावर भर देऊन, बिर्ला यांनी भारत-रशिया आंतर-संसदीय आयोगाच्या नियमित बैठका आणि संसदीय प्रतिनिधी मंडळे, विशेषत: तरुण आणि महिला संसद सदस्यांच्या देवाणघेवाणीद्वारे लोकसभा आणि राज्य ड्यूमा यांच्यात शाश्वत संस्थात्मक सहभागाचे आवाहन केले.
भारताच्या 2026 मधील बीआरआयसीएस- ब्रीक्स अध्यक्षपदाचा संदर्भ देत, ओम बिर्ला यांनी लोक केंद्री दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ब्रीक्स देशांच्या संसदांमधील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी रशियाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हवामान बदल आणि दहशतवाद यांसह समकालीन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली. बदलत्या जागतिक परिस्थितीला अनुसरून आंतरराष्ट्रीय संस्थांनी अधिक प्रतिसादक्षम होण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांची आवश्यकता पुन्हा अधोरेखित करताना, भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाकडून सातत्याने मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
या बैठकीदरम्यान बिर्ला यांनी अणुऊर्जा, उद्योग आणि इतर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींवरही प्रकाश टाकला. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांमधील परस्पर संपर्क हे द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे नमूद करताना, भारत आणि रशियाच्या जनतेमध्ये असलेले परस्पर प्रेम आणि सद्भावना हे सहकार्याचा विस्तार करण्यासाठी भक्कम अधिष्ठान असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रांतील सहकार्याच्या वाढत्या संधींचा उल्लेख करताना, रशियाच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष महामहिम व्याचेस्लाव वोलोदिन यांनी संयुक्त व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आणि द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ब्रीक्स सारख्या बहुपक्षीय व्यासपीठांसह स्टेट ड्यूमा आणि भारतीय संसद यांच्यात नियमित देवाणघेवाण होण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. सांस्कृतिक आणि मानवतावादी क्षेत्रांतील सहकार्य बळकट करण्यासाठी तसेच लोकांमधील परस्पर संपर्क वाढवण्यासाठी रशिया वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. भारत-रशिया संबंधांच्या भवितव्याबाबत विश्वास व्यक्त करताना, संसदीय स्तरावरील सातत्यपूर्ण संवाद आणि विविध क्षेत्रांतील अधिक दृढ सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर, दिवसभरात बिर्ला यांनी क्युबा, इजिप्त आणि बेलारूस येथील संसदीय शिष्टमंडळांची भेट घेतली आणि त्यांच्याशी परस्परांना समृद्ध करणारी व फलदायी चर्चा केली. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, भेट देणाऱ्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत.
या मंचावर लोक केंद्री विकासासाठी संसदांना बळकट करणे या व्यापक संकल्पनेवर विचारमंथन होणार आहे. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयांवर आधारित 4 उच्चस्तरीय सत्रांच्या माध्यमातून सहमतीवर आधारित संवादाला चालना दिली जाणार आहे.
या परिषदेचा समारोप 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे.
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai